मुंबई, 25 फेब्रुवारी : जेव्हा एखादी स्त्री लैंगिकदृष्ट्या अॅक्टिव असते आणि एकदा पाळी (Periods) आल्यानंतर पुन्हा महिनाभर तिला मासिक पाळी येत नाही , तेव्हा हे नक्कीच गर्भधारणेचं लक्षणं असू शकतं. पण केवळ मासिक पाळी न येणं हे एकच गर्भधारणेचं लक्षण असू शकत नाही. याशिवाय, इतरही अनेक लक्षणं आहेत , जी गर्भधारणा दर्शवतात. आजच्या काळात सर्व हार्मोनल समस्यांमुळे मासिक पाळी न येण्याची समस्या (Pregnancy Symptoms) आहे. मासिक पाळी चुकली तरच गर्भधारणेचा अंदाज लावणंही चुकीचं ठरू शकतं, असं मेयोक्लिनिकनं म्हटलं आहे. म्हणूनच मासिक पाळी न येण्याव्यतिरिक्त गर्भधारणेच्या इतर लक्षणांबद्दल जाणून घेऊ. गर्भधारणेची लक्षणं
- स्तनाच्या आकारात फरक
गर्भधारणा झाल्याच्या नंतर सुरुवातीच्या एक किंवा दोन आठवड्यांच्या आतच हार्मोन्समधील बदलांमुळं स्तनांमध्ये जडपणा जाणवतो. हे देखील गर्भधारणेचं लक्षण असू शकतं. त्याकडे दुर्लक्ष करू नका. मात्र, काही महिन्यांनी पुन्हा हार्मोन्समधील बदलांमुळे तो बरा होतो. हे गर्भधारणेचं पहिलं लक्षण मानलं जाऊ शकतं.
- उलटी किंवा उलटीची भावना होणं
जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेस म्हणजेच उलटी किंवा उलटीची भावना दिवसा-रात्री केव्हाही झाल्यासारखं वाटत असेल तर हे देखील गर्भधारणेचं लक्षण असू शकतं. हे लक्षण पहिल्या तिमाहीनंतर बऱ्याच लोकांसाठी संपतं.
- जास्त लघवी होणं
गर्भधारणेदरम्यान, शरीर जास्त रक्त तयार करतं. ज्यामुळं मूत्रपिंडं जास्त प्रमाणात द्रव फिल्टर करतात. त्यामुळं जास्त लघवीची समस्या निर्माण होते.
- थकवा
शरीरात अचानक थकवा जाणवणं हे देखील गर्भधारणेचं लक्षण असू शकतं. कधी कधी थोडा वेळ बसावंसं वाटतं किंवा काम करताना थकवा जाणवतो. हेही वाचा - गरोदरपणात नेमकी कोणती पुस्तके वाचावी, गर्भसंस्काराला आहे विशेष महत्त्व
- योनीमार्गातून रक्तस्राव
अनेक वेळा मासिक पाळी येत नाही पण योनीमार्गातून ठिपके येतील इतक्याच प्रमाणात रक्तस्राव होतो. ज्यामुळं स्त्रीला वाटतं की ती गर्भवती झालेली नाही. पण योनिमार्गातून थोडा-थोडा रक्तस्राव आणि पाळीप्रमाणे पेटके येणं हे देखील गर्भधारणेचं लक्षण आहे.
- वारंवार मूड बदलणं
गर्भधारणेनंतर शरीरात हार्मोन्समध्ये बदल सुरू होतात. अशा परिस्थितीत, राग, चिडचिड किंवा विनाकारण वारंवार मूड बदलण्याची समस्या असू शकते. हेही वाचा : प्रेग्नन्सीत कोणत्या कुशीवर झोपणे जास्त फायदेशीर
- शरीराचे तापमान वाढणं
गरोदरपणात शरीराचं तापमान थोडं जास्त राहतं. तेव्हा, जर तुम्ही मूल होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज तुमचं तापमान लिहून ठेवा. जर तुम्ही गर्भवती असाल तर, तुमच्या शरीराचं तापमान वाढलेलं दिसेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)