मुंबई, 18 एप्रिल : कोरोनाविषाणूची दुसरी लाट (Second Wave of Corona virus) नियंत्रित करणं कठीण झालं असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या नवनवे उच्चांक नोंदवत आहे. या परिस्थितीत या आजाराची चाचणी(Test) कधी करून घ्यावी आणि केव्हा करू नये याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. असे असंख्य लोक आहेत, जे डॉक्टरकडे जाणे टाळण्यासाठी स्वतःच घरच्या घरी उपचार करत राहतात आणि परिस्थिती हाताबाहेर गेली की डॉक्टरकडे धाव घेतात. तर अनेक लोक कोरोनाला अफवा मानतात आणि कोणत्याही नियमांचं पालन न करता बाहेर फिरतात.
या विषाणूबाबतच्या कितीतरी गोष्टी अद्याप शास्त्रज्ञांच्याही आकलनापलीकडच्या आहेत. पण जी माहिती उपलब्ध आहे ती सर्वांना माहित असणं महत्त्वाचं आहे.
कोरोनाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत?
कोरोना विषाणूनं एकदा शरीरात प्रवेश केला की, वेगवेगळ्या प्रकारे त्याचा परिणाम दिसून येतो. शरीराच्या एखाद्या भागावरही याचा परिणाम जाणवू शकतो किंवा सगळ्या अवयवांनाही धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आपल्याला बरं वाटत नसल्यास कोणत्या स्थितीत आपण रुग्णालयात दाखल होणं आवश्यक आहे आणि कोणत्या परिस्थितीत घरी विलगीकरणात (Isolation) राहणं योग्य आहे, हे महत्त्वाचं ठरतं.
पहिला टप्पा
रुग्णाला कोरोनाची लागण झालेली असेल मात्र फारच सौम्य लक्षणं असतील किंवा काहीही लक्षणे दिसत नसतील. फार त्रास होत नसेल तर रुग्णानं घाबरून न जाता, स्वतःला इतरांपासून विलग केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत, निरोगी लोकांच्या संपर्कात येऊ नये आणि चुकून भेट झाली तरी मास्क (Mask) घालून, सुरक्षित शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे.
दुसरा टप्पा
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांना तीव्र लक्षणं दिसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करणं आवश्यक असते. खूप ताप, अतिसार, श्वास घेण्यात अडचण अशी लक्षणे दिसत असतील तसंच पल्स ऑक्सिमीटरवरील ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी होत असेल तर अशा रुग्णांनी त्वरित रुग्णालयात जाणं गरजेचं आहे. कारण अशी लक्षणे हे फुफ्फुसात संसर्ग झाल्याचं चिन्ह आहे.
तिसरा टप्पा
फुफ्फुसातील संसर्ग वाढल्यानं रुग्णाला श्वास घेण्यात जास्त त्रास होत असतो. रक्तातील ऑक्सिजनची पातळी 92 किंवा त्यापेक्षा कमी होण्यास सुरुवात होते. छातीच्या एक्सरे मध्ये संसर्गाच्या खुणा दिसून येतात.अशा वेळी रुग्णाला सामान्य कोविड वॉर्डमधून आयसीयूमध्ये हलवण्याची गरज भासते, अर्थात डॉक्टरच हा निर्णय घेतात.या स्थितीत उपचारादरम्यान रुग्णाला ऑक्सिजन दिला जातो.
चौथ्या टप्पा
हा सर्वांत गंभीर टप्पा आहे. यामध्ये रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आलेली असते. फुफ्फुसांची क्षमता कमी झालेली असल्यानं व्हेंटिलेटर लावलं जातं. डॉक्टरांच्या मते, अशा स्थितीत रुग्णाच्या शरीरातील विषाणू कमी होण्याची आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारण्याची वाट पाहिली जाते. कधी कधी परिस्थिती बिघडते आणि प्रकरण थ्रोम्बोसिसपर्यंत पोहोचते. यात शरीराच्या कोणत्याही विशिष्ट भागाचा किंवा हृदयाचा रक्तपुरवठा थांबतो आणि अनेक एकेक अवयव निकामी होत जातात.
कोरोना नियमांचं पालन करण्यावर भर
कोरोनाची लागण होऊन व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यापर्यंतची वेळ येऊ नये यासाठी तज्ज्ञ सतत कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षा नियमांचे पालन (प्रोटोकॉल) करण्याचा आग्रह करतात. अनेकदा रुग्ण कोरोनानं आजारी पडल्यानंतर स्वतःच ऐकीव माहितीवर आधारीत औषधे देण्याची किंवा प्लाझ्मा देण्याची मागणी करतात. हे अयोग्य आहे, डॉक्टरांना याबाबतचा निर्णय घेऊ देणं आवश्यक आहे.
हे वाचा - अपुऱ्या आरोग्य सोयी-सुविधांचं आव्हान; पंतप्रधान मोदींनी दिला नवा ACTION PLAN
आतापर्यंत कोरोनाच्या उपचारासाठी कोणतंही खास औषधं निर्माण झालेलं नाही. जुन्याच काही औषधांमध्ये बदल करून ती वापरली जात आहेत. त्यामुळे लोकांनी घरीच राहणं, बाहेर गेल्यास मास्क वापरणं आणि किमान 20 सेकंद साबणानं हात धुणं आवश्यक आहे. यामुळे संसर्गाचा धोका खूपच कमी होतो.
चाचणी कधी करावी?
कोरोनाच्या लक्षणांबद्दल (Symtomps)अद्यापही बराच संभ्रम आहे. पूर्वी ताप, सर्दी, खोकलाही याची लक्षणं ठरलेली होती. पण आता परिस्थिती वेगळी आहे. म्युटेशनमुळे विषाणूत बदल झाल्यानं लक्षणांमध्येही बदल झाल्याचं आढळून आलं आहे. काहींना ताप येतो, तर काहींना पोटदुखी, जुलाब आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसतात. कधी कधी डोळ्यांनाही त्रास होतो किंवा अंगावर पुरळ अशी लक्षणेही दिसतात. अशी लक्षणे दिसत असतील आणि त्याआधी 15 ते 20दिवसांत तुम्ही घराबाहेर पडला असाल तर सावध व्हा आणि चाचणीसाठी संपर्क साधा. बर्याच वेळा रुग्णाला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत पण त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लक्षण दिसत नसतील तरीही काही वेळा चाचणी आवश्यक ठरते.
कोणती चाचणी करावी?
सद्यस्थितीत रुग्णालये स्वत:च कोणती चाचणी करावी याचा निर्णय घेत आहेत. उदाहरणार्थ, रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात नआल्याचा दावा करत असेल तर त्याची रॅपिड अँटीजेन (rapid antigen) चाचणी केली जाते.याचा निकाल लवकर कळतो. या चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला असेल तर संसर्ग असल्याची खात्री होते; पण याचा निकाल नकारात्मक आला आणि लक्षणे दिसत असल्यास आरटी-पीसीआर (RTPCR) चाचणी केली जाते.
हे वाचा - कोरोना लस आणि रक्ताच्या गुठळ्या होणं याचा संबंध आहे? WHO चा नवा खुलासा
याच्या निकालात सीटीव्हॅल्यू (CT Value)असते. ज्यामुळे व्हायरल लोडची स्थिती कळते. सीटीव्हॅल्यू 24पेक्षा कमी असेल तर ते ठीक आहे,परंतु सीटीव्हॅल्यू 24 पेक्षा जास्त असेल तर रुग्णाची अवस्था गंभीर होण्याची शक्यता असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Covid-19