आता पुण्यातच तयार होतेय भारतातली पहिली mRNA कोरोना लस; काय आहेत तिची वैशिष्ट्यं?

आता पुण्यातच तयार होतेय भारतातली पहिली mRNA कोरोना लस; काय आहेत तिची वैशिष्ट्यं?

mRNA प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या लशी कोरोना विषाणूविरोधात सर्वात जास्त प्रभावी ठरत असल्याचं आढळून आलं आहे.

  • Share this:

केन्नथ मोहंती/पुणे, 14 जुलै : कोरोना विषाणूविरोधात (Coronavirus) प्रभावी लढा देण्यासाठी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी कोरोना लशी (Corona vaccine) विकसित केल्या आहेत. तसंच अजून अनेक लशींवर संशोधन सुरू आहे. mRNA प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या लशी कोरोना (mRNA Corona vaccine) विषाणूविरोधात सर्वांत प्रभावी ठरत असल्याचं आढळून आलं आहे. अमेरिकेतल्या फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी या प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या लशी विकसित देशांमधल्या लसीकरण (Corona Vaccination) कार्यक्रमांचा महत्त्वाचा भाग आहेत. पण आता भारतातही mRNA प्लॅटफॉर्मवर स्वदेशी लस विकसित होत आहे.

पुण्यातल्या जेनोव्हा फार्मास्युटिकल्स (Gennova Pharmaceuticals) या कंपनीने या प्रकारची लस विकसित केली असून, या लशीचे पहिल्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आले असल्याचं जेनोव्हा कंपनीने सांगितलं आहे. या लशीवरचं संशोधन अद्याप सुरू असल्याने अद्याप त्याविषयी काही बोलणं खूप घाईचं ठरेल; पण भारत ज्याकडे आशेने पाहू शकतो, अशा या लशीबद्दलची काही माहिती घेऊया.

जेनोव्हा व्हॅक्सिनविषयी

- HGC019 असं या लशीचं नाव असून, पुण्यातली  जेनोव्हा फार्मास्युटिकल्स आणि अमेरिकेतली HDT Biotech Corporation या कंपन्यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनातून ही लस विकसित केली आहे. Sars-CoV-2 अर्थात कोरोना विषाणूची जनुकीय माहिती (Genome Data) जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित झाल्याबरोबर लगेचच लस विकसित करण्याच्या संशोधनाला सुरुवात केल्याचं कंपनीने सांगितलं. तसंच, मानव वगळता उंदरांसह अन्य काही प्राण्यांवर घेतलेल्या या लशीच्या चाचण्यांमध्ये असं आढळून आलं आहे, की ही लस सुरक्षित आहे. लस दिलेल्या प्राण्याच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती (Immune Response) विकसित होण्यास चालना देण्यात आणि अँटीबॉडी विकसित होण्यात ती हातभार लावते, असं कंपनीने म्हटलं आहे.

हे वाचा - पुण्यात रुग्ण घटले पण धोका टळला नाही! अ‍ॅक्टिव्ह रुग्णांबाबतीत हाच जिल्हा टॉपवर

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेकडे असलेल्या नोंदीनुसार, HGCO19 या लशीच्या वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या पहिल्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये (Clinical Trials) 18 ते 70 या वयोगटातल्या 120 निरोगी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार कंपनीला एकत्रितरीत्या अनेक टप्प्यांत ट्रायल्स घेण्यास परवानगी मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल्समध्ये 18 ते 75 वयोगटातल्या सुमारे 500 व्यक्ती सहभागी झाल्या.

- mRNA व्हॅक्सिन म्हणजे काय?

- mRNA व्हॅक्सिन न्यूक्लिक अॅसिड व्हॅक्सिनच्या (Nucleic Acid Vaccine) गटात मोडतात. रोगकारक विषाणू किंवा जिवाणूच्याच (Pathogen) जनुकीय घटकांचा वापर करून या लशी विकसित केल्या जातात. शरीराच्या प्रतिकार यंत्रणेला त्या रोगकारक घटकाविरोधात सक्रिय करण्याचा म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्याचा हेतू त्यामागे असतो.

पारंपरिक लशींमध्ये रोगकारक विषाणूचा अर्धमेला (Weakened) किंवा निष्क्रीय (Inactivated) केलेला भाग वापरलेला असतो. तो शरीरात टोचून तशा प्रकारच्या विषाणूविरोधात रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्याचं काम त्या लशी करतात. न्यूक्लिक अॅसिड व्हॅक्सिन म्हणजेच RNA किंवा DNA व्हॅक्सिन्स मात्र वेगळ्या प्रकारे विकसित केलेली असतात. त्यात संबंधित रोगकारक विषाणूचा/जिवाणूचा जेनेटिक कोड (Genetic Code) समाविष्ट असतो. ते लशीद्वारे मानवी शरीरात टोचले गेल्यावर शरीराच्या पेशी विशिष्ट प्रोटीन्सची (Target Proteins) निर्मिती करतात. शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा ती प्रोटीन्स ओळखते आणि त्यांना लक्ष्य करते.

हे वाचा - पळून पळून किती पळणार! अशा ठिकाणी दिली कोरोना लस ज्याचा कुणी विचारही केला नसेल

या लशींमध्ये विषाणूचा अर्धमेला किंवा निष्क्रीय अशा कोणत्याच प्रकारचा जीवित घटक नसल्याने त्या रोगालाच लशीमुळे चालना मिळण्याची भीती नसते. ज्या विषाणूविरोधात लस विकसित करायची आहे, त्या विषाणूची जनुकीय साखळी उलगडल्यानंतर अशा प्रकारच्या लशी विकसित करणं हे लस विकसित करण्याच्या अन्य पद्धतींच्या तुलनेत सोपं असतं. कोरोना विषाणूची जनुकीय साखळी (Genome Sequencing) उलगडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत मॉडर्ना कंपनीच्या लशीच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू झाल्या होत्या.

लस विकसित करण्याची ही पद्धत अन्य पद्धतींच्या तुलनेने नवीन आहे. HIV, Zika Virus यांसारख्या अनेक विषाणूंविरोधात डीएनए किंवा आरएनए प्रकारच्या लशी विकसित केल्या जात आहेत; मात्र कोविड-19विरोधात तयार करण्यात आलेल्या या प्रकारच्या लशी मानवात पहिल्यांदा वापरल्या गेल्या आहेत. कारण या आजाराच्या व्याप्तीमुळे आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली.

- जेनोव्हा लशीचं वेगळेपण काय आहे?

- जेनोव्हा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी विकसित केलेल्या लशीतून कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमधलं D614G हे म्युटेशन व्यक्त होतं. जगभरात सुरुवातीच्या काळात कोरोनाची ही स्ट्रेन मोठ्या प्रमाणावर पसरली होती. सध्या जगभरात ज्या स्ट्रेन्स पसरलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याच स्ट्रेन्सविरोधात लशी विकसित केल्या गेलेल्या नाहीत. कारण या लशी विकसित करतानाच्या काळात त्या स्ट्रेन्स अस्तित्वात नव्हत्या. तरीही सध्या उपलब्ध असलेल्या लशी सध्याच्या स्ट्रेन्सपासून संरक्षण देत असल्याचं संशोधनात आढळलं आहे.

हे वाचा - भारत नव्हे, आता हा देश ठरतोय आशियातला कोरोना हॉटस्पॉट

HGCO19 ही लस self-amplifying saRNA या प्लॅटफॉर्मचा वापर करते, असं कंपनीने सांगितलं. फायझर, मॉडर्ना या कंपन्यांच्या लशी mRNA प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेल्या आहेत. saRNA आणि mRNA या दोन्ही प्लॅटफॉर्मवरच्या लशींद्वारे मानवी पेशींना प्रामुख्याने हा संदेश दिला जातो, की संबंधित रोगकारक विषाणूचं महत्त्वाचं प्रोटीन पेशींनी तयार करावं. saRNA या प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या लशींमध्ये याशिवाय code for the virus enzyme म्हणजेच विषाणूच्या विकराचा संकेतांकही असतो. त्यामुळे ही लस दिल्यानंतर मानवी पेशींमध्ये विषाणूच्या आरएनएच्या अनेक प्रती विकसित केल्या जातात. त्यामुळे प्रोटीन लवकर तयार होतं.

तसंच, saRNA प्रकारच्या लशी पेशींमध्ये स्वतःच्या प्रती (Copies) तयार करू शकत असल्यामुळे mRNA लशींच्या तुलनेत saRNA प्रकारच्या लशींचा डोस कमी प्रमाणात पुरतो. तसंच, त्यांच्या निर्मितीचा खर्चही कमी असतो. कोरोनाबद्दलच्या एका अभ्यासातून नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणांत असं लक्षात आलं आहे, की saRNA प्रकारच्या लशीच्या 1.25mg डोसपासून मिळालेलं संरक्षण mRNA2 प्रकारच्या लशीच्या 50‑250μg डोसएवढंच आहे.

- ही लस कधी उपलब्ध होऊ शकेल?

- लसनिर्मात्यांकडे या लशीच्या पहिल्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्सचा डेटा आहे. तो डेटा ते सादर करणार आहेत. अद्याप यात अनेक टप्पे आहेत. 'दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल्स एकत्रितरीत्या घेता येण्याची परवानगी आम्ही मागणार आहोत. त्यानंतर आपत्कालीन वापरासाठी मंजुरीकरिता अर्ज करणार आहोत,' असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

कंपनी आपली निर्मितीक्षमता आणि गुंतवणूक वाढवत असून, पुरवठा साखळी, वितरण या व्यवस्थाही वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानाला साठवता येणं शक्य आहे. त्यामुळे या लशीच्या वाहतुकीत काही विशेष अडचणी येण्याची शक्यता नाही.

First published: July 14, 2021, 11:22 PM IST

ताज्या बातम्या