मुंबई, 13 नोव्हेंबर : दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. दिवाळीत मोठ्या प्रमाणात मिठाई आणि दिवाळी फराळाचे पदार्थदेखील केले जातात. सध्या कोरोनाच्या संकटात बाजारातून मिठाई आणणं दरवर्षीच्या दिवाळीप्रमाणे नाही. बाहेरील मिठाईंमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्याशिवाय भेसळीचा देखील धोका असतो. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. डायबिटीस असणाऱ्या नागरिकांना देखील भेसळीमुळे दिवाळीत मिठाई खाताना साशंकता वाटते. शुगर फ्री मिठाई तुमच्या घरी देखील तयार करू शकता. घरातील कुटुंबियांसोबत हे पदार्थ तयार करण्याची मजा घेऊन तुम्ही पदार्थांचा देखील आस्वाद घेऊ शकता. ड्रायफ्रुट आणि खजूर लाडू: दिवाळीमध्ये शुगर फ्री लाडूसारखा पदार्थ असल्यास आणखी काय हवं? बदाम, पिस्ता, काजू, खजूर आणि अंजीर हे एकत्र करून पिठाचा गोळा तयार करा. त्याचबरोबर लाडूमध्ये गोडपणा येण्यासाठी मधाचा वापर करून तुम्ही लाडू वळू शकता. सीताफळ खीर: सणासुदीच्या दिवसात खीर ही जवळपास प्रत्येक घरात बनवली जाते. दिवाळीच्या दिवशी खीरचा आस्वाद घेत तुम्ही दिवाळी साजरी करू शकता. यासाठी तुम्ही सीताफळ, गूळ पावडर, नारळाचं दूध आणि विविध ड्रायफ्रूट वापरून खीर तयार करू शकता. बदाम आणि पिस्ता वापरून खीरीची सजावट करू शकता. (वाचा - DIWALI SHOPPING करताना घरी आणू नका कोरोना; गर्दीत असा करा स्वत:चा बचाव ) बदामाची बर्फी: नवीन पद्धतीची ही बर्फी तुमच्या दिवाळीच्या आनंदात आणखी भर पाडेल. भाजलेले आणि बारीक केलेले बदाम वापरून तुम्ही ही बर्फी तयार करू शकता. यात खवा वापरून तुम्हाला हव्या त्या आकाराची बर्फी तयार करू शकता. ही बर्फी ओव्हनमध्ये बेक करून तयार करू शकता, त्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणताही धोका न पोहोचता तुम्ही यांचा आस्वाद घेऊ शकता. (वाचा - कोरोनाचं भान ठेवा! दिवाळीनिमित्त घरी पार्टी करताना ही काळजी घ्या ) गाजर हलवा: देशातील सर्वात लोकप्रिय पक्वान्न म्हणून गाजराचा हलवा ओळखला जातो. किसलेलं गाजर हळूहळू दुधामध्ये उकळल्याने त्याला एक वेगळाच स्वाद येतो. यामध्ये साखरेच्या ऐवजी मध आणि गुळाचा वापर करून शुगर फ्री हलवा तयार करू शकता. (वाचा - तुम्ही घेतलेला हिरा खरा आहे की खोटा? घरच्या घरी कसा तपासून पाहाल? ) पायनॅपल राईस पुडिंग: नारळाच्या दुधात शिजवलेल्या तांदळाबरोबर गवती चहा, लिंबाची पानं, दालचिनी, वेलची आणि जायफळचा सुगंध तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देतील. त्याचबरोबर यात टाकलेल्या पाईनॅपलमुळे याचा स्वाद अधिकच खुलून येतो. यात साखर घालण्याची देखील आवश्यकता नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.