नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर: बहुतांश जण गरम पाण्याने अंघोळ करून दिवसाची सुरुवात करतात. अंघोळ केल्यानं आळस निघून जातो आणि दिवसाची सुरुवात चांगली होते, असं समजलं जातं; मात्र काही जणांना थंड पाण्याने अंघोळ (Bathing in Cold Water) करण्याची सवय असते. कुठलाही ऋतू असो, बाराही महिने ते अंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करतात. काही जणांना कदाचित थंड पाण्यानं अंघोळ करून दिवसाची सुरुवात करणं कठीण ठरू शकतं; मात्र थंड पाण्याची अंघोळ शरीरासाठी आरोग्यदायी असते. आपलं शारीरिक (Physical Health) आणि मानसिक आरोग्य (Mental Health) चांगलं राहण्यासाठी थंड पाणी उपयुक्त ठरतं, असं अनेकदा सांगितलं जातं. मात्र त्याचे नेमके काय फायदे आहेत, हे अनेकांना माहिती नसतं. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.
थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे रक्ताभिसरण (Blood Circulation) प्रक्रियेमध्ये सुधारणा झाल्याचं अभ्यासकांना दिसून आलं आहे. जेव्हा आपलं शरीर थंड पाण्याच्या संपर्कात येतं, तेव्हा सुरुवातीला त्वचेचा रक्तप्रवाह कमी होतो; मात्र जेव्हा थंड पाणी शरीरावर पडणं थांबतं तेव्हा शरीर स्वतःला उबदार करण्यासाठी प्रयत्न करतं. परिणामी त्वचेखाली रक्तप्रवाह जास्त सक्रिय होतो. व्यायामानंतर थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर चार आठवड्यांच्या काळात स्नायूंमधला रक्तप्रवाह सुधारत असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं आहे.
हेही वाचा- Dengue झाल्यास पपईच्या पानांचा रस ठरेल फायदेशीर; आरोग्यासाठी आहेत याचे जबरदस्त फायदे
थंड पाण्यानं अंघोळ केल्यानं वजन कमी होण्यास देखील मदत होत असल्याचं एका अभ्यासात आढळलं आहे. 14 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या थंड पाण्याने अंघोळ केल्याने चयापचय (Metabolism) क्रियेमध्ये 350 टक्क्यांनी सुधारणा होते.
थंड पाणी आपल्या शरीराची मज्जासंस्था सक्रिय करण्यास उपयुक्त आहे. थंड पाण्याने अंघोळ करतो तेव्हा नॉरअॅड्रेनालाइन संप्रेरकात (Hormone) वाढ होते. या संप्रेरकामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. त्यामुळे व्यक्तीचं आरोग्य सुधारतं.
थंड पाण्यानं अंघोळ करणाऱ्या व्यक्ती कमी आजारी पडतात, असं म्हटलं जातं; मात्र थंड पाण्याची अंघोळ आणि रोगप्रतिकारशक्तीची वाढ याबाबत अद्याप ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळं या तथ्याबाबत साशंकता आहे. झेक प्रजासत्ताक या देशामध्ये यासाठी एक अभ्यास करण्यात आला. तरुण खेळाडूंना सहा आठवड्यांसाठी आठवड्यातून तीन वेळा थंड पाण्याने अंघोळ करण्यास सांगितलं गेलं. यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती थोडी सुधारल्याचं दिसलं. असं असलं तरी याबाबत अधिक व्यापक अभ्यास आवश्यक आहे.
हेही वाचा- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आळूची पानं आहेत गुणकारी; त्यांचा आहारात असा करा उपयोग
थंड पाण्याच्या अंघोळीचा मानसिक आरोग्यालाही (Mental Health) फायदा होतो. थंड पाण्यामुळे आपली मानसिक सतर्कता वाढते. चेहरा आणि मानेवर थंड पाण्याचा वापर केल्यास वृद्धांच्या मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी फायदा होतो. नैराश्याचा सामना करण्यासाठी देखील थंड पाण्याची अंघोळ उपयुक्त ठरू शकते.
साधारण 19 व्या शतकाच्या सुरुवातीला आरोग्याच्या कारणांमुळे थंड पाण्याने अंघोळ सुरू करण्यात आली. रागीट व चंचल मनाला शांत करण्यासाठी, तीव्र इच्छा नियंत्रित करण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी थंड पाण्याची अंघोळ उपयुक्त ठरते, असं त्या वेळच्या वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं होतं. त्यांनी कैदी आणि निर्वासितांसाठी अंघोळीची ही पद्धत वापरण्याची शिफारस केली होती. आता मात्र अनेक ठिकाणी आरोग्याच्या कारणास्तव थंड पाण्यानं अंघोळ करण्याला प्राधान्य दिलं जातं.
थंड पाण्याच्या अंघोळीची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी नेदरलँडमध्ये एक सर्वसमावेशक संशोधन करण्यात आलं. त्यात असं आढळलं, की ज्यांनी थंड पाण्यानं अंघोळ केली त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. गरम पाण्यानं अंघोळ करणाऱ्यांच्या तुलनेत त्यांनी आजारपणाचं कारण देऊन कमी सुट्ट्या घेतल्या. या संशोधनासाठी 3 हजारहून जास्त जणांची 4 गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. पहिल्या गटाला दररोज गरम पाण्यानं अंघोळ करण्यास सांगितलं गेलं. दुसऱ्या गटातल्यांना 30 सेकंदांची थंड पाण्याची अंघोळ करण्यास सांगितलं गेलं. तिसऱ्या गटाला थंड पाण्यानं 60 सेकंद अंघोळ करण्याचं सांगितलं गेलं आणि चौथ्या गटानं थंड पाणी वापरून 90 सेकंद अंघोळ करावी असं सांगण्यात आलं होतं. एक महिनाभर या सूचनांचं पालन केल्यानंतर एकूण सहभागी नागरिकांपैकी 64 टक्के नागरिकांना थंड पाण्याची अंघोळ उपयुक्त वाटली. थंड पाण्यानं अंघोळ केलेल्या गटातल्या व्यक्तींच्या आजारी पडल्यामुळे सुट्टी घेण्याच्या प्रमाणात 29 टक्के घट झाल्याचं या अभ्यासात दिसून आलं.
हेही वाचा- Health Tips: छोट्या छोट्या सवयींमुळे येतंय म्हातारपण; पाहा तुम्हीसुद्धा करत नाहीत ना अशी चूक
थंड पाण्याची अंघोळ आरोग्यासाठी चांगली असल्याचं विविध अभ्यासांतून सिद्ध झालं असलं तरी त्याचे काही तोटेदेखील आहेत. हे तोटे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. शरीरावर अचानक थंड पाणी पडल्यानं झटका बसतो. ज्यांना हृदयविकार आहे, अशांसाठी ही बाब धोकादायक ठरू शकते. यामुळं हृदयविकाराचा झटकाही (Heart Attack) येऊ शकतो. अंघोळ करताना हृदयविकाराचा झटका आल्याची अनेक उदाहरणं तुमच्यादेखील ऐकण्यात आली असतील. त्यामुळे प्रत्येकानं आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन थंड पाण्यानं अंघोळ करायची की नाही हे ठरवावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bathroom, Health Tips