Home /News /explainer /

Explainer : वर्षभरानंतर लस मिळाली पण कोरोनाव्हायरसवर अद्याप औषध का नाही?

Explainer : वर्षभरानंतर लस मिळाली पण कोरोनाव्हायरसवर अद्याप औषध का नाही?

कोरोनाव्हायरवर (Coronavirus) मात करणारं औषध विकसित करण्यासाठी जास्त कालावधी लागतो का? की विषाणूला मारणारं औषध विकसित करणं शक्यच नाही? अशा बऱ्याच प्रश्नांनी अनेकांच्या मनात घऱ केलं आहे.

मुंबई, 28 मार्च :  सध्या देशात कोरोनाच्या महासाथीने (Corona Pandemic) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यात भरीस भर म्हणून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा डबल म्युटंट व्हेरिएंट (Double Mutant Variant) सापडला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा आणखीही वाढू शकतो, अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनाव्हायरसच्या महासाथीला एक वर्ष उलटलं, त्यावर लस आली पण अजून औषध का नाही, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. जगात एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय तज्ज्ञ असूनही जगभरातल्या कोणत्याच देशाने अद्याप कोरोना विषाणूवरचं औषध कसं काय विकसित केलं नाही. विषाणूवर मात करणारं औषध विकसित करण्यासाठी जास्त कालावधी लागतो का? की विषाणूला मारणारं औषध विकसित करणं शक्यच नाही? अशा बऱ्याच प्रश्नांनी अनेकांच्या मनात घऱ केलं आहे. अँटीव्हायरल ड्रग्ज (Antiviral Drugs) अर्थात विषाणू प्रतिकारक औषधं म्हणजे अशी औषधं जी विषाणूशी लढण्यासाठी दिली जातात. फ्लूवरील औषध हे त्याचं एक उदाहरण. ती टॅब्लेट, कॅप्सुल, सिरप, पावडर अशा स्वरूपात असतात किंवा काहीवेळा नसांमध्ये इन्जेक्शन स्वरूपातही दिली जातात. काही वेळा ही औषधं थेट मेडिकल दुकानात गेल्यास मिळत नाहीत. कारण केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शिनुसारच ती घेता येतात. विषाणूजन्य आजार झाल्यानंतर दोन दिवसांत म्हणजेच 48 तासांत अँटिव्हायरल औषधं दिली तर आजार लवकर बरा होतो. नाही तर औषध घेऊनही आजाराची गुंतागुंत वाढतच जाते. हे वाचा - Explainer : भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट आली आहे का? अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज (Antibacterial Drugs) म्हणजे अशी औषधं जी जिवाणू अर्थात बॅक्टेरियामुळे होणारे आजार बरेकरतात. ही औषधं दोन प्रकारे काम करतात. एक तर थेट बॅक्टेरियावर हल्ला करून त्यांना नष्ट करणं किंवा त्यांच्या वाढण्यावर निर्बंध घालणं. पेनिसिलिनच्या शोधानंतर आतापर्यंत अनेक अँटिबॅक्टेरियल ड्रग्ज विकसित झाली आहेत. या औषधांमुळे दर वर्षी करोडो लोकांचं जीवन वाचत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. अर्थात अँटिबॅक्टेरियल औषधांचे काही तोटेही आहेत. या औषधांचा वारंवार वापर केल्यास बॅक्टेरियामध्ये त्या औषधांविरोधात प्रतिकारशक्ती तयार होते. त्यामुळे त्या औषधांचा सौम्य डोस काम करत नाही. त्यांचा डोस वाढवावा लागतो. अँटिव्हायरल औषधं बनवणं का कठीण आहे? यामागचं विज्ञान समजून घ्यायला हवं. व्हायरस म्हणजेच विषाणू स्वतंत्रपणे जगत नाहीत. ते शरीराच्या पेशींमध्ये वास्तव्य करतात आणि त्याद्वारेच त्यांचं पुनरुत्पादन सुरू होतं. त्यामुळे त्यांची संख्या वाढू लागते. विषाणू स्वतंत्रपणे शरीरावर हल्ला करू शकत नाहीत. त्यामुळे शास्त्रज्ञ गेल्या बऱ्याच काळापासून हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, विषाणूमध्ये खरंच जीव आहे की नाही? विषाणूचं प्रथिन शरीरातल्या चांगल्या, हेल्दी पेशीशी (Healthy Cell) जोडलं जातं. या पहिल्या पेशीला होस्ट सेल (Host Cell) असं म्हटलं जातं. विषाणू या होस्ट सेलची सगळी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतो आणि वाढीला लागतो. विषाणूचा हल्ला धोकादायक असण्याचं एक कारण असंही आहे, की अनेक विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतरही दीर्घ काळ सुप्तावस्थेतच राहतात. त्यानंतर ते अचानक हळूहळू वाढू लागतात आणिशरीरातल्या अनेक चांगल्या पेशींमध्ये रोगाची लागण होते. हे वाचा - Explained: ऑस्ट्रेलियात एकाएकी वाढतेय उंदरांची दहशत, आणखी एका पँडेमिकची भीती अँटीव्हायरल औषध विषाणूचं जीवनचक्र तोडू शकलं, तरच प्रभावी ठरतं. पण अडचण अशी असते, की हे विषाणू बसलेले असतात पेशींमध्ये आणि विषाणूला मारण्यासाठी दिलं गेलेलं औषध त्या पेशीसाठीही हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे विषाणूला मारणं सोपं असलं तरी तो ज्यात असतो. त्या होस्ट पेशीला वाचवून विषाणूला मारणं हे खूपच अवघड आहे. आणखी एक अडचण अशी असते, की बॅक्टेरियाच्या तुलनेत विषाणूच्या संरचनेत वैविध्य असतं. तसंच, त्यांचं रूप सातत्याने बदलत असतं. काही विषाणूंच्या जनुकीय रचनेत डीएनए (DNA) असतात तर काहींच्या जनुकीय रचनेत आरएनए (RNA). काही सिंगल स्ट्रँडेड असतात तर काही डबल स्ट्रँडेड असतात. त्यामुळेच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंसाठी एकदम वेगळ्या प्रकारचा विचार करून औषध तयार करणं गरजेचं असतं. हे वाचा - 1 एप्रिलपासून 45 वर्षांहून जास्त वयाच्या व्यक्तींच लसीकरण; समजून घ्या प्रक्रिया एक यशस्वी अँटीव्हायरल औषध ते असतं जे विषाणूच्या संरचनेवर हल्ला करतं आणि मानवी शरीराच्या पेशींचं मात्र कमीत कमी नुकसान करतं. विषाणू पेशीशी जितक्या मजबुतीने जोडलेला असेल तितकं अँटीव्हायरल औषध तयार करणं अवघड असतं. इन्फ्लुएंझावरचं औषध हे अँटीव्हायरल औषधाचं उत्तम उदाहरण आहे. ते थेट विषाणूवर (Enzyme) हल्ला करतं जेणेकरून संक्रमणाची गती मंदावते.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Explainer

पुढील बातम्या