नवी दिल्ली, 28 जानेवारी : कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे मास्क (Mask) ही आपली गरज बनली आहे आणि एखादया स्किन केअर किंवा जीवनशैलीप्रमाणे आपण मास्कशी जुळवून घेत त्याला स्वीकारलं आहे. मास्क हे एखाद्या कापडापासून तयार केलेले असतात. ते जेव्हा खराब होतात तेव्हा ते धुणं किंवा नीट स्वच्छ करणंआवश्यक आहे. पण ते किती वेळा आणि कसं ते जाणून घेणं गरजेचं आहे.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) यांच्या म्हणण्यानुसार मास्क धुण्याची नियमितता त्याच्या वापरण्यावर तसंच तुम्ही कोणत्या प्रकारचा मास्क वापरता यावर देखील अवलंबून आहे. तुम्ही जर डिस्पोझेबल मास्क (Disposable Mask) वापरत असाल तर काही प्रश्नच उदभवत नाही. असे मास्क एकदाच वापरून फेकून देणं आवश्यक आहे. मात्र कापडी किंवा N95, N99 मास्कचा प्रश्न कायम राहतो. मास्क कोणताही असला तरी त्याचा तुमच्या तोंड आणि नाकाशी थेट संपर्क येतो. त्यामुळे मास्क निर्जंतुक असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या श्वसनसंस्थेत (Respiratory Track) व्हायरल कण असतील तर ते मास्कच्या कापडावर राहू शकतात.
फोर्टीस मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्युटच्या डॉ. बेला शर्मा यांनी याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, प्रत्येक वेळा वापरानंतर कापडाचे मास्क धुवून स्वच्छ करणं आवश्यक आहे. जर तुम्ही दोन मास्क जवळ बाळगले तर त्याचा वापर करणं सोयीस्कर ठरतं. म्हणजे एक मास्क धुतला तर प्रसंगी दुसरा मास्क वापरता येतो. जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्राव्यतरिक्त अन्य क्षेत्रात कार्यरत असाल तर N95 मास्क धुवून पुन्हा वापरू शकता. पण तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात म्हणजेच डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी किंवा प्रशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर तुम्ही एक मास्क फक्त 5 दिवस वापरून तो टाकून देणं गरजेचं आहे.
हे वाचा - लसीकरणाआधी 2 गोष्टी करणं MUST; तर अधिक प्रभावी ठरेल कोरोना लस
निर्जंतुकीकरणाच्या नियमांचं योग्य पालन केलं तर दररोज वापरासाठी तुम्हाला दर आठवड्याला नवीन मास्क खरेदी करण्याची गरज नाही. तातडीची गरज म्हणून तुम्ही सॅनिटायझर स्प्रे (Sanitiser Spary) वापरू शकता. पण साबणाप्रमाणे यामुळे अन्य विषाणू किंवा सुक्ष्मजीवांपासून तुमचं संरक्षण होईलच असं नाही. कोरोना विषाणू नष्ट होण्यासाठी साबणाचा वापर अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात लिक्विड साबण टाकून त्या द्रावणात मास्क धुवू शकता. पण नळाच्या वाहत्या पाण्याखाली मास्क धुणं जास्त चांगलं असल्याचे सीडीसीचं म्हणणं आहे. असं करताना कापडावरील साबण पूर्णपणे धुतला गेला आहे ना याची देखील खात्री करणं गरजेचं आहे.
त्याबरोबरच वॉशिंग मशीनमध्ये अन्य कपड्यांबरोबरही मास्क धुतला जाऊ शकतो. पण हे मास्कच्या कापडावर अवलंबून आहे. तसंच मास्कच्या कापडानुसार वॉशिंग मशीन सेट करणं गरजेचं आहे. धुतल्यानंतर मास्क सूर्यप्रकाशात नीट वाळवावा. ओला मास्क वापरू नये, असं सूत्रांनी सांगितलं.
काही महिन्यांसाठी कापडी मास्क धुवून पुन्हा वापरता येतो. पण यामुळे मास्क खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे वारंवार मास्कची तपासणी करणं आवश्यक आहे. मास्कची गुणवत्ता तपासण्यासाठी मास्क उजेडासमोर धरावा, जर मास्कवरील सूक्ष्म छिद्रातून प्रकाश आरपार गेला तर तातडीने तो मास्क नष्ट करावा आणि नवा मास्क वापरण्यास सुरुवात करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Covid19, Health, Mask