Explainer: लाँग कोविड म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि परिणाम

Explainer: लाँग कोविड म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि परिणाम

वयस्कर व्यक्ती, महिला, तसंच संसर्गाच्या पहिल्या आठवड्यात ज्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणू संसर्ग पाचपेक्षा अधिक प्रमाणात आढळला होता, अशा व्यक्तींमध्ये लाँग कोविड (Long Covid) विकसित होण्याची शक्यता जास्त असते, असं आढळलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 25 जून: लंडनमध्ये (London) झालेल्या एका संशोधनात (Scientific Study) असं आढळलं, की कोविड-19च्या दर 20 पीडितांमध्ये साधारणतः किमान एक जण कमीत कमी आठ आठवड्यांपर्यंत आजारी होता. वयस्कर व्यक्ती, महिला, तसंच संसर्गाच्या पहिल्या आठवड्यात ज्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणू संसर्ग पाचपेक्षा अधिक प्रमाणात आढळला होता, अशा व्यक्तींमध्ये लाँग कोविड विकसित होण्याची शक्यता जास्त असते, असं आढळलं आहे. ब्रिटनमध्ये लाखो जणांना, तर जगभरात कोट्यवधी जणांना लाँग कोविडचा त्रास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतातही काही कोविडग्रस्तांना (Covid Patient) अनेक आठवडे लक्षणं दिसत असलेल्या केसेसबद्दल ऐकलं-वाचलं असेल. कोविडमधून बरं होण्याचा दर भारतात खूप चांगला आहे; मात्र तरीही लाँग कोविडचा धोका भारतात उद्भवणारच नाही, याची खात्री दिली जात नाही. काही आठवड्यांपूर्वी कोरोनाबाधित झालेल्या तमिळनाडूच्या एका मंत्र्याचा मृत्यू झाल्याची बातमी गेल्या रविवारीच समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, लाँग कोविडची कारणं आणि परिणामांबद्दल जाणून घेण्याची गरज आहे.

लाँग कोविड (Long Covid) म्हणजे काय?

- कोविड स्टडी अॅपच्या 4000हून अधिक युझर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लंडनमध्ये केल्या गेलेल्या अभ्यासात लाँग कोविडसंदर्भात सखोल विश्लेषण करण्यात आलं आहे. कोविड-19मधून बरं झाल्यानंतरही कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे आजारपण जास्त काळ टिकून राहतं, त्याला लाँग कोविड असं म्हणतात. ज्यांच्यामध्ये लाँग कोविडची समस्या उद्भवली, त्यांच्यात कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही दोन विशेष प्रकारची लक्षणं दिसून आली.

पहिलं म्हणजे या व्यक्तींमध्ये थकवा, डोकेदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास होण्याशी निगडित लक्षणं आढळतात. तसंच, हृदय, आतडी, मेंदू आदी अवयवांवरही या रुग्णांमध्ये परिणाम झालेला दिसून येतो. लाँग कोविड झालेले रुग्ण खासकरून हृदयाशी (Heart) संबंधित किंवा मेंदूशी (Brain) संबंधित समस्या जाणवत असल्याचं सांगत आहेत.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की कोविड-19चे बहुतांश रुग्ण जास्तीत जास्त 11 किंवा त्यापेक्षा कमी दिवसांतच बरे होत आहेत; मात्र दर सात रुग्णांपैकी एका रुग्णाला बरं व्हायला चार आठवडे लागत आहेत. म्हणजेच तेवढ्या कालावधीत त्यांची लक्षणं कायम राहत आहेत. 20पैकी एका रुग्णाला बरं व्हायला आठ आठवड्यांपर्यंतचा कालावधी लागत आहे. तसंच 50पैकी एका रुग्णाला बरं होण्यासाठी आठ आठवड्यांपेक्षाही जास्त कालावधी लागत असल्याचं आढळून आलं आहे.

72 वर्षीय आजोबांना 43 वेळा कोरोनाची लागण, अखेर पत्नीही म्हणाली 'आता मरू दे' अन्.

लाँग कोविडचा धोका कोणाला?

- 18 ते 49 वर्षांपर्यंतच्या कोरोनाबाधितांमध्ये 10 टक्के रुग्णांना लाँग कोविड होत असल्याचं आढळून आलं आहे. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये याचं प्रमाण 22 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. वजन जास्त असणं हेदेखील लाँग कोविडसाठी कारणीभूत ठरणारं एक कारण असल्याचं आढळलं आहे. तरुण महिलांना पुरुषांच्या तुलनेत लाँग कोविडचा धोका 50 टक्के जास्त आहे, असं आढळलं आहे. तसंच, अस्थमाच्या (Asthma) रुग्णांनाही याचा जास्त धोका असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे.

जगभरातले हजारो लोक कोविड-19ची लक्षणं दीर्घ काळ राहत असल्याबद्दलचे आपले अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहित आहेत. काही लोक त्याला लाँग हॉलर्स म्हणत आहेत, तर काही लाँग कोविड असा उल्लेख करत आहेत.

डेल्टा व्हेरिएंटचा वाढता धोका, राज्य सरकारकडून निर्बंधासंदर्भातले नवे आदेश जारी

संभ्रम (Confusion)

- कोविड-19ची लक्षणं दीर्घ काळ राहण्याच्या समस्येमुळे आरोग्य क्षेत्रात (Health Sector) अस्वस्थता आहे. 'लिव्हिंग विथ कोविड' या नावाने एका शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात त्याने म्हटलं आहे, की लाँग कोविडची कारणं आणि परिणाम यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खूप संशोधनाची गरज आहे. त्यासाठी रुग्णांना आणि डॉक्टर्सना डेटा मेन्टेन (Patient Data) करण्याची गरज आहे. कारण तरच अभ्यास करून कोणता तरी निष्कर्ष काढणं शक्य होऊ शकेल.

प्राथमिक संशोधनात शास्त्रज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे, की लाँग कोविड (Long Covid) हे आजारपणाचं एक दुष्टचक्र असू शकतं. याची लक्षणं शरीराच्या अनेक अवयवांवर दुष्परिणाम करतात. तसंच, व्यक्तिपरत्वे रोगाची गंभीरताही वेगवेगळी असते. कोविड-19चे मनोवैज्ञानिक आणि सामाजिक प्रभाव दीर्घ काळपर्यंत दिसत राहतील, या गोष्टीला दुजोरा देणारे अनेक पुरावे सापडले असल्याचं या अहवालात शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: June 25, 2021, 4:48 PM IST

ताज्या बातम्या