भोपाळ, 26 ऑक्टोबर : दिवाळी म्हटलं फटाके आलेच. जिथं तिथं फटाक्यांचा धूमधडाका ऐकू येतो आहे. हे फटाके जितके आकर्षक तितके खतरनाकही आहेत. हे फटाके जीवावर बेतू शकतात किंवा त्यांच्यामुळे आणखी काही भयंकर दुर्घटना होते. असंच एका तरुणासोबत घडलं. फटाके फोडताना फटाक्यांच्या आवाजामुळे तो बहिरा झाला आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ही धक्कादायक घटना आहे. फटाके फोडणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. सुतळी बॉम्ब फुटल्याचा आवाजामुळे त्याच्या कानाचा पडदा फाटला. माहितीनुसार बॉम्बचा आवाज इतका मोठा होता की, तरुणाच्या कानात शिट्टीसारखा आवाज येऊ लागला आणि त्यानंतर त्याला ऐकू येणं बंद झालं. सुरुवातीला हे तात्पुरतं असावं असं त्याला वाटलं त्यामुळे त्याने ते फार गांभीर्याने घेतलं नाही. सकाळी उठल्यानंतर त्याच्या कानात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला. हे वाचा - बापरे! ठाण्यात अशी दिवाळी पाहून पोलीसही हादरले; VIDEO तल्या तरुणाचा शोध सुरू डॉक्टरांनी त्याच्या कानाच्या एन्डोस्कोपी केली तेव्हा त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचं दिसलं. त्याच्या कानात मोठा छेद झाला होता. आज तकच्या वृत्तानुसार तरुणाचा उपचार करणारे ईएनटी डॉक्टर एसपी दुबे यांनी सांगितलं की, कानाच्या आतील पडदा इतका पातळ असतो की जोरात कानशिलात लगावली तरी तो फाटू शकतो. सामान्य दुखापत असेल तर ते आपोआप बरं होतं. पण गंभीर दुखापत असेल तर उपचाराची गरज पडते.
दिवाळीत त्यांच्याकडे अशा रुग्णांची संख्या वाढते. फटाके फोडताना ते जास्त आवाजाचे नसावेत, याची काळजी लोकांनी घ्यायला हवी. फटाके फोडताना त्यापासून शक्य तितकं दूर राहावं, असा सल्लाही डॉ. दुबे यांनी दिला आहे. फटाके वाजवताना काय काळजी घ्यायची? फटाके नेहमी मोकळ्या जागेत वाजवा, गॉगल्स घाला, स्वच्छ पाण्याने हात धुवा. लहान मुले फटाके वाजवत असताना मोठ्यांनी लक्ष द्यावे. कोणतीही दुखापत सहजपणे घेऊ नका; डॉक्टरांना दाखवा व प्रोफेशनल मदत घ्या. अपघाताने आग लागल्यास पाण्याने भरलेली बादली व वाळू लगेच सापडेल अशा ठिकाणी सज्ज ठेवा. फटाके सुरक्षित जागी बंद खोक्यात आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत असे ठेवा. फटाके चेहरा, केस व कपड्यांपासून दूर ठेवा. फटाके वाजवताना कृत्रिम धाग्यांपासून (सिंथेटिक) तयार केलेले कपडे घालू नका. हे वाचा - बापरे! हात लावताच बॉम्बसारखा Mobile blast, तोंडावरच उडाली आग; Shocking Video फटाके वाजवताना ते किमान हातभर लांब राहतील याची काळजी घ्या आणि फटाके वाजताना बघायला उभे राहताना किमान पाच मीटर्सचे अंतर ठेवा. फटाके वाजवण्यासाठी जाताना काँटॅक्ट लेन्सेस काढून ठेवा. त्याऐवजी चष्मा वापरा. चष्म्याने तुमच्या डोळ्यांचे संरक्षणही अधिक चांगल्या प्रकारे होईल. फटाक्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते पाण्याने भरलेल्या बादलीत घालून निष्क्रिय करा. जळलेले फटाके अपघाताने पायाखाली येऊन जखम होऊ नये म्हणून नेहमीच उत्तम पादत्राणे वापरा.