मुंबई, 16 जून : जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तरोत्त प्रगती होत आहे. अगदी स्मार्टफोन टेक्नॉलॉजी ते अंतराळातील संशोधनापर्यंत सर्वच क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत. त्यातीलच एक महत्वाचा शोध म्हणजे इंटरनेट. आपल्या आयुष्यात इंटरनेट इतकं महत्वाचं स्थान निर्माण करेल असा विचार कोणीही केला नसेल. मात्र आज आपण इंटरनेटशिवाय काही तास राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. जगात प्रत्येकाला अगदी सुपरफास्ट इंटरनेटची गरज आहे. म्हणूनच 2G, 3G आणि 4G नंतर आता 5G टेक्नॉलॉजी येणार आहेत. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे इंटरनेटची स्पीड वाढणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र आता या 5G विरोधात अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. 5G मुळे मानवी शरीराला प्रचंड मोठा धोका आहे, त्याच्या रेडिएशन्समुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. मात्र यात नक्की किती तथ्य आहे याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
5G येणार, 5G येणार अशी चर्चा गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगभरात सुरु आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे 5G मुळे मानवी जीवनावर प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. म्हणूनच आता या विरोधात प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र खरंच असं आहे का? 5G मुळे खरंच आपल्या प्रकृतीवर परिणाम होणार का? हे जाणून घेण्याची प्रचंड गरज आहे.
हे वाचा - ब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं
जुलै 2020 मध्ये हॉलिवूडच्या एका मोठया गायिकेनं आपल्या ट्विटरवरून एक गंभीर पोस्ट केली होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे, "जगभरात 5G येतंय, त्यासाठीच्या सर्व चाचण्या सुरु झाल्या आहेत. मात्र आज आपण त्याच्या रेडिएशन्सचा सामना करत आहोत. चीनमध्ये 1 नोव्हेंबर 2019 ला 5G लाँच करण्यात आलं आणि अचानक लोकांचा मृत्यू होऊ लागला."
मात्र तिच्या या पोस्टमध्ये अजिबात तथ्य नव्हतं असं म्हणता येईल. चीनमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. 5G मुळे कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. खरं म्हणजे अशाच काही तथ्यहीन पोस्टमुळे किंवा विचारांमुळे नागरिकांचं मन विचलित होतं. त्यांच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये अशा गोष्टींबाबत चुकीचे विचार पेरले जातात. याचे परिणाम पुढे जाऊन गंभीर रूप घेऊ शकतात. मात्र आपण मूळ मुद्यापासून भटकतो.
5Gबद्दलचे काही गैरसमज
अशाच प्रकारचे चुकीचे विचार 5G बाबतही पेरण्यात आले आहेत. आज प्रत्येकाकडे 5Gबाबत काही नवीन आणि आश्चर्य करणारी गोष्ट आहे. 5G आपल्यासाठी किती जास्त धोकादायक आहे, 5G मुळे प्रचंड डोकेदुखी वाढून मायग्रेनचा त्रासही होऊ शकतो, फक्त मानवी शरीरालाच नाही तर प्राण्यांनाही याच्या रेडिएशन्समुळे हानी होऊ शकते अशाप्रकारच्या एक ना अनेक गोष्टी प्रचलित झाल्या आहेत. इतकंच नाही तर आतापर्यंत आपण ज्या रेडिएशन्सचा समान करत आलो आहोत त्यापेक्षा 5G च्या रेडिएशन्स अधिक हानिकारक आहेत असं सांगण्यात आलं आहे.
जुही चावलाची याचिका
आतापर्यंत या सर्व गोष्टींना कुठलाही न्यायिक आधार नव्हता. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिनं 5G विरोधात चक्क याचिका दाखल केली होती. जुही चावलाच्या म्हणण्याप्रमाणे, जर 5G जर भारतात लाँच करण्यात आलं तर कोणताही प्राणी, पक्षी, मनुष्य, कीटक, वनस्पती, वृक्ष आणि ही संपूर्ण पृथ्वी एक मिनिटही याच्या रेडिशन्सपासून बचाव करू शकणार नाही. 5G चे रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स ही आजच्या रेडिएशन्स पेक्षा १०० पट अधिक हानिकारक आहेत आणि या संपूर्ण पृथ्वीला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवू शकतात.
हे वाचा - Amazon चे जेफ बेझॉस स्वतःच्या यानातून चालले अंतराळात! कधी, कसे वाचा..
खरं म्हणजे जुही चावलाच्या या याचिकेमुळे 5G अडचणीत येईल असं अजिबात नाही. म्हणूनच कोर्टानं तिला तब्बल वीस लाखांचा दंड ठोठावला. या याचिकेबद्दल जुही चावलाला पाठिंबा देऊन 5G विरोधातील तिचं मत हे संपूर्णरित्या अचूक आहे असं म्हणू शकत नाही असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.
काय सांगतो अभ्यास
एका अभ्यासानुसार, रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्समुळे मानवी आणि प्राण्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र एका अभ्यासात या रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्सचा प्रयोग उंदरांच्या शरीरावर करण्यात आला. काही उंदरांना दोन प्रकारच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन्सच्या संपर्कात ठेवण्यात आलं. त्यातील काही उंदरांना गंभीर प्रकारचा मेंदूचा आजार झाला आहे असं लक्षात आलं. तर काही काळानंतर त्यातील काही उंदरांना बाहेर काढण्यात आलं. यानंतर बाहेर काढण्यात आलेले उंदीर जास्त काळ जगले. यामुळे आपण असं म्हणू शकतो का की रेडिएशन्सच्या संपर्कात आलेले उंदीर जास्त काळ जगले? याबाबत अनेक तज्ज्ञांनी अभ्यास केले आहेत त्यामुळे आपण कुठल्याही निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही.
गेल्या काही वर्षांपासून मोबाईल आणि इंटरनेट यूजर्सच्या मनावर अधिराज्य गाजवत असले आणि आपल्या जीवनाचा भाग असले तरी या रेडिएशन्समुळे मेंदूचा गंभीर आजार झाल्याचे फारसे रुग्ण आपण बघितलेले नाहीत. मोबाईल रेडिएशन्सच्या टॉवर्समुळे अनेकांना त्रास होतो, कॅन्सर होण्याचा धोका असतो असं आपण ऐकलं आहे. त्यामुळेच सद्यपरिस्थितीमध्ये मोबाईल टॉवर्स ही उंच इमारतींवर किंवा नागरी वस्तीच्या दूर लावल्या जातात. मात्र 5G मध्ये टॉवर्स वापरण्यात येणार नसून मिनिएचर स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत. हे स्टेशन्स घराजवळ, गल्लीत, बाजारपेठांमध्ये कुठेही असू शकतात. त्यामुळे 5G च्या माध्यमातून आपल्याला धोकाच नाही हे आपण म्हणू शकत नाही.
हे वाचा -Explainer: 9-9-6 कामाच्या संस्कृतीला विरोध,12 तास कामाचं काय आहे हे प्रकरण?
त्यामुळे जर कोणीही 5G मुळे मानवी शरीरावर काही गंभीर परिणाम होतात असं म्हणत असेल तर हे कुठल्याही विज्ञानाच्या भरवश्यावर नाही तर निव्वळ भीतीपोटी म्हणत आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण काही स्टडीजनुसार 5G हे नागरिकांना हानी पोहोचवण्याच्या बाबतीत 2G, 3G आणि 4G सारखीच कमी हानी पोहोचवेल. जोपर्यंत याविरोधात कुठला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यत कुठल्याही निष्कर्षापर्यंत येणं चूक ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Technology