जयपूर, 29 ऑक्टोबर : दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण असतो. आनंद द्विगुणित करण्यासाठी फटाके वाजवले जातात. फटाके वाजवताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं असतं; पण लहान मुलं, तरुण याकडे दुर्लक्ष करतात. यंदाच्या दिवाळीत फटाके वाजवताना हुल्लडबाजी केल्याच्या, तसंच फटाक्यांमुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या. काही घटनांमध्ये जीवितहानीदेखील झाली. राजस्थानमध्ये अशाच प्रकारची एक भीषण घटना घडली. स्टीलच्या ग्लासखाली लावलेला सुतळी बॉम्ब फुटून स्टीलचे तुकडे प्रायव्हेट पार्ट आणि जांघेत घुसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. हलैना शहरात शुक्रवारी (28 ऑक्टोबर) रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. फटाके पेटवताना केलेलं अवास्तव कृत्य एका भरतपूरमधल्या युवकासाठी जीवघेणं ठरलं. स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब लावून तो फोडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. बॉम्ब फुटताच स्टीलचे तुकडे बंदुकीच्या गोळीप्रमाणे युवकाच्या शरीरात घुसले. यामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टला जखमा झाल्या आणि या दुर्घटनेत त्याला आपले प्राण गमवावे लागले. बिट्टू उर्फ ओंकार (वय 20) असं मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव आहे. बिट्टूचे वडीव विश्वंभर हे मंडपाचं काम करतात. बिट्टू वडिलांना व्यवसायात मदत करत असे. बिट्टूला एक भाऊही आहे. भरतपूर परिसरातल्या इंदिरा नगर कॉलनीत 28 ऑक्टोबरला सायंकाळी मुलं आणि युवक फटाके वाजवत होते. ही मुलं आणि युवक फटाके वाजवताना स्टंट करत होते. यात पाच ते सहा युवक आणि अल्पवयीन मुलं सहभागी झाली होती. या वेळी ते स्टीलचा ग्लास उलटा ठेवून त्याखाली फटाके वाजवू लागले. यात बिट्टूदेखील सहभागी होता. ग्लासखाली पेटवलेला सुतळी बॉम्ब फुटताच ग्लासचे तुकडे झाले आणि ते वेगानं 20 मीटर दूरवर जाऊन पडले. हे वाचा - बापरे! कानातून शिट्टी वाजली, नंतर ऐकूच येईना; दिवाळी फटाक्यांमुळे तरुण झाला बहिरा याबाबत हलैना पोलिसांनी सांगितलं, की `काही मुलं स्टंट करून फटाके वाजवतानाचे व्हिडिओ शूट करत होते. परिसरातल्या नागरिकांनी त्यांना तसं करण्यास मनाई केली. ही मुलं स्टंटसाठी भांड्यांचा वापर करत होती. फटाक्याच्या स्फोटामुळे भांडी दूरवर उडत होती. काही वेळानंतर युवकांनी फटाक्यांची आतषबाजी बंद केली होती. परंतु, पुन्हा त्यांनी असं कृत्य सुरू केलं.` बिट्टू त्याच्या घरापासून सुमारे 150 मीटर अंतरावर असलेल्या गल्लीत आतषबाजी करत होता. त्याच वेळी कुणी तरी स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब ठेवून तो पेटवला. बिट्टू सुमारे 20 मीटर अंतरावर उभा होता. हा बॉम्ब फुटताच स्टीलचे तुकडे बिट्टूच्या जांघेत, प्रायव्हेट पार्टच्या जवळच्या भागात घुसले. बिट्टू पळून जात असताना अडखळला आणि तिथेच पडला. शरीरातून रक्तस्राव होऊ लागला. हे पाहून फटाके फोडणारे इतर युवक घटनास्थळावरून पसार झाले. बिट्टू बराच वेळ त्याच ठिकाणी विव्हळत होता. जमिनीवरचा रक्ताचा सडा पाहून कोणीच त्याला उचलण्याचं धाडस केले नाही. तेव्हा कॉलनीत राहणाऱ्या एका डॉक्टरने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला घाईघाईत 40 किलोमीटर अंतरावरच्या भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात पाठवलं. हे वाचा - भावाची मस्करी जीवघेणी ठरली; फटाके फोडताना बहीण रक्तबंबाळ, रुग्णालयात नेताना मृत्यू भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले; पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जयपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. दैनिक भास्कर च्या वृत्तानुसार एसपी श्याम सिंह यांनी सांगितलं, `सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून काही युवक त्याची लगेच कॉपी करतात. ही गोष्ट खूप धोकादायक आहे. ही घटना सर्वांसाठी धडा आहे. पालकांनी फटाके फोडताना मुलांवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.` दरम्यान, चार दिवसांपूर्वी भरतपूरमधल्या सीकरी येथे अशाच प्रकारची एक भीषण दुर्घटना घडली. आजोबांसमोर त्यांचा नातू फटाक्यांमुळे भाजला. नातू भाजताना पाहून आजोबा त्याच्याकडे धाव घेतली. परंतु, तो चांगलाच भाजला होता. भाजल्यामुळे नातू आजोबांसमोर तडफडत होता. नातवाची ही स्थिती सहन न झाल्याने आजोबांचा जागेवर मृत्यू झाला. नातू 35 टक्के भाजला असून, त्याच्यावर जयपूरमध्ये उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.