मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मधुमेहाबद्दलचे 5 गैरसमज, जे लोकांना वाटतात खरे! जाणून घ्या त्यामागील सत्य

मधुमेहाबद्दलचे 5 गैरसमज, जे लोकांना वाटतात खरे! जाणून घ्या त्यामागील सत्य

हे आहेत मधुमेहाबाबतचे 5 गैरसमज

हे आहेत मधुमेहाबाबतचे 5 गैरसमज

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 जानेवारी : सध्या मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे पीडित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते मधुमेह वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपली बैठी जीवनशैली आणि आपल्या खाण्याच्या सवयी. मधुमेहावर योग्य ते उपचार घेऊन नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र लोकांमध्ये मधुमेहाबद्दल काही गैरसमज आहेत, जे त्यांना खरे वाटतात. आज या लेखातून आम्ही मधुमेहाबद्दलच्या अनेक प्रश्नांचे उत्तर देणार आहोत.

मुंबईतील शिल्‍पा मेडिकल रिसर्च सेंटरचे कन्‍सल्‍टण्‍ट फिजिशियन व डायबेटोलॉजिस्‍ट आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स इंडियाचे सेक्रेटरी-जनरल डॉ. मंगेश तिवस्‍कर म्‍हणाले, ‘‘भारतातील मधुमेही व्‍यक्‍तींपैकी जवळ-जवळ तीन चतुर्थांश व्‍यक्‍तींमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अनियंत्रित आहे आणि त्यापैकी निम्म्या व्‍यक्‍तीमध्ये रक्तदाब नियंत्रण कमी आहे. तसेच त्यांच्यापैकी किमान एक तृतीयांश व्‍यक्‍तींमध्‍ये कोलेस्ट्रॉल आणि लिपिड वाढले आहे. या चयापचय विकृतींच्‍या सामान्य कारणांमध्‍ये उपचारांचे पालन न करणे, डॉक्टरांना वारंवार भेट न देणे आणि अयोग्‍य व्यवस्थापित मधुमेहाच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल जागरूकतेचा अभाव यांचा समावेश आहे.’’

डायबिटीजमुळे जाऊ शकते दृष्टी! डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

अॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सचे संचालक अभिजीत पेडणेकर म्‍हणाले, ‘‘मधुमेह व्यवस्थापन ही कायम चालणारी प्रक्रिया आहे, जी समग्र आणि वैयक्तिक असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये आहार व जीवनशैलीतील बदल, प्रीस्‍क्राइब केलेल्‍या औषधोपचाराचे पालन आणि नियमितपणे रक्‍तातील साखरेची तपासणी यांचा समावेश आहे. ज्यामुळे व्यक्तींना एकत्रितपणे मधुमेह व्यवस्थापित करण्यास मदत होऊ शकते. रक्‍तातील साखरेच्‍या पातळीवर उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवत व्‍यक्‍ती आरोग्‍यदायी जीवन शकते.’’

1. गोड पदार्थांमुळेच मधुमेह होतो

मधुमेह हा विविध घटकांशी संबंधित जटिल आजार आहे. यामध्‍ये वजन अधिक असणे किंवा लठ्ठपणा, बैठेकाम करण्‍याची जीवनशैली, अनारोग्‍यकारक आहाराचे सेवन असे विविध घटक आहेत. तसेच मधुमेह असण्‍याचा कौटुंबिक इतिहास यासारखा अनुवांशिक घटक देखील कारणीभूत ठरू शकतो. मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना गोड पदार्थांच्‍या सेवनावर नियंत्रण ठेवण्‍याचा सल्‍ला दिला जातो, पण फक्‍त गोड पदार्थांमुळेच मधुमेह होतो असे अजिबात नाही.

तरीदेखील गोड पदार्थांच्‍या सेवनावर नियंत्रण ठेवा, संयम महत्त्वाचा आहे. साखरेचे उच्‍च प्रमाण असलेल्‍या आहारामधून कॅलरींचे प्रमाण वाढते, ज्‍यामुळे वजन वाढू शकते आणि परिणामी मधुमेह होण्‍याचा धोका वाढू शकतो. म्‍हणून योग्‍य संतुलनासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स पर्याय आणि जास्त फायबर असलेले पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करा.

2. मधुमेह बरा होऊ शकतो

दुर्मिळ केसेसमध्‍ये मधुमेह बरा होऊ शकतो. मात्र बहुतांश केसेसमध्‍ये मधुमेह झाल्‍यास तो आजीवन आजार आहे. पण मधुमेह झाल्‍याने घाबरण्‍याची गरज नाही. या आजाराचे प्रभावी व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी अनेक मार्ग आहेत. प्रीस्‍क्राइब केलेले औषधोपचाराचे योग्‍य पालन, आहार व जीवनशैली बदल, तसेच रक्‍तातील साखरेच्‍या पातळ्यांवर लक्ष ठेवणे. ही काळजी घेतल्यास मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. वैयक्तिक केसेसमध्‍ये कोणते मधुमेह व्‍यवस्‍थापन सर्वोत्तम ठरते याबाबत डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करत व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या रक्तातील साखरेच्‍या पातळीवर नियंत्रण ठेवू शकतात आणि योग्‍य आरोग्‍य राखू शकतात.

3. मधुमेहाचा फक्‍त शरीराच्‍या रक्‍तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो

मधुमेह हा गंभीर आजार आहे, ज्‍याचा शरीर रक्‍तातील साखरेचा कशाप्रकारे वापर करते यावर परिणाम होतो. संशोधनातून निदर्शनास येते की, विशेषत: हा आजार अनियंत्रित असल्‍यामुळे इतर संबंधित जटिलता निर्माण होऊ शकतात. जसे हृदय, डोळा, मूत्रपिंड, रक्‍तवाहिन्‍या किंवा पायाशी संबंधित समस्‍यांचा धोका वाढू शकतो. यामुळे मधुमेहाचे वेळेवर व्‍यवस्‍थापन करणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना नियमितपणे आरोग्‍य तपासणी करण्‍याचा, त्‍यांच्‍या आरोग्‍यावर बारकाईने लक्ष ठेवण्‍याचा सल्‍ला दिला जातो. यामुळे कोणत्‍याही समस्‍यांचे त्‍वरित निदान होऊन त्‍यांचे निराकरण करता येते.

4. काही प्रकारचे मधुमेह इतरांपेक्षा सौम्‍य असतात

मधुमेह टाइप 1, टाइप 2 आणि गेस्‍टेशनल (गरोदर असताना) असा विविध प्रकारचा असला तरी त्‍यांना सौम्‍य किंवा गंभीर म्‍हणून परिभाषित करता येऊ शकत नाही. सर्व प्रकारच्‍या मधुमेहांमध्‍ये अनियंत्रण असल्‍यास त्‍याचे गंभीर, दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. असे असले तरी मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती प्रकाराची पर्वा न करता योग्‍य मधुमेह व्‍यवस्‍थापनासह आरोग्‍यदायी, उत्तम जीवन जगू शकतात.

Diabetes And Physiotherapy : फिजिओथेरपीद्वारे खरंच डायबिटीज कंट्रोल होऊ शकते का?

5. आहार व जीवनशैली बदलांसह मधुमेहाचे पूर्णपणे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते

रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढवणाऱ्या विशिष्‍ट खाद्यपदार्थांचे कमी प्रमाणात सेवन आणि आरोग्‍यदायी फिटनेस नित्‍यक्रमाचा अवलंब मधुमेहाच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी महत्त्वाचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की, फक्‍त इतकेच उपाय मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या आजाराचे संपूर्ण व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी पुरेसे आहे. या आजाराबाबतची तथ्‍ये जाणून घेतल्‍याने काळजी घेण्‍याचा प्रवास कमी जटिल होऊ शकतो. वैद्यकीय मार्गदर्शनाचे पालन आणि वैयक्तिक स्थितींसाठी कोणता उपाय चांगला आहे, यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घेणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. यामुळे व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या मधुमेहाचे उत्तमप्रकारे व्‍यवस्‍थापन करण्‍यात सक्षम होऊ शकतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tips for diabetes