नवी दिल्ली, 27 जानेवारी : गेल्या वर्षभराहून अधिक काळ जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला (Corona) प्रतिबंध करणाऱ्या लशी येणार येणार म्हणताना अखेर आल्या. शास्त्रज्ञांच्या अहोरात्र कष्टातून या लशी तयार झाल्या आहेत. लशींच्या चाचण्या वगैरे सगळे टप्पे पार पडल्यानंतर आता लसीकरण कार्यक्रमही भारतासह अनेक देशांत सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना (Covid Warriors) लस दिली जात असून, प्रत्येकाने लशीचे (Vaccine) दोन डोस घेणं आवश्यक आहे. तरीही लशीचा प्रभाव वाढवण्यासाठी दोन विशिष्ट गोष्टी लस घेण्याआधी करणं फायद्याचं ठरत असल्याचं नुकत्याच झालेल्या अभ्यासात दिसून आलं आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे चांगली झोप घेणं आणि व्यायाम करणं. प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण लवकर होते आणि त्यातून बरं व्हायलाही त्यांना जास्त वेळ लागतो, याची कल्पना आपल्याला आता आली आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली असणं हा कोरोनापासून बचाव करण्याचा चांगला मार्ग आहे. लशीमुळे कोरोनाला प्रतिकार करण्याची क्षमता वाढत असली, तरी लस घेण्याआधी तुमच्या शरीराची मूळची प्रतिकारशक्तीही चांगली असणं आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कमजोर असलेल्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कारण त्या लशीला योग्य तो प्रतिसाद शरीराकडून दिला जाण्यासाठी शरीराची अंतर्गत यंत्रणा कणखर असणं गरजेचं आहे. या यंत्रणेवर डिप्रेशन (Depression), ताणतणाव आदींमुळे दुष्परिणाम होऊ शकतो. एखाद्या गोष्टीची प्रचंड चिंता करणं किंवा मनावर मोठा ताण येणं यांमुळे विषाणूशी लढण्याची शरीराची शक्ती बऱ्यापैकी कमी होऊ शकते. ‘ टाइम्स ऑफ इंडिया ’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘जर्नल पर्स्पेक्टिव्ह्ज ऑन सायकॉलॉजिकल सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात चांगली झोप (Sleep) आणि व्यायाम (Exercise) या दोन गोष्टी लशीला शरीराच्या यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिसादावर चांगला परिणाम करतात. ज्यांना ताणतणाव आहे, त्यांनीही या दोन गोष्टी केल्या तर चांगला फायदा होऊ शकतो, असं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग येत्या काही आठवड्यांत वाढवला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लस मिळेल. त्यामुळे नागरिकांनी आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं आवश्यक आहे. ज्यांना लस मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे त्यांनी रात्री पुरेशी झोप घेणं, तसंच लसीकरणापूर्वी एक दिवसापर्यंत नियमित चांगला व्यायाम करणं गरजेचं असल्याची शिफारस शास्त्रज्ञांनी केली आहे. हे वाचा - फेब्रुवारीपासून बिनधास्त प्रवास करा; मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेव्हियरल मेडिसीन’ या दुसऱ्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातही लस घेण्यापूर्वी झोप आणि व्यायाम या गोष्टी महत्त्वाचाच्या असल्याचं म्हटलं आहे. लसीकरणाआधीच्या दोन रात्री तरी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी या लसीकरणापूर्वीही हीच गोष्ट लागू पडते. लस घेतल्यानंतर अँटिबॉडीज (Antibodies) शरीरात तयार होण्याची प्रक्रिया प्रतिकारयंत्रणेद्वारे होते. झोप पुरेशी झाली नसेल, तर त्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. म्हणून कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी झोप पुरेशा प्रमाणात घेणं गरजेचं आहे. तसंच लस घेण्यापूर्वी क्रियाशील राहणं हेदेखील लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. झोपेचं वेळापत्रक बसवणं म्हणजे रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ ठरवणं गरजेचं आहे. चांगली झोप लागण्यासाठी झोपण्याआधी किमान अर्धा तास ब्लू लाइटच्या (Blue Light) सान्निध्यात येणं टाळावं. त्यासाठी टीव्ही, मोबाइल, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर झोपण्याआधी अर्धा तास करू नये. तसंच झोपण्याआधी मद्यपान करू नये, चहा-कॉफीसारखी कॅफेन असलेली पेय पिऊ नयेत. तसंच भरपेट जेवल्यानंतर लगेच झोपू नये. हे वाचा - कोरोना लशीचा दुष्परिणाम झाला, तर रुग्णास मिळणार विम्याचं संरक्षण लस घेण्याआधी, तसंच लस घेतल्यानंतरही दररोज किमान अर्ध्या तासाचा व्यायाम करणं गरजेचं आहे. हे लशीचा दुसरा डोस घेईपर्यंत करणं आवश्यक आहे. दुसरा डोस काही आठवड्यांत दिला जातो. दोन्ही डोस घेतल्यानंतरच लसीकरण पूर्ण होतं. पुरेशी झोप आणि व्यायाम या सवयी कायमस्वरूपी शरीराला लावून घेणं केव्हाही चांगलंच. त्यामुळे केवळ लसीकरणापुरतंच नव्हे, तर या सवयी कायमसाठीच अंगीकारण्याचा प्रयत्न करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.