Home /News /explainer /

Explainer: देशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला? Sero Survey चा खरा अर्थ काय?

Explainer: देशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला? Sero Survey चा खरा अर्थ काय?

ICMR ने नुकत्याच झालेल्या सीरो सर्व्हेबद्दल माहिती देताना सांगितलं की, दोन तृतीयांश भारतीयांना कोरोनाची लागण होऊन गेली असावी. नेमकं काय करतात या Sero survey मध्ये आणि याचा अर्थ आपल्यात Herd immunity आली का?

नवी दिल्ली, 21 जुलै: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research - ICMR) केलेल्या ताज्या सेरॉलॉजिकल सर्व्हेतून मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षांवरच्या भारतीयांपैकी सुमारे 68 टक्के नागरिकांना कोविड-19चा (Covid19) संसर्ग होऊन गेला असावा आणि ते त्यातून बरे झाले असावेत. नॉव्हेल कोरोनाव्हायरस (Novel Coronavirus) अर्थात कोरोना विषाणूविरोधात काम करणाऱ्या अँटीबॉडीज (Antibodies Survey) किती जणांच्या शरीरात तयार झाल्या आहेत, याचा माग या सर्व्हेतून घेतला जातो. रोगाचा प्रसार नेमका किती झाला आहे, याचं मोजमाप करण्यासाठी हे उपयुक्त साधन आहे. टेस्ट्समधून कोरोनाबाधितांचे जे आकडे पुढे आले आहेत, त्यापेक्षा बाधितांची संख्या खूपच जास्त असेल, असं व्यापक पातळीवर गृहीत धरण्यात आलेलं आहे. या सेरो सर्व्हेबद्दलची माहिती घेऊ या. भारतात राष्ट्रीय पातळीवरचे किती सेरो सर्व्हे झाले? - पहिला राष्ट्रीय पातळीवरचा सेरो सर्व्हे (National Sero Survey) मे 2020मध्ये झाला होता. त्या वेळी ज्या व्यक्तींची चाचणी घेण्यात आली होती, त्यापैकी केवळ एक टक्का व्यक्तींमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटीबॉडीज होत्या. आयसीएमआरचा चौथा आणि ताजा राष्ट्रीय सेरो सर्व्हे जून-जुलै 2021मध्ये घेण्यात आला होता. पहिले तीन सर्व्हे ज्या 21 राज्यांतल्या 70 जिल्ह्यांत घेण्यात आले होते, तिथेच हा चौथा सर्व्हे घेण्यात आला होता. या चौथ्या टप्प्यात 28 हजार 975 व्यक्तींच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. ICMR च्या सर्व्हेतील 4 महत्त्वाचे निष्कर्ष ऑगस्ट 2020मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या सेरो सर्व्हेत 6.6 टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज (Antibodies) आढळल्या होत्या. डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत झालेल्या तिसऱ्या सर्व्हेत असं आढळलं होतं, की एक पंचमांश व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या. म्हणजेच तेवढ्या व्यक्तींना कोविड-19चा संसर्ग होऊन त्या बऱ्याही झाल्या होत्या. तिसऱ्या सर्व्हेत 10 वर्षांवरच्या व्यक्तींचा समावेश होता, तर चौथ्या सर्व्हेत सहा वर्षांवरच्या सर्वांचा समावेश होता. सेरो सर्व्हे का घेतले जातात? - किती टक्के लोकसंख्येला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेला आहे, याचं प्रमाण कळण्यासाठी सेरो सर्व्हेज घेतले जातात, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधितांचाही त्यात समावेश असतो. अर्थात केवळ एवढाच त्याचा उद्देश नाही. जास्त जोखीम असलेल्या गटातल्या लोकसंख्येला संसर्ग होण्याचा किती धोका अन्य लोकसंख्येच्या तुलनेत किती आहे, याचा अंदाज यावरून बांधता येतो. उदा. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, इत्यादी. त्यामुळे त्या संबंधित गटानुसार योग्य ती कार्यवाही करणं आरोग्य यंत्रणेला शक्य होऊ शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन (Dr Saumya Swaminathan) यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला कोविड-19 होऊन गेल्यानंतर त्याची प्रतिकारशक्ती किती काळ टिकते, याचा माग काढण्याची संधीही सेरो सर्व्हेतून मिळते. एकाच गटाचे सेरो सर्व्हे ठरावीक कालावधीच्या अंतराने घेतले, तर त्या विषाणूविरोधात किती प्रतिकारशक्ती (Immunity) विकसित झाली आहे, हे समजून घेता येऊ शकतं. महाराष्ट्र, केरळमध्येच का वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या? IMA ने सांगितलं कारण महत्त्वाचं म्हणजे, अजूनपर्यंत कोणाला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही, याची माहिती सेरो सर्व्हेतून कळते. त्यामुळे कोणत्या लोकसंख्येच्या गटाला अद्याप संसर्गाचा धोका आहे आणि त्या गटाला हर्ड इम्युनिटी प्राप्त करेपर्यंत किती उद्दिष्ट साध्य करायचं आहे, याचा अंदाज त्यावरून बांधता येतो. भारतात हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे का? - लोकसंख्येच्या ठरावीक गटातल्या पुरेशा लोकसंख्येमध्ये संसर्गाविरोधात अँटीबॉडीज विकसित झालेल्या असतील, तर त्या रोगाचा पुढचा प्रसार थांबू शकतो. कारण त्याला संसर्ग करण्यासाठी नव्या व्यक्ती सापडत नाहीत. या अँटीबॉडीज संबंधित रोग झाल्यामुळे किंवा लसीकरणाद्वारे (Vaccination) तयार झालेल्या असू शकतात. या स्थितीला हर्ड इम्युनिटी अर्थात सामूहिक प्रतिकारशक्ती असं म्हणतात. हर्ड इम्युनिटी तयार झाल्यास अँटीबॉडीज नसलेल्या अन्य व्यक्तींचं संसर्गापासून संरक्षण होतं. हर्ड इम्युनिटी आली का? हर्ड इम्युनिटीचं प्रमाण रोगानुसार वेगवेगळं असतं. गोवरसारख्या (Measles) प्रचंड संसर्गजन्य असलेल्या रोगाच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचं प्रमाण 94 टक्के व्हावं लागतं. म्हणजेच 10पैकी 9 व्यक्ती एक तर रोगातून बऱ्या झालेल्या असल्या पाहिजेत किंवा त्यांचं लसीकरण तरी झालेलं असलं पाहिजे; पण गोवरसारख्या अन्य रोगांचं लसीकरण ही खूप सर्वसामान्य गोष्ट असल्याने अशा रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्याचं आपल्याला दिसत नाही. तुरळक केसेसच पाहायला मिळतात. कोरोना विषाणूच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचं प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत असणं अपेक्षित आहे. याचाच अर्थ असा, की दर पाच व्यक्तींमागे चार व्यक्तींच्या शरीरात त्याविरोधातल्या अँटीबॉडीज असल्या पाहिजेत; मात्र पूर्वी कधीच न आढळलेल्या संसर्गाच्या बाबतीत हे प्रमाण गाठणं सहजसोपं नाही, असं तज्ज्ञांना वाटतं. तसंच, नव्या स्ट्रेन्स आल्या तर हर्ड इम्युनिटी निष्प्रभ ठरू शकते. तसंच, लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजना निष्प्रभ करण्याची क्षमता एखाद्या स्ट्रेनमध्ये असेल, तर हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) प्राप्त करण्यात अडथळा होतो. चौथ्या सेरो सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करताना आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव (Dr Balrama Bhargava) यांनी सांगितलं, की 'सहा वर्षांवरच्या दोन-तृतीयांश लोकसंख्येला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेलेला आहे. एक तृतीयांश लोकसंख्येच्या शरीरात अँटीबॉडीज नाहीत. त्यामुळे देशातल्या 40 कोटी लोकसंख्येला अद्याप संसर्गाचा धोका आहे.' अँटीबॉडीज तयार झालेल्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त असणं हा आशेचा किरण आहे; मात्र तरी भारतात अद्याप हर्ड इम्युनिटी तयार झालेली नसल्याने पुरेशी काळजी घेण्याला कोणताच पर्याय नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सेरो सर्व्हेमध्ये नेमकं काय केलं जातं? - ICMRने दिलेल्या माहितीनुसार, सेरो सर्व्हेमध्ये संबंधित व्यक्तींच्या शरीरात IgG antibodies तयार झालेल्या आहेत का, ते पाहिलं जातं. संबंधित व्यक्तीला संसर्गाची सुरुवात झाल्यापासून दोन आठवड्यांनंतर आणि संसर्गातून संबंधित व्यक्ती पूर्णतः बरी झाल्यानंतर या अँटीबॉडीज शरीरात दिसतात. त्या अनेक महिने टिकतात. त्यामुळे सेरो सर्व्हेतून ताज्या संसर्गाचं निदान करता येत नाही. RT-PCR किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) यांच्याद्वारे संसर्ग ओळखता येतो. त्यासाठी नाकातून किंवा घशातून नमुना (Swab Sample) घेतला जातो. त्या वेळी प्रत्यक्ष विषाणूचं अस्तित्व शोधलं जातं. सेरो सर्व्हेच्या (Sero Survey) वेळी अँटीबॉडी तपासण्यासाठी रक्ताचा नमुना (Blood Sample) घेतला जातो. त्यात विषाणूचं अस्तित्व शोधलं जात नाही, तर अँटीबॉडीजचं अस्तित्व शोधलं जातं. धक्कादायक! राज्यातल्या कोरोना मृतांच्या आकड्यात 3500 ची वाढ, हे आहे कारण अँटीबॉडी टेस्ट रिअॅक्टिव्ह (Reactive) आली, तर अँटीबॉडीज अस्तित्वात असतात आणि नॉन-रिअॅक्टिव्ह (No Reactive) आली तर त्या अस्तित्वात नसतात. कोणत्या अँटीबॉडीजचा शोध टेस्टमध्ये घेतला जातो? - IgG मधील Ig अर्थ इम्युनोग्लोब्युलिन (immunoglobulin) असा असतो. हा प्रोटीन्सचा एक वर्ग असतो आणि तो अँटीबॉडीज म्हणून काम करतो. ही प्रोटीन्स रक्तात, तसंच रोगप्रतिकार यंत्रणेत आढळू शकतात. भारतात केले जाणारे सेरो सर्व्हे G या इम्युनोग्लोब्युलिनचा शोध घेण्यासाठी केले जातात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रक्तातली 70-80 टक्के इम्युनोग्लोब्युलिन्स IgG प्रकारची असतात. संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विशिष्ट प्रकारच्या IgG अँटीबॉडीज शरीर तयार करू शकतं. त्यामुळे संबंधित सूक्ष्मजीवापासून दीर्घ काळ संरक्षण मिळतं. चौथ्या सेरो सर्व्हेतून मिळालेल्या माहितीनुसार, लसीकरण न झालेल्या 62.3 टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या. लशीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींपैकी 81 टक्के जणांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींपैकी 89.8 टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या.
First published:

Tags: Coronavirus, Covid-19

पुढील बातम्या