मुंबई, 12 जून: मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon Rains Update) चांगलाच वेग पकडला आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला (Monsoon in Maharashtra) व्यापून उत्तरेकडे वाटचाल केली आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतही मागील 4-5 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासूनचं मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मुंबई आणि कोकण पट्ट्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केली आहे. मुंबई आणि कोकणात पुढील 4 ते 5 मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईत उद्या आणि परवा म्हणजेच 13 आणि 14 जूनला मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता (Weather Alert) भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसोबतच ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. तसेच परिसरातील नागरिकांनी उद्या आणि परवा अशी दोन दिवस घरातच राहावं. तसेच लांबचा प्रवास टाळावा अशा सुचना हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा-मोठी बातमी: मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये घरे कोसळली
पुढील काही तासांत मुंबई आणि रायगड याठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.