भेगाळलेल्या जमिनी, सुकलेले नदीनाले, पशुपक्ष्यांचे होणारे हाडाचे सांगाडे आणि मोजून पाण्याचे थेंब पिणारे जीव… महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचं हे चित्र. गरीबाच्या तिजोरीप्रमाणं सुकलेल्या बीड जिल्ह्यातील प्रत्येकाकडे त्याची एक गोष्ट असते. या सगळ्यात उठून दिसते एका पारंपरिक कसायाची गोष्ट. पाण्याविना तडफडून मरणाऱ्या गायींसाठी त्याने आपला पेशा सोडून दिला आणि गायी पाळायला सुरुवात केली. शब्बीर सय्यद यांना पूर्ण जिल्हा गो-सेवक मामू या नावाने ओळखतो. त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात.
काही वर्षांपूर्वी माझे अब्बू कसायाचं काम करायचे. हा बापजाद्यांपासून चालत आलेला त्यांचा पिढीजात व्यवसाय. धारदार सुरा घेऊन ते प्राण्यांच्या गळ्यावरून फिरवणं आणि नंतर त्यांचं मटण करणं हा माझ्या वडिलांचा व्यवसाय. या पिढीजात धंद्याची गणितं समजावीत म्हणून मलाही ते सोबत ठेवत असत. जेव्हा जेव्हा कुठल्याही जिवंत प्राण्याचं मटणात रुपांतर व्हायचं, माझा जीव कासावीस व्हायचा. मग एक दिवस वडिलांनी स्वतःच हे काम थांबवलं. ही सत्तरच्या दशकातील गोष्ट असेल.
शब्बीर यांना आजही तो दिवस आठवतो जेव्हा त्याच्या वडिलांनी कसायाचा व्यवसाय बंद करून गायी पाळायला सुरुवात केली. एका कसाई मित्राकडून आम्ही दोन गायी विकत घेतल्या. सगळे आमच्यावर हसत होते. खिल्ली उडवत होते. मात्र अब्बूंवर त्याचा काहीच परिणाम होणार नव्हता.
कत्तलखाना कसा चालवायचा हे माहित होतं. पण प्राण्यांचा सांभाळ कसा करायचा, याची काहीच माहिती नव्हती.
ते सकाळपासून रात्रीपर्यंत गोशाळेत काम करत असत. धारा काढणं, शेण काढणं, गोठा साफ करणं, गुरांच्या जखमेवर मलम लावणं ही कामं ते करायचे. जणू काही आपल्या मुलांची काळजी घ्यावी, तशी ते गायींची काळजी घ्यायचे. हळूहळू गायींचा परिवार वाढत होता. सुरुवातीला अनेक गायी आजारी असायच्या. त्यांचं दूध आटलेलं असायचं. आजारी वासरांनाही लोक रस्त्यावर सोडून द्यायचे. गायीवासरांना वाऱ्यावर सोडून देणं अब्बूंना मान्य नव्हतं. ते त्यांना आपल्यासोबत घेऊन येत आणि त्यांना तंदुरुस्त करत.
लोकांनी आता खिल्ली उडवणं कमी केलं होतं. आमचा कत्तलखाना गोशाळेत रुपांतरित झाला होता.
साधारण उंची असणाऱ्या शब्बीरला पांढरा कुर्ता आणि पायजमा घालण्याची हौस आहे. याच कपड्यात ते दिवसभर गायींची देखभाल करत असतात. दोन गायींपासून वडिलांची सुरु केलेलं हे कार्य शब्बीर यांनी पुढं ठेवलं आणि आता त्यांच्याकडे 170 पेक्षाही अधिक गायी आणि बैल आहेत.
ते सांगतात, बीडमध्ये प्राणी पाळणं हे एखादं मूल वाढवण्यापेक्षाही जास्त अवघड आहे. या भागात यापूर्वी कधी पाऊस पडला होता, कुणालाच आठवत नाही. गावातील म्हातारी माणसं एकेकाळी पाऊस पडायचा आणि शेतं हिरवीगार असायची, अशा गोष्टी ऐकवत असतात. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पिकं येत नाहीत, चारा महागला आहे आणि पाण्याचे सगळे प्रवाह आटून गेले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या गुरांना कत्तलखान्यात पाठवणं आणि वाऱ्यावर सोडून देण्याशिवाय लोकांकडे पर्यायही उरत नाही.
गायीबैलांची दिसणारी हाडं काळजात वेदना निर्माण करतात. पण कुणी काय करू शकतं?
शब्बीर यांनी एकदा एकाला गाय न विकण्याचा सल्ला दिला होता. त्यावर आम्हा दोन पाय असणाऱ्या माणसांना प्यायला पाणी नाही, तर चार पायाच्या प्राण्यांच्या पाण्याची सोय कुठून करावी, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावेळी शब्बीर यांनी गाय विकत घेतली आणि घरी आणली. गायींना वाचवण्यासाठी शब्बीर आणि त्याचे कुटुंबीय रात्रंदिवस मेहनत करतात. दुष्काळग्रस्त भागात पशुखाद्य विकणं, हाच या कुटुंबाच्या चरितार्थाचा एकमेव मार्ग आहे.
किती कमाई होते, असा प्रश्न विचारल्यावर हाताची बोटं मोजत शब्बीर सांगतात, वर्षाचे 70 हजार रुपये.
एवढ्या पैशात 13 लोकांचं कुटूंब आणि गायी या सगळ्यांची गुजराण होते. हे सोपं नाही. अनेकदा लोक मदतीसाठी मदत करतात. अनेकदा मी एका विशिष्ट धर्मातला आहे म्हणून लोक मदत करतात. अनेकांना माझ्या कामाचं कौतुक वाटतं म्हणूनही मदत करतात. मला लोकांच्या उद्देशाने फरक पडत नाही. गायी वाचल्या पाहिजेत, हाच माझा उद्देश आहे. दुष्काळात गायी पाळणं हे दुष्काळात शेती करण्याइतकं कठीण आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळ पडतो आहे. या काळात एकामागून एक 12 गायी पाण्याविना तडफडून मरण पावल्या.
त्यांना चारा आणि पाणी मिळावं, यासाठी मी जीवापाड प्रयत्न केले, पण मी अपुरा पडलो. त्यावेळी कित्येक दिवस त्या दुःखातून बाहेर येऊ शकत नव्हतो. जणू काही घरची बाळंच दगावली, असं वाटायचं. त्यानंतर आमच्याच जमिनीत चारा उगवायला सुुरुवात केली.
हे वाचा - #HumanStory: एका गावाची ‘खरी’ गोष्ट! इथं फक्त ‘पाण्यासाठी’ होतात लग्न
गोपालनाची माझा ध्यास आता पूर्ण कुटुंबाचा ध्यास झाला आहे. छोटे मोठे सगळेचजण गायींची काळजी घेत असतात आणि त्यांची देखभाल करत असतात. आर्थिक परिस्थितीमुळे एखादा बैल विकण्याची वेळ आली तरी आम्ही एक करार करूनच तो विकतो. करार असा की विकलेला बैल जर आजारी पडला, तर तो पुन्हा आम्हालाच विकावा लागेल. त्याला रस्त्यावर किंवा कत्तलखान्यात विकता येणार नाही. म्हाताऱ्या आणि आजारी बैलासाठीही आम्ही सर्वाधिक किंमत मोजतो, त्यामुळे लोक आम्हालाच बैल विकतात.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात राहणाऱ्या 57 वर्षांच्या शब्बीरना यंदा पद्मश्री पुरस्काराने केंद्र सरकारनं गौरवलं. सामाजिक कार्य आणि पशुकल्याणाच्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराविषयी आपल्याला फारशी माहिती नसली तरी हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असल्याचं ठाऊक आहे, असं शब्बीर म्हणतात. या पुरस्काराच्या रक्कमेतून गायीवासरांना चारा-पाणी मिळणार आहे, ही बाबच सर्वात महत्त्वाची असल्याचं ते सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Cow science, Human story