मुंबई, 21 सप्टेंबर : तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी हजारो अल्पवयीनही यामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी दिल्लीत एम्स रुग्णालयामध्ये निधन झाले. 41 दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर ते मृत्यूशी झुंज देत होते. राजू श्रीवास्तव हे 58 वर्षांचे होते आणि ते त्यांच्या उत्कृष्ट फिटनेससाठीही प्रसिद्ध होते. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक तरुण कलाकारांचा कार्डियक अरेस्ट आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊ.
टीव्ही अभिनेता दिपेश भान -
'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतून नाव कमावणारा 41 वर्षीय टीव्ही अभिनेता दीपेश भान यांचे 23 जुलै रोजी क्रिकेट खेळताना स्ट्रोकमुळे निधन झाले. त्याच्या जबरदस्त फिटनेसमुळे तो सोशल मीडियावर खूप चर्चेत असायचा, पण अचानक त्याने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला.
प्रसिद्ध गायक के.के -
बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके या वर्षी 31 मे रोजी कोलकाता येथे एक संगीत कॉन्सर्ट करत होते, त्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर के के (53) यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केकेंचा फिटनेसही चांगला मानला जात होता, पण अचानक त्यांचा मृत्यू झाला.
सुपरस्टार पुनीत राजकुमार -
साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार याचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे वय अवघे 46 वर्षे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो फिटनेससाठी खूप प्रसिद्ध होता. कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या बाबतीतही तसंच झालं.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला -
रिअॅलिटी शो बिग बॉस आणि टीव्ही सीरियलमधून चित्रपट इंडस्ट्रीत ठसा उमटवणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाचे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थ त्याच्या फिटनेसबाबत खूप गंभीर होता, पण त्याला कमी वयातच आपला हार्ट अटॅकमुळे जीव गमवावा लागला.
या कलाकारांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू -
बॉलिवूड अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी हे 67 वर्षांचे होते, त्यांचा 3 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्याशिवाय मिर्झापूर वेब सीरिजमुळे प्रसिद्ध झालेल्या 36 वर्षीय ब्रह्म स्वरूप मिश्रा यांचाही अचानक छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाला. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हृदयविकारामुळे जगाचा निरोप घेतला आहे. हा जीवघेणा ट्रेंड वाढत चालला आहे.
हे वाचा - लग्झरी कार अन् करोडोंच्या घरांचे मालक होते राजू श्रीवास्तव; होती इतकी संपत्ती
यावर हृदयरोग तज्ञ काय म्हणतात?
नवी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजिस्ट डॉ.वनिता अरोरा यांच्या मते, आज-काल तरुण-तरुणी हार्ट अटॅकमुळे मृत्यू होत आहे. जास्त ताणतणाव, उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय लिपिड, कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अतिशय कमी शारीरिक हालचालींची जीवनशैली ही हृदयविकाराची प्रमुख कारणे ठरत आहेत. याशिवाय धूम्रपान, प्रदूषण यासह इतर अनेक घटक हृदयविकारास कारणीभूत आहेत. अनेक वेळा बॉडी तयार करण्यासाठी तरुण सप्लिमेंट्स घेणे सुरू करतात आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता जिममध्ये जातात. असे केल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
हे वाचा - Raju Srivastav यांना एकेकाळी मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
हृदयविकारापासून बचाव कसा करावा?
डॉ.वनिता सांगतात की, हृदयविकाराचा झटका, कार्डियक अरेस्ट किंवा इतर हृदयविकार टाळण्यासाठी आपली जीवनशैली निरोगी ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला तुमचा रक्तदाब, साखरेची पातळी आणि वजन नियंत्रित ठेवावे लागेल. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला रोज व्यायाम करावा लागेल आणि धुम्रपानापासून दूर राहावे लागेल. घरीही कमी तेलाच शिजवलेले अन्न खावे, निरोगी व्यक्तींनीही नियमित तपासणी करून घ्यावी आणि ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी वेळेवर औषधे घ्यावीत. कोणतीही समस्या असल्यास त्वरित हृदयरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.