आता फक्त एका Blood Test वरून होणार Depression चं निदान

आता फक्त एका Blood Test वरून होणार Depression चं निदान

मानसोपचार तज्ज्ञ मानसिक आजाराच्या निदानासाठी रुग्णाच्या नमूद केलेल्या बाह्य लक्षणांवरच अवलंबून असतात.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल: कोणताही मानसिक आजार (Mental disease) म्हटलं की त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. त्या व्यक्तींकडे एक आजारी व्यक्ती म्हणून पाहिलंच जात नाही. मानसिक आजारावरील (Mental health) उपचारही ठरलेले नसतात. म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ या आजाराच्या निदानासाठी रुग्णाच्या नमूद केलेल्या बाह्य लक्षणांवरच अवलंबून असतात. पण आता यात बदल होणार आहे. ज्याप्रमाणे ब्लड टेस्टमार्फत (Blood Test) इतर आजारांचं निदान होतं, तसंच आता ब्लड टेस्टमार्फत डिप्रेशनसारख्या  (Depression) सर्वात गंभीर आणि सर्वात जास्त प्रमाणात आढणाऱ्या मानसिक आजाराचंही निदान होणार आहे.

औदासिन्य किंवा नैराश्य या मानसिक आजाराचं निदान आता रक्ताच्या चाचणीवरून शक्य होणार आहे. संशोधकांनी अलिकडेच हा अभिनव शोध लावला असून विशिष्ट रक्त चाचणी विकसित केली आहे. यामुळे नैराश्येची तीव्रताही लक्षात येणार आहे. या संशोधनामुळे या आजारावरील उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल होऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सायन्स अलर्टच्या अहवालानुसार, सामान्यत: मानसोपचारतज्ज्ञ केवळ औदासिन्यानग्रस्त असलेल्या रुग्णाची शारीरिक तपासणी करण्यासाठीच रक्ताच्या चाचण्या करतात. यावरून रुग्णाचा मानसिक अवस्थेला कारणीभूत ठरणारी कोणतीही शारीरिक व्याधी आहे की नाही हे, याचा शोध घेतला जातो. या पार्श्वभूमीवर नुकतीच विकसित करण्यात आलेली ही नवीन पद्धत रुग्णाच्या मानसिक अवस्थेशी संबधित असलेल्या रक्तातील बायोमार्कर्सवर लक्ष देते. या नवीन पद्धतीमुळे नैराश्य आणि बायपोलर डिसऑर्डर (Bipolar Disorder) अशा मानसिक आजारांचं निदान आणि उपचार यामध्ये मोठे बदल होऊ शकतात. या नवीन पद्धतीचं विश्लेषण आणि परिणाम मॉलिक्यूलर साइकियाट्रीमध्ये प्रकाशित झाले आहेत.

हे वाचा - COVID-19 : चाचणी ते उपचार; लक्षणांसोबत कोरोनाबाबत तुम्हाला हे माहीत असायला हवं

या नवीन संशोधनात संशोधकांनी 26 बायोमार्कर्स ओळखले आहेत. बायोमार्कर्स हे नैसर्गिक संदेश आहेत जे मोजले जाऊ शकतात. या 26 बायोमार्कर्सचा रुग्णाच्या मानसिक अवस्थेशी संबंध असतो. यात औदासिन्य, बायपोलर डिसऑर्डर आदी आजारांचा समावेश आहे. बायोमार्कर मानसिक आजारांच्या निदानाचं महत्त्वपूर्ण साधन म्हणून पुढे येत आहे, असं मत इंडियाना युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरो सायंटिस्ट अलेक्झांडर बी. नक्युलेस्क्यू यांनी व्यक्त केलं आहे.

नक्युलेस्क्यू यांच्यासह अनेक संशोधकांनी वर्षानुवर्षे या क्षेत्रात अभ्यास केला आणि ही रक्ताची बायोमार्कर आधारित चाचणी विकसित केली. ज्यामुळे रुग्णांमधील आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीचा अंदाज येऊ शकतो आणि बर्‍याच आजारांचं निदान होऊ शकतं. नक्युलेस्क्यू यांनी चार वर्ष केलेल्या संशोधनात इंडियाना पोलिसमधील रिचर्ड एल. रोउडेबुश व्हीए मेडिकल सेंटरमधील शेकडो रूग्णांवर अनेक चाचण्या केल्या आणि त्यानंतर मानसिक स्थिती दर्शवणारे 12 बायोमार्कर्स निश्चित केले.

नक्युलेस्क्यू यांच्या मते, रुग्णानं सांगितलेल्या लक्षणांवर आधारित निदान नेहमीच विश्वासार्ह नसतं. मात्र ही रक्त चाचणी रुग्णाची नेमकी अवस्था लक्षात घेण्यास आणि त्यानुसार योग्य औषधोपचार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

हे वाचा - काय आहे सेक्स सरोगेट? इस्त्रायली जखमी जवानांना सरकारी खर्चातून दिली जाते थेरपी

औदासिन्य आणि इतर मानसिक आजारांच्या निदानासाठी अद्याप रक्ताच्या चाचण्यांचा समावेश नव्हता. नवीन संशोधनामुळे आता भविष्यात डॉक्टर हे मानसिक आजार समजून घेण्यासाठी रुग्णानं सांगितलेल्या लक्षणांवर अवलंबून न राहता या नवीन पद्धतीनुसार स्वतंत्रपणे या मानसिक आजाराची तीव्रता समजून घेऊ शकतील. भविष्यात ही रक्तचाचणी एक व्यवहार्य पर्याय म्हणून पुढे येईल, असंही या संशोधन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या चाचणीच्या उपलब्धतेमुळे रुग्णांना योग्य उपचार देण्यात मानसोपचारतज्ज्ञांना चांगली मदत होईल आणि ठराविक काळानंतर ते त्यांच्या उपचाराचे परिणामदेखील जाणून घेऊ शकतील. तर रुग्णांची विविध प्रकारच्या प्रायोगिक औषधांपासून सुटका होऊ शकेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

First published: April 20, 2021, 9:15 AM IST

ताज्या बातम्या