जकार्ता, 14 जुलै : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Corona Virus) भारतातील जोर ओसरत असताना इंडोनेशियामध्ये (Indonesia) कोरोनाच्या नव्या लाटेनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. इंडोनेशियातील वेगवेगळ्या भागात सध्या कोरोना पसरत असून दैनंदिन रुग्णांची आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येबाबात इंडोनेशियानं आता भारतालाही मागे टाकलं असून गेल्या 24 तासांत 40 हजारांपेक्षाही (40 thousand) अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
नव्या रुग्णांमध्ये वाढ
इंडोनेशियात कोरोनाची लाट वाढत चालली असून गेल्या 24 तासांत 47,899 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती निक्केई एशिया या जपानी वृत्तपत्रानं दिली आहे. इंडोनेशियाच्या गजबजलेल्या जावा परिसरात गेल्या आठवड्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत होते. मात्र जावासह इतर भागातही कोरोना पसरू लागला आहे. इंडोनेशियात बेड रिकामे असल्याचा दावा तिथल्या आरोग्यमंत्र्यांनी केला असला, तरी काही भागात मात्र रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे.
ऑक्सिजनसाठी रांगा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतात जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आता इंडोनेशियात दिसत आहे. लोकांना ऑक्सिजन उपलब्ध होत नसून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनसाठी अक्षरशः नागरिकांच्या रांगा लागत असल्याची स्थिती आहे. अनेक नागरिकांचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.
डेल्टा व्हेरिअंटची भीती
डेल्टा व्हेरिअंटमुळे बाधित झालेले काही रुग्ण जावामध्ये आढळून आले आहेत. हा व्हेरियंट जर जावाबाहेर गेला, तर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. सध्या मात्र जावाच्या बाहेर डेल्टाचा प्रभाव नसल्याची माहिती इंडोनेशियाच्या आरोग्य खात्यानं दिली आहे.
हे वाचा - ... तर Lockdown पुन्हा जाहीर करा, मोदी सरकारचा राज्यांना इशारा
एकूण मृत्युंच्या बाबतीत भारतच अव्वल
इंडोनेशियात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असली तरी एकूण मृत्युंचा विचार करता भारतच पहिल्या नंबरवर असल्याचं चित्र आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळं 4 लाख 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर इंडोनेशियात आतापर्यंत 68 हजार मृत्युंची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, India, Indonesia