अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा, 20 मे: उन्हाळ्यात वड्या, पापड, शेवया तसेच विविध वाळवणीचे पदार्थ बनविले जातात. विदर्भात उन्हाळ्यामध्ये अनेक नवनवीन आणि चविष्ट पदार्थ बनविले जातात. यासाठी ग्रामीण भागातून अनेक महिला कार्यरत असतात. असाच सरगुंडे हा पदार्थ मुख्यतः ग्रामीण भागातून आलाय. गावकडील पारंपरिक नुडल्स असंही आपण या पदार्थाला म्हणू शकतो. वर्धासह विदर्भात मोठ्या प्रमाणात ग्रामीण महिला गव्हाच्या पिठापासून हे सरगुंडे बनवितात.
सरगुंडे म्हणजे काय?
एक गुळगुळीत काडी असते त्याला सर असेही म्हणतात. त्यावर भिजवलेलं पीठ एका विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात म्हणून याला सरगुंडे म्हणत असावेत. आपल्याला शेवळ्या माहीत आहेतच. तर शेवळ्या सारखाच सरगुंडे हा पदार्थ आहे. मुख्यतः उन्हाळ्यात ते बनविले जातात. या प्रकाराला ग्रामीण भागातच नाही तर छोट्या आणि मोठ्या शहरातही मोठी मागणी असते. गव्हाची पोळी खाण्यास कंटाळा करणारे चिमुकले हा पदार्थ मोठया आवडीने खातात. यामुळे आजकाल आई आपल्या मुलांसाठी हे सरगुंडे खरेदी करतात.
असे बनवा सरगुंडे?
गहू हे 5 ते 6 तास भिजत घाला. त्यानंतर पाण्यातून काढून त्यांना थोडा वेळ वाळू द्या. पिठाच्या गिरणी वरून त्याला बारीक दळून आणा. 2 ते 3 वेळा छान चाळून घ्या, जेणेकरून त्यातील कोंडा निघून जाईल. त्यानंतर थोडं मीठ घालून ते पांढरे शुभ्र पीठ कणकीप्रमाणे मळून घ्या. त्या भिजवलेल्या पिठाला काही वेळ झाकून ठेवा. त्यानंतर सरांवर त्या पिठाला बारीक गुंडाळून घ्या. सर पूर्ण भरल्यानंतर त्याला धूळ बसणार नाही अशाप्रकारे ठेवा आणि उन्हात वाळू द्या. ओलसर असतानाच सर काढून घ्यावी जेणेकरून बारीक तुकडे होणार नाहीत.
काय सांगता! नागपूरच्या कासवाला लागलं चिकनचं वेड, विश्वास बसत नसेल तर पाहा Video
विदर्भात आमरसासोबत खातात सरगुंडे
विदर्भात हे सरगुंडे उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा रस, पन्हं या गोड पदार्थांसोबत घरोघरी खाल्ले जातात. उन्हाळा आला की महिला सरगुंडे आणि वाळवणीचे पदार्थ बनविण्यास सुरवात करतात. दिवसेंदिवस सरगुंडे खाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. आंब्याच्या रसासह या सरगुंड्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर एका छोट्या गंजामध्ये पाणी घेऊन थोडंस मीठ घालून सरगुंडे उकळून घ्यावे. इतर ऋतूमध्येही मॅगी मसाला आणि इतर मसाले घालून फोडणी देऊनही चवदार सरगुंडे घरच्या घरी बनविता येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local Food, Local18, Wardha, Wardha news