शिरीन मर्चंट कुत्र्यांना ‘मॅनर्स’ शिकवण्याचं काम करते. ती सांगते, 24 वर्षांपूर्वी जेव्हा मी हे काम सुरू केलं होतं, तेव्हा लोक हसायचे. तू हे काय करत आहेस, असं विचारायचे. तुला कुत्र्यांची भाषा येते काय? एखाद्या भुंकत असलेल्या कुत्र्याकडे पाहून विचारायचे की सांग बरं, हा काय म्हणतो आहे? आता हेच लोक आपल्या कुत्र्यांना घेऊन माझ्याकडे येतात आणि म्हणतात की कृपया त्यांना मॅनर्स शिकवा. डॉग बिहेवियरिस्ट शिरीन मर्चंट हिची ही गोष्ट.
जानेवारी 2001. थंडीच्या काळात मुंबई अधिकच चैतन्यपूर्ण होते. समुद्रातील पाणी असं उसळ्या मारत असतं जणू किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या लोकांशी गप्पाच सुरू आहेत.
तो दिवसही असाच होता. मॉर्निंग वॉक केल्यावर जड झालेले पाय, नारळ पाणी, वडापावचा सुवास, लोकलमधून पडणारे आणि लटकणारे लोक. तेवढ्यात बातमी आली. गुजरातच्या भूजमध्ये भूकंप झाला होता. जमिनीत मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. टीव्हीवर सगळीकडे किंचाळणारे आणि रडणारे चेहरे दिसत होते. मुंबईच्या वेगाला जणू खिळच बसली होती. प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करू लागला. माझ्याकडेही मदत करण्याचा एक मार्ग होता. माझे कुत्रे.
माझे दोन्ही कुत्रे क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये तज्ज्ञ झाले होते. ढिगाऱ्याखालून जिवंत किंवा मृत व्यक्तींना शोधून काढण्याचं काम ते अगदी लीलया करत असत. तीच त्यांची खासियत होती.
त्या परिस्थितीत एक एक क्षण महत्त्वाचा होता. भूजमध्ये लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं होतं. एकजणाने सांगितलं की आम्हाला कुत्र्यांची मदत वगैरे काहीच नको. मात्र मी प्रयत्न करतच राहिले. एक, दोन आणि तीन दिवस. तीन दिवसांनी आर्मीची एक तुकडी आम्हाला सोबत घेऊन गेली. सगळीकडे ढिगच ढिग पडले होते. एखादं खेळणारं मूल, ऑफिससाठी तयार होणारे वडील, स्वयंपाक करणारी त्याची आई हे सगळेच्या सगळे काही क्षणांत ढिगाऱ्याखाली गाडले गेले होेते. कुत्र्यांनी काम सुरू केलं. घटनेला तीन दिवस झाल्यामुळे कुणी जिवंत असण्याची शक्यता फारच कमी होती. मात्र मृतदेह बाहेर काढणं फारच गरजेचं होतं. ढिगाऱ्याबाहेर कित्येक डोळे त्यांच्याकडे आस लावून बसले होते. जिवंत गायब होण्यापेक्षा किमान मृतदेह सापडणं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता येणं, हासुद्धा या परिस्थितीत मोठा दिलासाच होता.
हे वाचा - #HumanStory : काय सुरू असतं तुरुंगातील गजांआड? एका निवृत्त जेलरचा भयाण अनुभव
त्या प्रशिक्षित कुत्र्यांनी एकामागून एक मृतदेह शोधून काढले. आम्ही परत आलो. थोडं लवकर काम सुरू केलं असतं, तर कदाचित काहीजणांना जिवंत असतानाही बाहेर काढता आलं असतं, असं वाटलं.
आयुष्यातील मोठा काळ कुत्र्यांसोबत घालवलेल्या शिरीनकडे आठवणींचा मोठा खजिनाच आहे. संगीत ज्याप्रमाणं वारशात मिळतं, त्याचप्रमाणं मला कुत्र्यांचं प्रेम वारशात मिळालं. मोठी होत गेले तसे घराबाहेरचे कुत्रे दिसायचे आणि त्यांचं वागणं पाहून वाईट वाटायचं. ऑफिसमधून घरी आलेले लोक कुत्र्यांवर आपला राग काढायचे. त्यांना लाथा मारायचे. कुत्र्याने काही ऐकलं नाही तर त्याला शिव्या द्यायचे. वॉकला जायचे तेव्हा कुत्रे रस्त्यात कसे अडून बसतात, ते दिसायचं. रस्त्यातील अनोळखी लोकांना पाहून आक्रमक व्हायचे.
मी कुत्रे आणि त्यांच्या मालकांच्या नात्यांवर काम करण्याचा निश्चय केला. तिथूनच माझं करिअर सुरू झालं.
इंग्लंडमध्ये चार वर्षांचं प्रशिक्षण घेऊन आणि अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबईत परत आले. काम सुरू केलं. कुत्र्यांच्या मालकांना भेटायचे. कुत्र्यांसोबत वागण्याच्या पद्धतींविषयी त्यांना सांगायचे. लोक हसायचे आणि म्हणायचे हे काय काय आहे का? तू तुझं काम कर, आमचं कुत्रं आम्ही सांभाळू, असं म्हणायचे. आता अनोळखी लोकही माझं काम ऐकून तिकडे लक्ष देतात. आता त्यांना कौतुक वाटतं. म्हणतात, अरे वा. हे तर वेगळंच काम आहे.
कुत्र्यांना मॅनर्स शिकवण्याची किती गरज आहे, हे त्यांना विचारा जे कुत्र्यांना घाबरतात. लोकं नटून थटून बाहेर पडलेले असतात आणि एखादा कुत्रा अचानक त्यांचा पाय पकडतो. आता जखमी पाय आणि फाटलेली पँट याच्यासह त्यांनी कुत्र्याच्या मालकाशी वाद घालत बसावं की हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घ्यावेत?
हे वाचा - #HumanStory: एका गावाची ‘खरी’ गोष्ट! इथं फक्त ‘पाण्यासाठी’ होतात लग्न
कुत्रेही लहान मुलासारखे असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. कुणी रागीट असतं, तर कुणी एकदम शांत. त्यांनाही मुलांसारखंच प्रेम करण्याची गरज असते. वेळ काढून त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं. अनेकदा मला रात्री अपरात्रीही फोन येतात.
घाबरलेल्या आणि काळजीच्या स्वरात एखाद्या कुत्र्याचा मालक सांगत असतो की माझा कुत्रा अगदीच हाताबाहेर गेला आहे. आता मी काय करू?
मी ट्रेनिंग द्यायला सुरूवात करते. मग अनेक माणसं दोन्ही बाजूंनी रडताना दिसतात. ट्रेनिंगला आणखी किती वेळ लागेल, यावरून किरकिर सुरू करतात. आम्हाला का होमवर्क देत आहेस? ट्रेनिंग कुत्र्यांची आहे, तर आमचा वेळ कशाला हवाय? मग मी सांगते की जरी कुत्र्यांचं ट्रेनिंग असलं तरी तुम्हालाच त्यांच्यासोबत राहायचं आहे. अनेकांना क्विक फिक्स स्वरुपाचा उपाय हवा असतो. लोकांना वाटतं की कुत्र्याला असं काहीतरी करता येत असावं जेणेकरून रातोरात त्याचं वागणं बदलले आणि तो शहाण्यासारखा वागू लागेल. अशा लोकांना मी परत पाठवते. कुत्र्यांना बेसिक ट्रेनिंग द्यायलाच 2 ते 3 महिने लागतात. त्यांना मुलांप्रमाणेच वेळ द्यावा लागतो.
काही लोक फोन करतात आणि त्यांच्याकडे किती मोठं घर आहे, हे सांगतात. घर मोठं आहे, पैसा आहे, सगळं काही आहे. आता आम्हाला कुत्रा पाळण्याचा ‘मूड’ आला आहे. मी त्यांना सांगते की कुत्र्याला यातलं काहीही नको असतं. त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो.
अनेकांना वाटतं की त्यांचा कुत्रा खूप गोड आहे, पण अचानक भडकतो, चिडतो. मालकालाच अनेकदा चावतो.
मग मी त्यांना लाईव्ह ट्रेनिंग देते. कुत्र्याची देहबोली ओळखण्याचं ट्रेनिंग. डोळे असे दिसतील, शेपटीची अशी हालचाल होत असेल किंवा शरीर कसं आवळून घेतलेलं असेल तर याचा अर्थ कुत्र्यांना राग आलेला असतो. त्यावेळी त्याच्याकडून काहीही अपेक्षा करू नये. कुत्र्यांनाही अनेकदा प्रायव्हसी हवी असते. जेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज काही खास इशारे देते, तेव्हा त्यांना एकांतात सोडून देणं गरजेचं असतं.
हे वाचा - #HumanStory : हजारो लोक होते संकटात; रियल लाईफ 'सिंघम'ने असे वाचवले प्राण
माझ्यासाठी हा पेशा नाही, पॅशन आहे. मध्यरात्री जरी कुणाचा फोन आला तरी मी तो टाळत नाही. उत्तर देते. काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्या बाईंचा फोन आला. त्यांना शहराबाहेर जायचं होतं आणि त्यांच्या दोन कुत्र्यांना कुठेतरी ‘ऍडजस्ट’ करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कुत्र्यांऐवजी तुमची मुलं असती, तर तुम्ही त्यांनाही असंच ऍडजेस्ट केलं असतं का, असा प्रश्न माझ्या तोंडी आला होता, पण मी तो गिळून टाकला. आईवडील जशी मुलांची जबाबदारी घेतात, तशीच कुत्र्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. किमान रातोरात त्यांना वेगळं तरी करू नका.
अनेकदा लोक विचारतात की मी काय करते. मी प्राण्यांच्या दोन जातींमधला हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Human story, Lifestyle, Owner of dog