कोल्हापूर, 31 ऑक्टोबर: एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या भामट्याची चांगलीच फजिती झाली आहे. चेन स्नॅचिन करून पळ काढताना, रस्ताच संपल्याने आरोपी गावकऱ्यांच्या तावडीत सापडला आहे. यावेळी भामट्याने स्वत: जवळील सिगारेट पेटवण्याचं लायटर (cigarette lighter) बंदूक म्हणून गावकऱ्यांच्या दिशेनं रोखलं. पण काही तरुणांनी झेप टाकून आरोपीला पकडलं आहे. यावेळी तरुणांनी भामट्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. पण ती बंदूक नसून लायटर असल्याचं कळताच गावकऱ्यांनी आरोपीला बेदम चोप (villagers catch chain snatcher and beat) दिला आहे.
संबंधित घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या पेठवडगाव परिसरातील वाठार येथे घडली आहे. याप्रकरणी 95 वर्षीय बनूबाई शामराव जगताप यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी जगताप या आपल्या घरासमोर बसल्या होत्या. यावेळी 19 वर्षीय आरोपी अविष्कार माळी त्याठिकाणी आला. त्याने पत्ता विचारण्याचा बहाणा करत बनूबाई जगताप यांच्या दिशेनं आला. काही कळायच्या आत आरोपीनं जगताप यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे दागिने हिसकावले आणि धूम स्टाइलने फरार झाला.
हेही वाचा- गळफास घेतलेल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून आणलं परत; 3 दिवसांनी शुद्धीवर येताच अश्रूंचा फुटला बांध
पण आरोपी माळी ज्या दिशेने गेला त्या दिशेला रस्ता संपल्याने त्याची फसगत झाली. समोर ओढा असल्याने त्याला माघारी फिरावं लागलं. तोपर्यंत फिर्यादी महिलेनं आरडाओरडा करत काही जणांना मदतीला बोलावलं. परत उलट्या दिशेनं येणाऱ्या आरोपीला काही महिलांनी आणि नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. झटापटीत आरोपीच्या मागच्या बाजूस पॅंटला खोवलेलं पिस्तूल खाली पडलं.
हेही वाचा- दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली; बापाचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला राक्षस; चौघांना केलं रक्तबंबाळ
यावेळी आरोपीने माझ्याकडे बंदूक आहे. मला सोडा अन्यथा गोळ्या घालेल अशी धमकी दिली. यावेळी काही घाबरलेल्या महिला बाजूला सरकल्या मात्र काही तरुणांनी आरोपीवर झडप घालून त्याच्या हातातील बंदूक हिसकावली. पण भामट्याच्या हातात बंदूक नसून ती सिगारेट पेटवण्याचं लायटर असल्याचं लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीला बेदम चोप दिला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा वडगाव पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur