

दिवाळीची सुरुवात झाली आहे. काल वसुबारस, आज धनत्रयोदशी आणि उद्या नरक चतुर्दशी. कोरोनाव्हायरसच्या संकटात सण घरीच आणि साधेपणानं साजरा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तरी लोकांना आता कोरोनाची भीती राहिली नाही असाच प्रश्न हे फोटो पाहिल्यावर वाटेल. ही दृश्यं आहेत मुंबईतील दादर मार्केटमधील.


दादर मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदीनिमित्त लोकांची झुंबड उडालेली दिसते. पहाटेपासूनच लोक खरेदी करू लागलेत. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसतो आहे. लोक घराबाहेर पडून गर्दी करू लागले आहेत. अशाच गर्दीत तुम्हालाही जावं लागलं, तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नसेल तर मग अशा वेळी कोरोनापासून स्वत:चा बचाव कसा कराल पाहुयात.


कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी सर्वात पहिलं हत्यार आहे ते म्हणजे मास्क. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क घालूनच घराबाहेर पडा. मास्क फक्त दाखवण्यासाठी तोंडावर ठेवू नका. तोंड आणि नाक नीट झाकलं जाईल याची काळजी घ्या.


घराबाहेर पडण्याआधी तुमच्या बॅगेत किंवा खिशात सॅनिटायझर आहे ना याची खात्री जरूर करा. गर्दीच्या ठिकाणी वस्तूंना स्पर्श केल्यानंतर या सॅनिटायझरचा वापर जरूर करा. कारण कोणत्याही पृष्ठभागावर कोरोना असू शकतो.


सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग राखा. जिथं खूप गर्दी आहे, सोशल डिस्टन्सिंग राखू शकत नाही, तिथं जाणं टाळा.