मुंबई, 10 जानेवारी : हल्ली आपली जीवनशैली खूप बदलली आहे. वेळेच्या अभावामुळे आपल्याला आपल्या आहाराकडे आणि दैनंदिन व्यायामाकडे फारसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे अनेकांना जीवनशैली प्रभावित करणारे मधुमेहासारखे आजार जडत आहेत. बहुतेक लोकांना मधुमेहामुळे शरीराचे काय काय नुकसान होऊ शकते याबद्दल पूर्णपणे माहिती नसते. विशेषत: जेव्हा ते आपल्या डोळ्यांच्याबाबत असते. मधुमेह झाल्यास दृष्टी धुसर होण्याची आणि अंधत्व येण्याचा धोका असतो.
डायबेटिक रेटिनोपॅथी, मोतीबिंदू आणि काचबिंदू, दुहेरी दृष्टी आणि लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता यासारख्या इतर गुंतागुंतांसह मधुमेहामुळे दृष्टी कमी होऊ शकते. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशननुसार, बहुतेक देशांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी हे अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे मान्य केले जाते. त्यामुळे मधुमेहात डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असते. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
साध्या वाटणाऱ्या या सवयींमुळे डोळ्यांचे होते नुकसान! तुम्ही अशी चूक करत नाही ना?
दृष्टी चांगली ठेवण्यासाठी या बाबी ठेवा लक्षात
धूम्रपानामुळे धूसर होते दृष्टी : धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर धूम्रपान करणे खूप धोकादायक आहे. अजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, धूम्रपानामुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या नसा, पेशी आणि रक्तवाहिन्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. मधुमेहींनी धुम्रपान केल्यास त्यांना अंधत्व देखील येऊ शकते.
पौष्टीक आहार घ्या : पौष्टिक आहार घेतल्याने शरीर आणि डोळे निरोगी ठेवता येऊ शकतात. आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्याने दृष्टी अधिक तीक्ष्ण होते असे देखील सांगितले जाते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात संतुलित आहार घेणे आणि शरीराला सर्व प्रकारची पोषक तत्वे मिळतील याची काळजी घेणे महत्वाचे असते.
रक्तातील साखरेची पातळी : रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास डोळ्यांच्या लेन्सचा आकार बदलू लागतो आणि अस्पष्ट दिसू लागते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास तुमच्या डोळ्यांच्या रक्तपेशींवरही खूप वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत तुमची साखरेची पातळी वेळोवेळी तपासून ही समस्या टाळू शकता.
नियमित व्यायाम करा : नियमित व्यायाम केल्याने डोळ्यांसह संपूर्ण शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवता येते. व्यायामामुळे मधुमेहावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे दररोज किमान अर्धा ते एक तास व्यायाम करावा. तसेच कोणताही नवीन व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
हे आजारही कारणीभूत : तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर दृष्टीच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नेहमी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवा. या दोन्ही आजारांची पातळी नियंत्रणात ठेवणे केवळ डोळ्यांसाठीच नाही तर तुमच्या एकूण आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Eyes damage, Health, Health Tips, Lifestyle