बार्सिलोना, 18 फेब्रुवारी : गुबगुबीत आणि लाल गाल, कुरळे केस आणि त्यावर छोटासा हेअरबँड आणि सुंदर असा फ्रॉक. चिमुकलीचा हा फोटो पाहिल्यानंतर किती गोड आहे, असंच तुम्ही आधी म्हणाल. पण या फोटोमागे वेगळंच काही दडलं आहे, जे तुम्हाला समजलं तर तुम्ही थक्कच व्हाल. आता म्हणाल इतकं काय या फोटोत दडलं आहे. तर ही चिमुकली म्हणजे खरंखुरं बाळ नाही. तर निर्जीव बाहुली आहे. काय? विश्वास बसत नाही ना तुमचा. पण हे खरं आहे.
स्पेनच्या कॅटॅलोनियामधल्या (Catalonia) डेल्टेब्रे (Deltebre) इथली ख्रिस्तिना जॉब्ज (Christina Jobs) ही 35 वर्षांची कलाकार अशाच बाहुल्या बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. ख्रिस्तिनानं केलेल्या बाहुल्या इतक्या खऱ्या (Realistic) वाटतात, की लोकांना ती बाळंच वाटतात.
'यूके मिरर'च्या रिपोर्टनुसार ख्रिस्ति प्रोफेशनल शिल्पकार (Professional Sculptor) आहे. ती सिलिकॉनच्या बाहुल्या (Silicone Baby Dolls) बनवते. बाहुल्यांचे बारीकसारीक डिटेल्स (Details) दर्शवणं हे तिचं कौशल्य आहे. ती विविध आकाराच्या, रंगाच्या बाहुल्या तयार करते. काही बाहुल्या छान लहान मुलांसारखे कपडे घातलेल्या असतात, तर काही बाळांना कपड्यात बांधून ठेवावं तशा कपड्यात गुंडाळलेल्या असतात.
हे वाचा - 10 हजाराचं बिल आणि लाखोंची टीप; कपलनं वेटरला का बनवलं लखपती?
ख्रिस्तिनाच्या बाहुल्यांमध्ये इतकं वैविध्य असल्यामुळे आणि त्यात अगदी जीव ओतून करत असल्यामुळे तिने तयार केलेल्या बाहुल्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले नसते तरच नवल.
ख्रिस्तिना म्हणाली, 'मी सिलिकॉनपासून बाहुल्या बनवते. कारण त्यामुळे बाहुल्या खऱ्या वाटतात आणि त्यांचा खरेपणा केवळ पाहून नव्हे, तर स्पर्श करूनही अनुभवता येतो. एका कार्यक्रमाच्या वेळी एक अंध महिला मी तयार केलेल्या सिलिकॉन बाहुलीला स्पर्श केल्यानंतर अक्षरशः रडली. तो अनुभव अविस्मरणीय होता'
'साधारणतः माझ्या कामावर लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात. या बाहुल्यांचा प्रभाव पडतो आणि काही वेळा कन्फ्युजनही होतं, अशा प्रतिक्रिया येतात,' असं ख्रिस्तिना सांगते.
हे वाचा - अरे देवा! कर्ज फेडलं नाही म्हणून Underwear सुद्धा सोडली नाही; चक्क लिलावात काढली
एखादी बाहुली तयार करायला क्रिस्तिनाला दोन महिन्यांपासून एक वर्षापर्यंत कितीही वेळ लागू शकतो. यावरून अंदाज येऊ शकतो, की ती तिच्या कामात किती गढून जाते.
'शरीरावरचे अगदी बारीकसारीक डिटेल्स म्हणजे त्वचेवरचे केस, बारीक रंध्रं, हे सगळं हुबेहूब दर्शवण्यासाठी संयमाची गरज असते. ही सगळी प्रक्रिया प्रत्येक वेळी मला उत्साह देते. 'चेहऱ्यावरच्या छोट्या सुरकुत्या दाखवण्यासाठी किंवा बारीकसारीक गोष्टी प्रत्यक्षात दर्शवण्यासाठी बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात. खऱ्याशी साधर्म्य दर्शवणारं काही तरी तयार करण्याची प्रक्रिया मला भावते,' असंही ख्रिस्तिना आवर्जून सांगते.
अर्थात एक कलाकार म्हणून ती स्वतःला केवळ माणसाच्या बाळांच्या प्रतिकृतींपुरतंच मर्यादित ठेवत नाही. स्वप्नातल्या कल्पनाही सत्यात उतरवते. सिल्व्हर एलियन बेबीज, माकडांची पिल्लं अशा बाहुल्याही तिच्या कौशल्यातून साकारतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Christina jobs, Creativity, International, Lifestyle, Small baby, Spain