मुंबई, 23 एप्रिल : माणसाला आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कुणाच्या तरी आधाराची गरज असते. कारण वृद्ध अवस्थेत पोहोचल्यानंतर शरीर कमकुवत होत जाते. हालचाल कमी झाल्यामुळे शारीरिक क्रिया देखील मंदावतात. त्यामुळं वृद्ध लोकांना अनेक आजारांचा सामना कारवा लागतो. हाडे कमकुवत होतात, त्वचा देखील निर्जिव होत जाते. मांसपेशी दुखणे, अपचन, दृष्टी कमी होणे अशा अनेक समस्यांचा सामना वृद्धत्वात करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्या घरातील वडिलधाऱ्या माणसांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. आज आपण समजून घेऊया की घरातील वृद्ध लोकांची काळजी कशी घ्यावी. आहाराची काळजी घ्या साठीनंतर शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे आहारात देखील काही बदल करण्याची गरज असते. एका दिवसात पुरुषांच्या शरीराला 2200 किलोकॅलरी आणि महिलांना 1800 किलोकॅलरीजची आवश्यकता असते. यासाठी भात, उपमा, इडली, चपाती या पदार्थांचा आहारात समावेश करावा. यातून भरपूर प्रमाणात कर्बोदके मिळतात आणि शरीराची उष्मांकांची गरज देखील पूर्ण होते. दूध आणि कॅल्शियमयुक्त पदार्थाचा आहारात समावेश केल्यास हाडे मजबूत होतात आणि ते ठिसूळ होत नाहीत. वृद्ध लोकांच्या आहारात मऊ आणि सहज चावून खाता येईल अशा अन्नाचा सामावेश करावा. अन्नात तेलाचा वापर कमी करावा. तसेच जेवणात हिरव्या पालेभाज्या आणि कोशिंबीरीचा समावेश असावा. मोसंबी, गाजर, संत्री, डाळिंब, पेरू हे फळं खाताना त्यांच्या बिया दातात अडकू शकतात त्यामुळे या फळांचा शक्यतो रस करून द्यावा. तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजेच डाळी, अंडी यांचा आहारात समावेश करावा. तसेच घरातील वृद्ध सदस्य दिवसातून किमान दोन ते तीन लीटर पाणी पितील याची काळजी घ्यावी. शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का? वृद्धांच्या आहारात काय टाळावे? आपल्या घरातील वृद्धांना चहा, कॉफी आणि शीतपेये अति प्रमाणात देऊ नये. कॉफीचा समावेश असलेले पदार्थ टाळावे. गोड पदार्थ म्हणजेच मिठाई, साखरयुक्त इतर पदार्थ आणि मीठ यांचा आहारात कमी वापर करावा. तसेच तळलेले आणि मसालेदार पदार्थ देणे टाळावे. यामुळे पचनसंस्थेला त्रास होणार नाही. सांधेदुखीचा त्रास असलेल्या वृद्धांना लोणचं, कैरी किंवा चिंच असे आंबट पदार्थ खायला देऊ नये.
डॉक्टरांच्या संपर्कात राहा तुमच्या घरातील वृद्ध सदस्यांना असलेल्या त्रासांबाबत संपूर्ण माहिती ठेवा. तसेच तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. वृद्ध सदस्यांना काही त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी दिलेले औषध आणि टॅब्लेट वेळेवर द्या. यामुळं त्यांना त्रास जाणवणार नाही. वारंवार डॉक्टर बदलू नका. कारण बर्याच वेळा दुसरे डॉक्टर औषधे, टॅब्लेट बदलतात, त्याचा वृद्धांना त्रास होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या काळजी घ्या वृध्द व्यक्तींमध्ये शक्तीचा अभाव असतो. त्यामुळे त्यांना काही कामं नीट करता येत नाहीत. त्यामुळं त्यांचं मानसिक आरोग्यही बिघडू शकतं. अशा परिस्थितीत घरातील तरुण सदस्याने त्यांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यांना मनोरंजनाचे साधनं उपलब्ध करून देणं. त्यांची दिनचर्या लक्षात ठेवणं आणि त्यांच्यासोबत गप्पांमध्ये वेळ घालवणं आणि त्यांना आनंद मिळेल अशा गोष्टी करणं महत्त्वाचे असतं. तसंच अनेक वृद्ध काही गोष्टी, रस्ता विसरतात, त्यामुळे त्यांना शक्यतो एकटे सोडू नका. उन्हाळ्याच्या दिवसात मुतखडा होण्याचा धोका जास्त; या काही गोष्टींची वेळीच घ्या काळजी तंदुरुस्त राहण्यास मदत करा वृद्धांसाठी तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळं त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करा. ते सक्रिय राहिले तर अनेक आजार त्यांच्यापासून दूर राहू शकतात. त्यामुळे त्यांना व्यायाम आणि योगा करण्यासाठी प्रोत्साहन द्या. तसेच शक्य असल्यास त्यांच्यासाठी काही छोटेमोठे कार्यक्रम करत राहा, यामुळे त्यांचा एकटेपणा दूर होईल.