नवी दिल्ली 12 जून : दर वर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day ) साजरा केला जातो. योग दिन साजरा करण्याची सुरुवात भारतात (India) झाली आणि हळूहळू अनेक देशांनीही त्याचं अनुसरण केलं. योग शरीर (Body) आणि मन दोन्ही निरोगी ठेवते. रोजच्या आयुष्यात योगाचा समावेश केला तर त्याचा चांगला लाभ मिळेल. आज आम्ही तुम्हाला महिलांसाठी काही खास आसनं सांगत आहोत ज्यामुळे महिलांना (Woman) मासिकपाळीच्या (Periods) काळात होणाऱ्या त्रासापासून आराम मिळेल.
बटरफ्लाय आसन :
या बटरफ्लाय आसनाला (Butterfly Asan) फुलपाखरू आसनदेखील म्हणतात. हे आसन महिलांसाठी अत्यंत लाभदायी आहे. हे आसन करण्यासाठी, आपले पाय समोर पसरवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. गुडघे वाकवून दोन्ही पाय ओटीपोटाच्या दिशेने आणा. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं घट्ट धरा. पायाच्या टाचा शक्य तितक्या गुप्तांगाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. एक लांब श्वास घ्या, श्वास बाहेर सोडत गुडघे आणि मांड्या जमिनीच्या दिशेने दाबा. नंतर फुलपाखराच्या पंखांप्रमाणे दोन्ही पाय खाली आणि वर हलवा. याची गती हळूहळू वाढवा. श्वास घ्या आणि श्वास सोडा. सुरुवातीला, हे शक्य असेल तेवढाच वेळ करा नंतर हळूहळू सराव वाढवा.
उष्ट्रासन (Ushtrasan) :
पाठीच्या कण्याच्या समस्या दूर करण्यासाठी हे एक प्रभावी आसन आहे. या आसनात, शरीर उंटांच्या आकारासारखे दिसते. म्हणून याला उष्ट्रासन म्हणतात. हे आसन करण्यासाठी, गुडघ्यांच्या आधाराने पाय मागे सोडून बसा. गुडघे खांद्याला समांतर असले पाहिजेत आणि पायांचे तळवे वरच्या दिशेनं असले पाहिजेत. कंबरेतून मागे झुकत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडा. श्वास घ्या आणि श्वास सोडत असताना मूळ स्थितीत या. हात आपल्या कंबरेकडे परत आणा आणि सरळ करा. या आसनात शरीर मागील बाजूस वाकवले जाते. यामुळे पाठीच्या कण्यावर दाब निर्माण होतो. यामुळे पाठीचा कण्याच्या समस्या दूर होतात. फुफ्फुसांची क्षमतादेखील वाढते.
पावसात भिजल्यानंतर फक्त डोकं नाही, कानही नीट स्वच्छ करा; नाहीतर बळावेल मोठा धोका
मार्जारासन (Marjarasan) : कॅट वॉक जगभर प्रसिद्ध आहे, योगामध्ये देखील मांजरीच्या एका पोझचा उपयोग करण्यात आला आहे. यामध्ये गुडघ्यावर बसून पाय मागे सोडा आणि शरीर आडवे झुकवून हात पुढे उभे टेकवा. हे आसन अत्यंत लाभदायी आहे. यात मणक्यावर योग्य ताण निर्माण होतो, त्यामुळं पाठदुखी, कंबरदुखी तसंच मानदुखीमध्ये आराम मिळतो.
पश्चिमोत्तानासन : हे आसन करताना सर्वप्रथम जमिनीवर बसा. आता दोन्ही पाय समोर पसरवा. पाठीचे स्नायू सैल सोडा. श्वास घेत आपले दोन्ही हात वर आणा. मग श्वास बाहेर सोडत, पुढे झुकून नाक गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा मूळ स्थितीत या आणि पुन्हा हीच प्रक्रिया करा. 3 ते 5 वेळा ही प्रक्रिया करा.
वज्रासन : आपले पाय जमिनीवर पसरून बसून आपले हात आपल्या शरीराच्या बाजूला ठेवा. गुडघा वर उजवा पाय वाकवा आणि उजव्या कुल्याच्या खाली ठेवा. त्याचप्रमाणे डावा पाय डाव्या कुल्याच्या खाली आणा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. आता डोळे बंद करा आणि या स्थितीत पाच ते दहा मिनिटे बसा. वज्रासनामुळे कंबरेचे दुखणे कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.