मुकेश (बदललेलं नाव) मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये राहतो. गेल्या दोन वर्षांपासून तो स्पर्म डोनेशनचं काम करतो. त्याने शेअर केलेले त्याचे काही अनुभव. मार्च 2015 मध्ये एका दुपारी मी माझ्या लग्न झालेल्या मित्राच्या घरी होतो आणि त्याने दिलेल्या जेवणाऱ्या निमंत्रणाचा आनंद घेत होतो. या दरम्यान, मित्रानं अचानक त्याच्या कुटुंबनियोजनासाठी माझी मदत मागितली. कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीऐवजी तूच आमच्यासाठी स्पर्म डोनेशन का करत नाहीस? असा त्याचा मुद्दा होता. मित्राची बायको तिच्या मोठ्याल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. कामाच्या शोधात जेव्हा दिल्लीत आलो होतो, तेव्हा हाच मित्र माझा परिवार होता. आम्ही दोघं मूळचे एकाच शहरात राहणारे. माझ्यासारखंच बोलणारा, माझ्यासारख्याच खाण्यापिण्याच्या सवयी असणारा. माझा प्रत्येक विकेंड त्याच्या घरी जायचा. त्याची बायको एखाद्या मोठ्या बहिणीसारखी माझी काळजी घेत असे. मला या आपुलकीची किंमत द्यायची होती का? मनात चित्रविचित्र विचार येत असत. मी त्यांच्या घरी जाणंयेणं कमी केलं. मात्र तरीही ‘स्पर्महूड’ काही मनातून जात नव्हतं. मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो. स्पर्म देणं हे रक्त देण्यापेक्षाही सोपं आहे, हे माहित होतं. मात्र तरीही काहीतरी होतं, जे आड येत होतं. कदाचित माझं ग्रामीण भागात तयार झालेलं विचारविश्व किंवा मग शहरी भागात त्याच्यावर झालेले काही परिणाम. हे वाचा - #HumanStory : स्पर्म डोनरची गोष्ट! पॉकेटमनीसाठी केली सुुरुवात, आता वाटतं ही माझी मुलं आहेत? काळ जाईल तसतसे मित्र सेटल होत होते. नोकरी, लग्न, मुलंबाळं वगैरे. समुद्रकिनारी फिरायला जायचे आणि फेसबुकवर फोटो टाकायचे. बर्फात गेले की छान छान कॅप्शन लिहून फोटो टाकायचे. दुसरीकडे मी होतो. ग्रॅज्युएशन झाल्यावर सरकारी नोकरी शोधत होतो, जी अखेरपर्यंत मिळालीच नाही. दिल्लीत येऊन एमआर म्हणून मार्केटिंगला सुरुवात केली. बाईकवरून शहरभर फिरताना चेहरा धुळीनं आणि उन्हानं माखून जायचा. काम संपल्यावर घरी जाण्यापूर्वी जवळच्याच ढाब्यावर जेवण करायचो आणि झोपून जायचो. पडदे नसलेल्या बोडक्या खिडक्या, रंग उडालेल्या भिंती, पाणी कधी यायचं कधी नाही. गेल्या वर्षीच आई देवाघरी गेली. वडिलांना फोन केला की ते एकामागून एक अडचणी सांगत राहायचे.
आतापर्यंत अनेकदा रक्तदान केलं होतं. पहिल्यांदा स्पर्मदान करायला पोहोचलो होतो. नाव आणि ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर या कामाची सुरुवात केली. कलेक्शनसाठी एक कंटेनर आणि काही मासिकं यांच्यासोबत एका खोलीत ठेवण्यात आलं. दरवाजा आतून बंद करण्याची परवानगी होती. पुस्तकं एका बाजूला सारून मी मोबाईल हातात घेतला. कुठलाचा व्हिडिओ भावना जागृत करत नव्हता. असं वाटत होतं की जणू कुठली परीक्षा द्यायला आलो आहे. इजॅक्युलेट करायला वेळ लागला. बाहेर आल्यावर असं वाटलं की जणू सगळं जग माझ्याकडंच बघत आहे. मी सँपल जमा केलं आणि लगबगीनं तिथून बाहेर पडलो. प्रतिक्षा मोठी होती. जणू काही माझ्या पुरुषत्वाचाच कस लागणार होता. ‘आम्ही कुणाचेही स्पर्म घेऊ शकत नाही. एक अख्ख्यं जिवंत मूल जन्माला येत असतं. मोठ्या जबाबदारीचं काम असतं ते. डोनरचे तपशील घेण्यात येतात. रक्चाची चाचणी होते. स्पर्म काउंट टेस्टही होते. प्रत्येक मिलिमिटरला 60 मिलियन स्पर्म काउंट असलाच पाहिजे. यापेक्षा कमी असणारे सँपल आम्ही रिजेक्ट करतो.’ हे वाचा - #HumanStory : भाड्याने रडणाऱ्या ‘रुदाली’ची कहाणी, एका दिवसाला मिळायचे 50 रुपये ओखलातील क्रायो स्पर्म बँकेचे इनचार्ज सरत कुमार सांगतात, “स्पर्म क्वालिटीशिवायही अनेक गोष्टी असतात. अनेक क्लाएंट्सना स्पर्म डोनरचा धर्म आणि जात जाणून घेण्याची इच्छा असते. आम्ही या गोष्टी उघड करत नाही. अनेक लोकांची मागणी असते की डोनर हा उंच आणि हट्टाकट्टा असावा. गोरा असावा. या मागण्या विचारात घेऊन डोनरची निवड करावी लागते. प्रत्येक डोनरची फाईल मेेंटेन केली जाते, जेणेकरून क्लाएंटच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा करणं शक्य होईल.” स्पर्म डोनेशन हे परिचित व्यक्तींसाठीही केलं जाऊ शकतं, मात्र साधारणतः ओळख गुप्त ठेवली जाते. डोनरकडून कागदावर सही घेतली जाते, जेणेकरून भविष्यात त्याने कधीही ते आपलं मूल असल्याचा दावा करू नये.
क्वालिफिकेशन, रंग, उंची आणि वय या गोष्टी लक्षात घेऊन डोनर्सना ‘पे’ करण्यात येतं. एका डोनेशनसाठी 500 रुपयांपासून ते कित्येक हजार रुपयांपर्यंत पैसे देण्यात येतात. हॉस्पिटलमधून फोन आला. ब्लड टेस्टनंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली. मी पुन्हा एकदा वाट पाहत होतो. स्वतःला पुन्हा एकदा भानावर आणत आठवण करून दिली की तू फक्त एक डोनर आहेस. वहिनीचा गर्भपात झाला. अनेक दिवस मला त्या विचाराने त्रास होत होता. त्यांच्यासमोर चेहऱ्यावर कुठलेही भाव न आणता वावरावं लागत होतं. मला माझ्याच मुलाच्या मृत्यूचा शोक करण्याची परवानगी नव्हती. प्रक्रिया पुन्हा एकदा करण्यात आली. ते दोघंही दिवस मोजत असत. त्यांच्या प्रतिक्षा करण्याच्या प्रक्रियेत मीसुद्धा सहभागी होतो, पण फक्त एक मित्र म्हणून. हे वाचा - #HumanStory : गायी सांभाळण्यासाठी कसायाने सोडला पारंपरिक व्यवसाय इंटरनेटवर आणि हॉस्पिटलमध्ये स्पर्म देण्याची प्रक्रिया ही जितकी सोपी असल्याचं भासवलं जातं, तितकी ती नसते.
अचानक मला जबाबदारीची जाणीव होऊ लागली. त्या न पाहिलेल्या मुलाशी माझं नातं तयार होऊ लागलं होतं. ते माझं मूल असेल आणि आयुष्यात कधीही त्याला हे समजणार नाही की त्याचा वडील मी आहे. ते माझं मला माहित असलेलं पहिलं मूल असणार होतं. महिने सरत गेले, तशी माझी अस्वस्थता वाढत होती. विकेंडच्या आधीची रात्र मी सतत इंटरनेटरवर काही ना काही पाहत बसायचो. वेगवेगळे व्हिडिओ पाहून प्रेगनन्सी समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. मला बाळाची वाढ कशी होतेय, ते जाणून घेण्यात रस निर्माण होत होता. दोघं जेव्हा सोनोग्राफी करायला जायचे, तेव्हा मी अस्वस्थ व्हायचो. मलाही त्यांच्यासोबत आत जायचं असायचं. ते माझं मूल होतं. हे वाचा - #HumanStory : कुत्र्यांना ट्रेनिंग देणाऱ्या तरुणीची गोष्ट, याच कुत्र्यांनी भूकंपानंतर शोधले होते मृतदेह एका संध्याकाळी मित्राचा फोन आला. तो बायकोला घेऊन तिच्या माहेरी चालला होता. पहिलं बाळंतपण तिथंच होतं. अगदी सहजपणे त्याने ही गोष्ट सांगितली.
त्याचा आनंद जितका साहजिक होता, तितकाच माझा मानसिक त्रासही. पुढचे अनेक दिवस अस्वस्थता संपत नव्हती. अखेर एक दिवस मी काउन्सिलरकडे गेलो. हळूहळू आयुष्य पूर्वपदावर येऊ लागलं. मी मार्केटिंगसाठी चाललेलो असतो. गाडीवर असतानाच फोन येतो. मी गाडी बाजूला घेत मित्राशी फोनवर बोलतो. तो आनंदात असतो. मी त्याची आणि वहिनीची खुशाली विचारून फोन ठेवतो. अशा परिस्थितीत ओठांवर येणारा साहजिक प्रश्न मी अलगद गिळून टाकतो, ‘बाळ कुणासारखं दिसतंय?’