विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 20 मे : नागपूरच्या खाद्य संस्कृतीमध्ये सावजीच्या नॉन व्हेज पदार्थांना मोठं महत्त्व आहे. सावजी चिकन आणि मटन हा नागपूरकरांचा आवडता मेनू आहे. अनेक पर्यटकही नागपूरला गेल्यावर या पदार्थांवर ताव मारतात. नागपूरच्या या सावजीचं वेड एका भल्या मोठ्या कासवाला देखील लागलंय. हा कासव फक्त आणि फक्त चिकनच खातोय. त्यामुळे याची नागपूरमध्ये चांगलीच चर्चा आहे.
काय आहे प्रकार?
नागपूरमधील नाईक तलावाच्या दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाचं काम सध्या महापालिकेकडून सुरू आहे. या कामाच्या दरम्यान तलावातील गाळ काढण्याचे काम करत असते वेळी एक भला मोठा कासव आढळला. त्यानंतर ट्रान्झिट टीमच्या कर्मचाऱ्यांनी या कासवाला सुखरूपणे तलावाच्या बाहेर काढलं.
नागपूरमधील सेमिनरी हिल्स भागातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला या कासवाची रवानगी करण्यात आलीय. डॉ. सुदर्शन काकडे यांच्या देखरेखीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या कासवाची लांबी ही 3 ते 4 फूट असून त्याचं वय 100 वर्षांच्या आसपास असावं असा अंदाज आहे.
कासवाला चिकनचं वेड
'आम्ही कासवाला सुरूवातीला झिंगे, लहान मासे, भाज्या हे पदार्थ दिले. पण त्यानं ते पदार्थ खाल्ले नाहीत. हा कासव फक्त आणि फक्त चिकन खातो. अन्य कोणतेही पदार्थ खात नाही. खाईन तर चिकनशी नाही तर राहीन उपाशी अशीच त्याची वृत्ती आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके यांनी दिली.
आकाशातून पक्षी थेट रस्त्यावर कोसळले, मुंबईतील घटना, काळजी करणारं कारण समोर, Video
नागपूरमधील नाईक तलावाच्या भागात अनेक सावजी हॉटेल आहेत. येथील स्थानिक नागरिक या कासवाला चिकन खाण्यास देत असतं. त्यामधूनच त्याला चिकनची गोडी निर्माण झाली असावी, असा अंदाज आहे, असंही रामटेके यांनी स्पष्ट केलं. हे कासव लहान असल्यापासून नाईक तलावाच्या परिसरात अनेकांनी त्याला पाहिलं आहे. पण, त्याचं सध्याचं विशाल रूप आणि चिकन प्रेम हे सर्वांनाच आश्चर्यचकित करणार आहे, असं नागपूरकर सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.