जाकार्ता, 13 ऑगस्ट: नियोजित वधूचे लग्नाआधी कोणाशी शारीरिक संबंध आले आहेत का हे तपासण्यासाठी कौमार्यपरीक्षा अर्थात व्हर्जिनिटी टेस्ट (virginity Test) करण्याची अघोरी प्रथा आपल्याकडे काही समुदायांमध्ये होती. महिलांना असमानतेची-भेदभावाची, अपमानाची, अविश्वासाची वागणूक देणारी ही कुप्रथा कायद्याला मान्य नसली, तरी अजूनही कुठे कुठे अशा घटना घडत असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. जगभरातल्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी आजही मुलींची/महिलांची व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते. इंडोनेशियात (Indonesian Army stops Virginity test of women cadets) लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या महिलांना शारीरिक क्षमता (Physical Ability Tests) चाचण्यांबरोबरच व्हर्जिनिटी टेस्टलाही (Virginity Test) सामोरं जावं लागायचं. त्या पद्धतीला अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर, इंडोनेशियाच्या लष्कराने (Indonesia) या व्हर्जिनिटी टेस्ट्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचं सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे.
महिलांच्या योनीच्या बाहेरच्या भागावर एक पातळ पडदा असतो. त्याला योनिपटल म्हणजेच हायमेन (Hymen) असं म्हटलं जातं. पहिल्यांदा शरीरसंबंध होतात, त्या वेळी हे हायमेन भंग पावतं आणि थोडासा रक्तस्राव (Bleeding) होतो. त्यावरून, पहिल्यांदा शरीरसंबंधांच्या वेळी रक्तस्राव झाला नाही, तर संबंधित स्त्रीचा कौमार्यभंग (Loss of Virginity) आधीच झाला होता असं मानलं जायचं; मात्र या मानण्याला काहीच वैज्ञानिक आधार (No Scientific Base) नाही, असं नंतरच्या काळात स्पष्ट झालं.
'लढा वाईट मानसिकतेविरोधात'; तालिबानविरुद्ध लढण्यासाठी या महिलेने उभी केली फौज
कारण हे हायमेन इतकं पातळ असतं, की सायकलिंग, व्यायाम आदी शारीरिक हालचालींमुळेही ते फाटू शकतं. त्यामुळे त्यावरून स्त्रीचं कौमार्य ठरवलं जाऊ नये, असं विज्ञानातून स्पष्ट करण्यात आलं. तरीही अफगाणिस्तान, इजिप्त, दक्षिण आफ्रिका अशा जगातल्या सुमारे 20 देशांमध्ये अजूनही मुलींची विविध कारणांसाठी व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते. भावी जोडीदाराकडून किंवा नोकरी देणाऱ्या कंपनीकडून ही टेस्ट केली जाते. व्हर्जिनिटी टेस्टला टू फिंगर टेस्ट (Two Finger Test) असंही म्हटलं जातं.
इंडोनेशियाचं लष्कर, नौदल आणि हवाई दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या महिलांची व्हर्जिनिटी टेस्ट करण्याची पद्धत 1965 सालापासून सुरू आहे. ज्या महिला या टेस्टमध्ये उत्तीर्ण व्हायच्या नाहीत, त्यांना बाकीच्या गोष्टी योग्य असल्या, तरी लष्करात भरती होता यायचं नाही. इतकंच नव्हे, तर लष्करी अधिकाऱ्याशी विवाह करू इच्छिणाऱ्या महिलेचीही व्हर्जिनिटी टेस्ट केली जायची.
Independence Day 2021: जगातील आणखी 5 देश 15 ऑगस्टला साजरा करतात स्वातंत्र्य दिन
2014मध्ये ह्युमन राइट्स वॉचने (Human Rights Watch) पहिल्यांदा इंडोनेशियाच्या लष्करभरतीतल्या या पद्धतीबद्दल आवाज उठवला होता. 1965पासून हजारो महिलांना या टेस्टला सामोरं जावं लागलं होतं, असंही त्या वेळी झालेल्या तपासात स्पष्ट झालं होतं. पोलिस आणि लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या महिलांना व्हर्जिनिटी टेस्टला सामोरं जावं लागतं, याविरोधात 2015मध्ये इंडोनेशियाच्या माजी आरोग्यमंत्री नीला मोएलोक यांनी जाहीरपणे आवाज उठवला होता. त्या टेस्टची गरज, अचूकता आणि आवश्यकता याबद्दल आपल्याला शंका असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. युरोपीयन कमिशनकडेही हा मुद्दा नेण्यात आला होता. व्हर्जिनिटी टेस्ट म्हणजे भेदभाव करणाऱ्या असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
व्हर्जिनिटी टेस्टला शास्त्रीय आधार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) स्पष्ट केलं होतं. तसंच ही टेस्ट झालेल्या महिलेच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तात्कालिक, तसंच दीर्घकालीन विपरीत परिणाम होऊ शकतात, असा इशाराही दिला होता.
इंडोनेशियाच्या राष्ट्रीय पोलिस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या महिलांनाही या टेस्टला सामोरं जावं लागायचं; मात्र पोलिस यंत्रणेने या टेस्ट्स थांबवण्याचा निर्णय 2015मध्ये घेतला. लष्करात मात्र ही पद्धत सुरूच होती. अखेर या टेस्ट्स थांबवण्याचा निर्णय इंडोनेशियाच्या लष्कराने घेण्यासाठी 2021 साल उजाडावं लागलं. या टेस्टद्वारे महिलांच्या नैतिकतेचीही चाचणी घेतली जाते, असं इंडोनेशियाच्या सैन्यात पूर्वी मानलं जायचं.
इंडोनेशियाच्या आर्मी जनरल आणि चीफ ऑफ स्टाफ अँडिका पेरकासा (Andika Perkasa) यांनी नुकतीच अशी घोषणा केली, की लष्करभरतीसाठी अनिवार्य असलेल्या व्हर्जिनिटी टेस्ट्स रद्द करण्यात आल्या आहेत. 'लष्करभरतीची प्रक्रिया पुरुष आणि महिला या दोघांसाठीही समान असावी आणि ही भरती केवळ शारीरिक क्षमतेच्या आधारेच केली जावी, असं आम्हाला वाटतं,' असं त्यांनी सांगितलं. लष्करी अधिकाऱ्यांच्या भावी वधूचीही व्हर्जिनिटी टेस्ट घेण्याची गरज नाही, असं पेरकासा यांनी स्पष्ट केलं.
'प्रार्थना करा..'; महिला पत्रकारानी सांगितली अफगाणिस्तानातील भयंकर स्थिती
'नॅशनल कमिशन ऑन व्हायोलेन्स अगेन्स्ट वूमन'च्या प्रमुख अँडी येंत्रियानी यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितलं, की या टेस्ट्सची कधीच आवश्यकता नव्हती. या टेस्ट्स केल्या जाऊ नयेत, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनेही 2018मध्ये केलं होतं. कारण या टेस्ट्स महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन करतात.
म्हणूनच इंडोनेशियातल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांसह समाजाच्या विविध स्तरांवरून इंडोनेशियाच्या लष्कराच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे.
दरम्यान, इंडोनेशियाच्या नौदलाचे प्रवक्ते ज्युलियस विडजोजोनो यांनी सांगितलं, की नौदलात भरतीपूर्वी महिलांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जायची, व्हर्जिनिटी टेस्ट नाही.
अफगाणिस्तानात तरुणींचं तालिबानी का करताहेत अपहरण;कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन
इंडोनेशियाच्या हवाई दलाच्या प्रवक्त्यांनीही त्यांचीच री ओढली. 'महिलांच्या शरीरात सिस्ट किंवा अन्य काही गुंतागुंत नाहीये ना हे तपासण्यासाठी प्रेग्नन्सी/रिप्रॉडक्शन टेस्ट केली जायची. कारण तसं काही असेल, तर त्यांच्या शारीरिक क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणून ते तपासलं जायचं. हवाई दलाच्या टर्मिनॉलॉजीमध्ये कधीही व्हर्जिनिटी टेस्टचा समावेश नव्हता,' असं त्यांनी सांगितल्याचं रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.