मुंबई - मुंबई देशाची आर्थिक राजधानी. देशभरातील लोक पैसे कमवण्यासाठी या शहरात दाखल होतात. यंदा मान्सूनचा पहिला पाऊस पडला आणि अख्खं मुंबई शहर तुंबलं म्हणजे मुंबईच्या भाषेत त्याची तुंबई झाली आहे. वर्षानुवर्षे हाच प्रकार चालू आहे हे मुंबईकर जाणतात. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी नालेसफाई केल्याची घोषणा करते पण त्यानंतरही शहरात जागोजागी पाणी तुंबतं. मुंबईकराला प्रश्न पडतो कधीतरी पावसाळ्यात न तुंबलेली मुंबई बघायला मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर तर देता येणार नाही पण पाणी तुंबण्याची ( Water logging in Mumbai) कारणं आणि तसं न होण्यासाठीच्या काही उपाययोजनांबद्दल आपण बोलूया. फर्स्ट पोस्टने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
वाढती कन्स्ट्रक्शन्स
मुंबई शहर सातत्याने जमिनीवर आणि आकाशातही विस्तारत आहे असं म्हणायला हवं. कारण इथं येणाऱ्या लोकांसाठी घरं आणि गगनचुंबी इमारती सतत उभारल्या जात आहेत. त्याचा पहिला परिणाम म्हणजे शहरातील बरीचशी नैसर्गिक जागा इमारतींच्या बिल्ट-अप एरियामध्ये (Built-up Area) रुपांतरित होते. त्यामुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते त्यामुळे जागोजागी पाणी तुंबतं.
दुसरं कारण म्हणजे या कन्स्ट्रक्शनमध्ये (Constructions) निर्माण होणारा राडा-रोडा मुंबईतल्या नाल्यांमध्ये, ड्रेनेज सिस्टिममध्ये टाकला जातो. त्यामुळेही पाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन ते रस्त्यावर येतं आणि शहर तुंबतं. शहरातील जंगल वाचवण्यासाठी आरे प्रकल्पातील वृक्षतोड रोखण्यासाठी झालेल्या आंदोलनाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मुंबईकर जंगलं वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Weather Forecast: राज्यात मान्सूनची बॅटींग सुरूच; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट जारी
भराव घालून जमिनी तयार करणं
कांचन श्रीवास्तव आणि आदिती टंडन यांनी मोंगाबेसाठी 2019 मध्ये तयार केलेल्या रिपोर्टनुसार रिक्लेमेशन ऑफ लँड (Reclamation of land) म्हणजे समुद्र, खाडी, तलाव नाल्यांमध्ये भराव घालून जमीन तयार करण्यामुळेही मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साठतं. या अहवालानुसार 1991 पासून गेल्या तीन दशकांत मुंबईतील जमीन 50 स्क्वेअर किलोमीटरने वाढली आहे. पण ही भराव टाकलेली बहुतांश जमीन सखल आणि पूरप्रवण क्षेत्रात असल्याने पाणी साठण्याचं प्रमाण वाढतं. समुद्राची सरासरी पातळी काही ठिकाणी एक मीटरपेक्षा कमी आहे, त्यामुळे जोरात पाऊस झाल्याने उंच लाटा निर्माण झाल्या की या सखल भागांत पाणी येतं आणि साठतं, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
नद्यांच्या प्रवाहात अडथळे
मोंगाबे रिपोर्टनुसार मिठी या मुंबईतील नदीमध्ये उद्योगांतील दूषित पाणी, शहरातील सांडपाणी सोडण्यात आल्यामुळे तसंच प्रवाहाच्या वाटेत उभारण्यात आलेल्या अवैध बांधकामांमुळे प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. या नदीलाच नाल्याचं रूप प्राप्त झालं आहे आणि तिचा प्रवाह ठिकठिकाणी अडवला गेला आहे. दहिसर, पोईसर आणि ओशिवारा या नद्यांचीही तिच अवस्था आहे. या नद्यांच्या कडेला मोकळी जमीनच उरलेली नाही त्यामुळे अगदी काठाला नवनव्या वसाहती, इमारती उभ्या राहिल्या आहेत. जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा आपोआपच नदीकाठच्या या वस्त्यांमध्ये पूर येतो.
मोठी बातमी: मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये घरे कोसळली
मॉन्सूनमध्ये शहरात येणाऱ्या पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा अद्ययावत केलीली नसल्यामुळेच शहरात पाणी साठतं असं 2019 च्या कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. मान्सूनसाठी मुंबई शहराची तयारी या विषयावर कॅगने हा रिपोर्ट दिला होता. बृहन्मुंबई पूराचं पाणी निचरा यंत्रणा प्रकल्प 1993 (The Brihanmumbai Storm Water Disposal System, or BRIMSTOWAD) मध्येच तयार करण्यात आला होता, पण 2005 मध्ये पुराचा तडाखा बसल्यानंतर तो अंमलात आणला गेला. हा प्रकल्प पूर्ण करण्यात नद्यांमध्ये असलेली बांधकामं हा मोठा अडथळा ठरत असल्याचे ताशेरे कॅगच्या रिपोर्टमध्येही मारण्यात आले होते.
शहरातून पाणी समुद्रात जाण्यासाठीची जी आउटलेट आहेत ती सगळी समुद्राच्या उंचीपेक्षा कमी उंचीवर आहेत हा आणखी एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे समुद्राची भरती आणि जोरदार पाऊस झाला की हे पाणी समुद्रात जाऊ शकत नाही. सध्याच्या नाल्यांची आणि ड्रेनेज यंत्रणेची दर तासाला 25mm पाऊसाच्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता आहे, असं 2019 च्या अहवालात म्हटलं असून ती क्षमता वाढवून दर तासाला 50mm करण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे.
नदीकडेच्या पाणथळ जागेतील खारफुटी वनस्पती (Mangroves) नष्ट झाल्यामुळेही पुराचं प्रमाण वाढल्याचं पर्यावरणशास्रज्ञांच्या लक्षात आलं आहे. मुंबईच्या परिसरातील 40 टक्के खारफुटीचं वनीकरण 1990 पासून ते 2005 पर्यंत नष्ट झाल्याचं वनशक्ती या संस्थेनं केलेल्या संशोधनात लक्षात आल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या सगळ्या कारणांमुळे मुंबईत पावसाळ्यात प्रचंड पाणी साठतं आणि त्याचा निचरा होत नाही. ही कारणं असली तरीही त्यांवर उपाय म्हणजे वनीकरण करणं, पाण्याचा निचरा करणारी चांगली ड्रेनेज यंत्रणा उभारणं, नदीचे प्रवाह अवैध बांधकामं, राडारोडा काढून वाहते करणं हे आहेत. हे केले तरच परिस्थिती सुधारू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai rain, Rain fall