नवी दिल्ली, 4 जून: निळंशार दिसणारं, स्वच्छ, सुंदर पाणी पाहायला कोणाला आवडत नाही बरं! किंबहुना असे तलाव, नद्या, समुद्र पाहण्यासाठीच तर पर्यटक फिरायला जातात. जिथे आणि ज्यांना पोहणं शक्य असेल, तिथे पोहण्याचा आनंद घेतला जातो. ज्यांना परदेशी जाणं शक्य असतं, ते युरोपात जातात. कारण तिथलं क्रिस्टल क्लिअर वॉटर (Crystal Clear Water) अर्थात नितळ पाणी त्यांना तिकडे आकर्षून घेत असतं. युरोपीय देशांमध्ये सर्वांत नितळ आणि स्वच्छ पाणी असल्याचा मान सायप्रस (Cyprus) या देशाला मिळाला आहे.
युरोपीय पर्यावरण यंत्रणेने (European Environment Agency) पाण्याच्या स्वच्छतेच्या निकषांच्या आधारे 2020च्या पोहण्याच्या हंगामातली क्रमवारी जाहीर केली. त्यात सायप्रसने पहिला क्रमांक पटकावला आहे. 'असोसिएटेड प्रेस' या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
युरोपातल्या 27 देशांपैकी सायप्रस, ऑस्ट्रिया, ग्रीस आणि माल्टा या चार देशांनी अनुक्रमे पहिले चार क्रमांक पटकावले आहेत. एक मे ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत या देशांमधल्या पोहण्याच्या ठिकाणांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात सायप्रसमधल्या पोहण्याच्या 112 ठिकाणांमधला पाण्याचा दर्जा अत्युत्तम होता आणि त्यासाठीच्या ठरवलेल्या निकषांनुसार 100 टक्के गुण सायप्रसला देण्यात आले.
हे वाचा: भरपूर पाणी प्यावं, पण म्हणजे किती? तुम्ही अती पाणी तर पीत नाही ना?
यामुळे सायप्रस या देशातल्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे. सायप्रसच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) पर्यटनाचा (Tourism) वाटा 13 टक्के आहे. 2019मध्ये सायप्रसचा पर्यटन हंगाम विक्रमी कामगिरी करणारा ठरला होता. त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे 2020मध्ये त्यात तब्बल 84 टक्क्यांनी घट झाली. सरकारचं साह्य नसेल तर सलग दुसऱ्या वर्षी पर्यटन व्यावसायिक एवढा मोठा आर्थिक धक्का सहन करू शकत नाहीत, असं या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर, यंदाचा पर्यटन हंगाम उत्तम ठरण्यासाठी पर्यावरण यंत्रणेकडून झालेल्या कौतुकाचा मोठा उपयोग सायप्रसला होणार आहे.
तसंच, कोविड-19 संसर्गाचा विचार करायचा झाल्यास अख्ख्या युरोपात डेन्मार्क आणि सायप्रस या दोन देशांत सर्वांत कमी आहे. तसंच कोरोनाप्रतिबंधक लशीचा (Vaccination) कमीत कमी एक डोस मिळालेल्या लोकसंख्येचा विचार केल्यास त्यात सायप्रस युरोपात तिसऱ्या स्थानावर आहे, अशी माहिती सायप्रसच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.
हे वाचा: अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?
ब्रिटनमधून (UK) सायप्रसमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे सायप्रस हा देश ब्रिटनकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहतो. ब्रिटिश यंत्रणेने त्यांच्या 'ग्रीन लिस्ट'मध्ये सायप्रसचा समावेश करावा, तसंच त्यानंतर पर्यटन आयोजक यंत्रणांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, यासाठी सायप्रसचे उप-पर्यटनमंत्री साव्हास पर्डिओस ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले आहेत. 'ग्रीन लिस्ट'मध्ये सायप्रसचा समावेश झाल्यास तिथे पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांना मायदेशी परतल्यावर क्वारंटाइन राहावं लागणार नाही.
Shocking! सेक्स डॉलशी लग्न करणाऱ्या बॉडीबिल्डरने डेटिंगसाठी घातली विचित्र अट
सायप्रसचे पर्यावरणमंत्री कोस्टास काडिस यांनी पाण्याचा दर्जा आणि पर्यटन यातला परस्परसंबंध उलगडून सांगितला. 'पोहण्याच्या पाण्याचा दर्जा आणि पर्यटन यात थेट संबंध आहे. कारण ते पोहणाऱ्यांच्या आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी तर आवश्यक आहेच; पण सायप्रसच्या अर्थव्यवस्थेसाठीही अत्यंत आवश्यक आहे,' असं ते म्हणाले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Environment, Freshwater, Sea