मुंबई, 02 जून : हाडांना (bone) मजबुती देण्याचं योग्य वय ते म्हणजे बालपण. जन्मापासून एक वर्षापर्यंत हाडांचा झपाट्याने विकास होत असतो. त्यानंतर वयाच्या आठ ते नऊ वर्षापर्यंत हाडांची हळूहळू वाढ होते. पुन्हा किशोरवयात पदार्पण करताना शरीरात हार्मोन्समध्ये बदल होतात आणि या कालावधीत हाडांना मजबुती मिळत असते. मुलं वयात येताना म्हणजे मुलींसाठी 14 ते 15 वर्ष आणि मुलांसाठी 16 ते 18 वर्ष हाडं मजबूत आणि परिपक्व होत असतात. पंधराव्या वयापर्यंत वर्षापर्यंत जवळपास 60% आणि अठराव्या वयापर्यंत 90% हाडांची पूर्णपणे वाढ झालेली असते. आपण एकदा का वयात आलो की त्यानंतर हाडांचा फारसा विकास होत नाही.
त्यामुळे या वयात हाडांची नीट काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी लहान मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. कारण या वयात सूर्यप्रकाशातून मुलांना त्वचेमार्फत आवश्यक तितकं व्हिटॅमिन डी मिळतं. मुलांना फक्त सूर्यप्रकाशात ठेऊ नये, तर त्यांना खेळू द्यावं. आऊटडोर गेम खेळल्याने मुलांच्या शरीराला लवचिकता मिळते. जर मुलांची शारीरिक हालचाल झाली नाही तर हाडं कमकुवत होऊ लागतात.
हे वाचा - तुम्हालाही रात्री झोपल्यानंतर भरपूर घाम येतो का? असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण
आहाराचं म्हणाल तर पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. दूध, दही, ताक, पनीर, सफरचंद, सीताफळ याचं सेवन करावं. मांसाहारी असल्यास अंडी, अंड्याचे पदार्थ, चिकन आणि माशांचे सेवन करावं. तळलेले पदार्थ आणि कार्बनयुक्त पेय हा़डांसाठी हानिकारक आहेत.
सूर्यप्रकाश आणि काही पदार्थांमधून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळत असताना, पालक सोपा मार्ग निवडतात. मुलांना व्हिटॅमिन डी टॅबलेट मुलांना द्यायचं का याबाबत अनेक पालक आम्हाला विचारणा करतात . मात्र जर नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळत असेल तर टॅबलेट घेण्याची गरज काय? कोणत्याही औषधात रासायनिक घटक असतो त्यामुळे गरजेशिवाय ते घेऊ नयेत.
हे वाचा - पावसाळ्यात कोरोनाव्हायरसचा धोका अधिक वाढणार; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?
मुलांना दुधाचा वास किंवा चव आवडत नाही, असं काही पालक सांगतात. अशावेळी तुम्ही मुलांना दुधात फ्लेव्हर अॅडक्टिव्हज टाकून देऊ शकता किंवा पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम मिळेल असे पदार्थ देऊ शकता. अन्नपदार्थांना पर्याय म्हणून सप्लिमेंट देणं योग्य नाही.
काही मुलांना लॅक्टोज इनटोलेरन्सची समस्या असते. त्यामुळे ते दूध पिऊ शकत नाही. अशा प्रकरणात जसजशी मुलं वाढत जातात तसतशी त्यांची ही समस्याही कमी होते. त्यामुळे एका विशिष्ट कालावधीपर्यंत तुम्ही मुलांना सप्लिमेंट्स देऊ शकता. मात्र दर सहा महिन्यांनी मुलांना दूध देण्याचा पर्यंत करा. जेव्हा तुम्हाला दूध प्यायल्यानंतर मुलांमध्ये कोणते दुष्परिणाम दिसणार नाहीत तेव्हा सप्लिमेंट देणं बंद करा.
वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत हाडांची घनता विकसित करणं गरजेचं आहे. हेल्दी बोन हे फिट लाइफसाठी खूप महत्त्वाचं आहे, हे कायम लक्षात ठेवा.
हे वाचा - झोपण्यापूर्वी त्वचेला खोबरेल तेल लावा; परिणाम पाहून सौंदर्यप्रसाधनं वापरणं सोडाल
लेखक - डॉ. संदीप पटवर्धन, पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट, संचेती इन्स्टिट्युट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.