नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामाचा फक्त शरीरालाच नाही तर मानसिक आरोग्याला फायदा होतो. पार्कमध्ये व्यायाम करायचा की जिममध्ये, ते तुमच्यावर अवलंबून आहे. उत्तम आरोग्य, मजबूत शरीर, लवचिकता अशा अनेक गोष्टींसाठी व्यायामाचा चांगला परिणाम होतो. व्यायामासाठी योग्य ठिकाणाची निवड केली तर त्याचे आरोग्यावर होणारे फायदे दुप्पट होतात. आजच्या काळात लोक फिटनेसबाबत जागरूक झाले आहेत. मात्र, निरोगी जीवनशैलीसाठी जिममध्ये कि पार्कमध्ये व्यायाम करावा, असा प्रश्न काहींना पडतो, आज आम्ही तुम्हाला त्याचे उत्तर देत आहोत.
रोज व्यायाम करा -
TOI च्या माहितीनुसार, रोजच्या व्यग्र जीवनातून स्वतःसाठी थोडा वेळ काढायला हवा. तुम्ही घरच्या कामात व्यग्र असाल किंवा ऑफिसच्या कामात, काही असो व्यायाम करायलाच हवा. आरोग्याबाबत जागरूक असणे महत्त्वाचे बनले आहे. व्यायामाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. नियमित व्यायाम केला तर विविध शारीरिक-मानसिक आजार होण्यापासून रोखता येतात.
जीम/व्यायामशाळेतील व्यायाम किती फायदेशीर -
जिममध्ये जाऊन व्यायाम करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण, तिथे तुम्हाला ट्रेनरची मदत मिळते. जेणेकरून तुम्हाला योग्य व्यायाम करता येईल. कार्डिओ, वेट ट्रेनिंग यांसारख्या सर्व व्यायामांची माहिती तुम्हाला मिळते. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही व्यायाम मनोरंजक बनवण्यासाठी झुंबा किंवा नृत्य वर्गातही सामील होऊ शकता. जर तुम्ही अनुभवी व्यक्तीची मदत घेतली तर नक्कीच तुम्ही तुमचे फिटनेस टार्गेट लवकर साध्य कराल.
हेे वाचा -मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही
उद्यानात व्यायाम करणे किती चांगले -
उद्यानात व्यायाम करणे किंवा एखादा खेळ खेळणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. खुला निसर्ग आणि ताजी हवा आपला मूड फ्रेश करते आणि शरीराला ऑक्सिजन देखील मिळतो. उद्यानात व्यायाम केल्यानंतर तुम्ही स्वतःला आणखी ताजेतवाने अनुभवू शकता. तसेच सकाळची कोवळी सूर्यकिरणे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ देत नाहीत. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. आजकाल उद्यानात ओपन जिमचीही सोय आहे. त्या तुम्ही मोफत वापरू शकता.
हे वाचा - तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा 'हे' घरगुती उपाय
खुल्या हवेत चालणे फायदेशीर -
तज्ज्ञांच्या मते, ट्रेडमिलपेक्षा मोकळ्या हवेत चालणे चांगले. पण, जर तुम्ही व्यायामशाळेत व्यायाम केलात तर तुम्हाला लोक भेटतात किंवा मित्रांसोबत व्यायाम करताना अधिक बरे वाटते. पार्कमध्ये व्यायाम करा किंवा जिममध्ये, दोन्ही प्रकारे व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Types of exercise