मुंबई, 25 ऑगस्ट : मी भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फॅन होतो, असं विधान एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं. विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं. निती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री गेले असताना शेवटच्या रांगेत बसले होते, असे काही फोटो समोर आले होते. याच फोटोवरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी सभागृहात तुफान फटकेबाजी केली. “निती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो. अजित दादा तुम्हालाही माहिती आहे की तिथे किती महत्त्वाची बैठक असते. मी त्या बैठकीला गेलो. त्या बैठकीला काय-काय बोललो हे तुम्ही बोलले असते तर बरं झालं असतं. टीका करताना तुम्ही मी काय-काय बोललो हे सांगायला हवं होतं. मागे उभा राहिला पण आपल्या राज्यासाठी या गोष्टी मागितल्या, असं बोलायला हवं होतं. त्यांनी आपल्याला हजारो कोटी रुपये देऊ केले आहेत. राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळी तर मी पहिल्या क्रमांकाला होतो. फोटो काढताना तिसरा रांगेत असले तर त्यात कमीपणा वाटण्याचं कारण नाही. कारण रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठासून म्हणाले. ( डान्सबार, जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख आणि सभागृहात हास्यकल्लोळ, मुख्यमंत्री शिंदेंचं पवारांना उत्तर ) “इथे बसेलेले सगळे एका पेक्षा एक आहेत. तुम्ही म्हणता मी दिल्लीला जातो. अरे बाबा तुम्ही सुद्धा दिल्लीला जायचे. शिवाजी महाराजांच्या काळात मोघलांचा जमाना होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा डंका पूर्ण जगामध्ये मिरवलेला आहे”, असा दावा शिंदेंनी केला.
'इंदिरा गांधींचाही मी फॅन होतो, डॅशिंग होत्या आणि आता....' एकनाथ शिंदे मोदींबद्दल काय बोलले पाहा VIDEO #MaharashtraAssembly #Maharashtra #NarendraModi pic.twitter.com/HSEDTsGZj8
— News18Lokmat (@News18lokmat) August 25, 2022
“मी इंदिरा गांधींचा फॅन होतो. त्यांचं चांगलं काम होतं. डॅशिंग होत्या. पण आता मोदींनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घेवून आले होते. आताचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत कसे चालतात, कशी दोस्ती आहे त्यांची. तुम्ही एवढं कधी बघितलं होतं का? अमेरिका महासत्ता, आणि आता आपला देश महासत्ता बनणार आहे. तुम्हाला काही कळतं? अशा माणसाला भेटायला जाणं म्हणजे तेव्हा काय रांग बघायचं? काम महत्त्वाचं आहे. पंतप्रधानांनी समाजकार्यासाठी पैशांची काहीच कमी राहणार नाही, असं आश्वासन दिल आहे. ओबीसी आरक्षण मिळालं की नाही? आम्ही दिल्लीला खातेवाटपासाठी गेलो नव्हतो”, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलं.