कोल्हापूर, 05 नोव्हेंबर: मुलाला सरकारी नोकरी मिळावी, हे स्वप्न आयुष्यभर उराशी बाळगून काबाडकष्ट करणाऱ्या एका मातेचा ऐन दिवळाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी अंत झाला आहे. त्यामुळे मुलगा पोलीस झाल्याचा आनंद क्षणात विरला आहे. मुलगा पोलीस झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांच्या आईत आईनं आपला प्राण सोडला आहे. एकीकडे दिवळीचा सण आणि दुसरीकडे मुलाने आईचं स्वप्न पूर्ण केलं, त्यामुळे संबंधित कुटुंब दुहेरी आनंदात होतं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाळाबाई कुंभार (वय-56) असं मृत पावलेल्या महिलेचं नाव असून त्या पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील रहिवासी आहेत. आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी, हे स्वप्न उराशी बाळगून बाळाबाई आयुष्यभर काबाडकष्ट करत होत्या. 23 वर्षीय मुलगा रवींद्र पांडुरंग कुंभार देखील आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करून दाखवण्यासाठी खडतर मेहनत घेत होता. अखेर त्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. त्याने पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण करत यश संपादन केलं. ऐन दिवाळीत ही गोड बातमी आल्याने आता गरीबाचा अंधार दूर होणार असल्याने सर्व कुटुंबीय खूश होते.
हेही वाचा-मृत्यूच्या 1 तासआधी आईशी शेवटचं बोलली; ऐन दिवाळीत विवाहितेनं उचललं भयावह पाऊल
पण मुलाचं सुख पाहण्यासाठी आईच उरली नाही. मुलाने पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत आईने जगाचा निरोप घेतला आहे. 56 वर्षीय बाळाबाई याचं आजारपणामुळे निधन झालं आहे. ऐन दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला 3 नोव्हेंबर रोजी बाळाबाई याचं निधन झाल्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या, पुणे हादरलं
रवींद्र याने घरची परिस्थिती हलाखीची असूनही कधी हार मानली नाही. रवींद्र याने कोल्हापुरातील वागरे पाटील परीक्षा केंद्रावर जाऊन त्याठिकाणी साफसफाईपासून मिळेल ते काम करून वृद्ध वडील आणि आजारी आईचा सांभाळ करायचा ध्यास धरला होता. याठिकाणी रवींद्र याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिथेच राहून काही वर्षे अभ्यास केला. काही दिवसांपूर्वी त्याने रायगड जिल्हा पोलीस पदाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत उत्तीर्ण होतं त्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. पण अवघ्या चोवीस तासात आईचं निधन झालं आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur