मुंबई, 23 ऑक्टोबर : सर्वोच्च न्यायालयानं दिवाळीत (diwali) ग्रीन फटाके (green crackers) वापरण्याचे आदेश दिले होते. सरकारही ग्रीन फटाक्यांनी दिवाळी साजरी (diwali celebration) करा असं आवाहन करतं. सध्या भारतात प्रदूषण वाढतं आहे, थंडीमध्ये प्रदूषण अधिक वाढण्याची चिंता व्यक्त केली जाते आहे. शिवाय थंडी, प्रदूषण आणि त्यात कोरोनाचं संकट अशी आव्हानं एकत्रं पेलावी लागतील. त्यामुळे कमीत कमी प्रदूषण होईल असे ग्रीन फटाके वापरून दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला जातो आहे. जेणेकरून प्रदूषणही कमी होईल आणि कोरोनाचा वाढता धोकाही टाळता येईल.
आता ग्रीन फटाके म्हणजे काय, हे फटाके सामान्य फटाक्यांपेक्षा वेगळे कसे, या फटाक्यांमध्ये काय असतं, इतर फटाक्यांंप्रमाणेच हे फटाके फुटतात मग त्यांच्यामुळे प्रदूषण कमी कसं काय होतं, असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
दिवाळीला फटाके फोडल्यावर विशेषत: दिल्ली, दिल्ली एनसीआर आणि जवळच्या परिसरातील हवा विषारी व्हायची आणि प्रदूषणाचं प्रमाण अचानक प्रचंड वाढायचं त्यामळे श्वास घेणं कठीण व्हायचं. अशावेळी कमी प्रदूषण करणारे आणि कमी त्रासदायक फटाके तयार करण्याची गरज भासू लागली. यानंतर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं (निरी) असे फटाके विकसित करायला सुरुवात केली आणि शास्रज्ञांनी हे ग्रीन फटाके विकसित केले.
औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआईआर) संबंधित निरीने तयार केलेले फटाके पारंपरिक फटाक्यांसारखेच असतात. हे फटाके दिसायला, वाजायला आणि उडायला नेहमीच्या फटाक्यांसारखेच असल्यामुळे दिवाळीचा आनंद कमी होत नाही. इतर फटाके फोडताना जितकी मजा येते, तितकीच मजा हे फटाके फोडतानाही येते. पण या फटाक्यांमुळे प्रदूषण 50 टक्क्यांनी कमी होतं. कारण हे फटाके विषारी वायू सोडत नाहीत.
निरीने आतापर्यंत 3 प्रकारचे फटाके तयार केले आहेत.
1. सेफ वॉटर रिलिजर – हे फटाके जळतानाच पाणी निर्माण करतात त्यामुळे सल्फर, नायट्रोजनसारखे त्रासदायक वायू त्या पाण्यात विरघळून जातात. त्या फटाक्यांना सेफ वॉटर रिलीजर म्हणतात.
2. स्टार क्रॅकर्स – दुसरे स्टार क्रॅकर्स. हे नेहमीच्या फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात सल्फर, नायट्रोजन उत्सर्जित करतात. यात अॅल्युमिनियमदेखील खूप कमी प्रमाणात वापरतात.
3. अरोमा क्रॅकर्स - तिसरे अरोमा क्रॅकर्स. जे कमी प्रदूषणाबरोबरच वातावरणात सुगंध पसरवतात.
आता तुम्हाला ग्रीन फटाक्यांनी दिवाळी साजरी करायची आहे, पण असे फटाके मिळतील कुठे, असा प्रश्नही पडला असेल. सामान्यपणे बाजारात विकल्या जाणाऱ्या फटाक्यांचं उत्पादन तामिळनाडूतल्या शिवकाशीमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. रिपोर्ट्स नुसार आता शिवकाशीतही ग्रीन फटाके तयार केले जात आहेत जे इको - फ्रेंडली आहेत. शिवकाशीत 1000 फटाका फॅक्टरी आहेत ज्या वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात ग्रीन फटाके तयार करतात. त्यांची उलाढाल हजारों कोटी रुपयांची आहे.
हे वाचा - दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत
खरं तर जुने प्रदूषण पसरवणारे फटाके विकण्यावर आता बंदी आहे. त्यामुळे बहुतेक फटाके बनवणाऱ्या कंपन्यांनी ग्रीन फटाके तयार करायला सुरुवात केली आहे. याचं लायसन्स असलेल्या सगळया फटाक्यांच्या दुकानांत ग्रीन फटाके उपलब्ध असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali, Eco friendly, Laxmi pujan