मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : आखाड्यांची संपत्ती किती? कुठून येतो हा पैसा आणि कुठला आखाडा सर्वाधिक श्रीमंत?

Explainer : आखाड्यांची संपत्ती किती? कुठून येतो हा पैसा आणि कुठला आखाडा सर्वाधिक श्रीमंत?

आखाड्यांची संपत्ती किती? कुठून येतो हा पैसा? (Photo: Shutterstock)

आखाड्यांची संपत्ती किती? कुठून येतो हा पैसा? (Photo: Shutterstock)

या धार्मिक आखाड्यांना सोसायटी कायद्यांतर्गत (Society Law) नोंदणी करावी लागते. त्यांना देणगी देणाऱ्या लोकांना प्राप्तिकर कायद्याच्या नियम 12 ए अंतर्गत करांतून सूट देण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : कुंभमेळा (Kumbh mela) आला की देशात सर्वत्र हिंदू धर्माची केंद्रस्थानं असणारे आखाडे (Akhada), त्यांच्या भव्य मिरवणुका, समारंभ, तिथले महंत यांची चर्चा सुरू होते. जशी दक्षिणेकडील मंदिराच्या (Temples in South) श्रीमंतीची चर्चा होते तशी आखाड्यांच्या संपत्तीचीही चर्चा होत असते. माध्यमांमधून याबाबतीतल्या विविध बातम्या येत असतात. देशातील या आखाड्यांमध्ये एवढा पैसा आणि संपत्ती कोठून येते, त्यांना मिळालेला पैसा प्राप्तिकराच्या (Income tax) कक्षेत येतो का? त्यांना कायदे कसे लागू होतात? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. सध्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे (Niranjani Akhada) प्रमुख महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri) यांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा आखाड्यांची मालमत्ता आणि त्यांच्याशी संबंधित विषयांना तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.

देशात मान्यताप्राप्त 13 आखाडे आहेत. त्यांची स्थापना शेकडो वर्षांपूर्वी स्वतः आद्य शंकराचार्यांनी (Shankaracharya) केली होती. तेव्हापासून हे आखाडे कार्यरत आहेत. अनेक आखाडे मंदिरांचे व्यवस्थापन बघतात. हा त्यांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. त्याचबरोबर भक्त जसे मंदिरात पैसे देतात तसेच आखाड्यासाठीही देणगी देतात. यात रोख रकमेसह जमिनीचाही समावेश असतो. कुंभमेळा आणि अन्य मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी राज्य सरकारही आखाड्यांना आर्थिक मदत करते. आखाड्यांद्वारे धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा तसंच गोशाळाही चालवल्या जातात. तसंच विविध स्थावर मालमत्तेच्या भाड्यातूनही उत्पन्न मिळते. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे, श्रीमंत व्यक्ती आखाड्यांना मोठ्या देणग्या तसंच जमिनी देत असतं. त्यामुळे आखाड्यांकडे स्थावर मालमत्तांचे प्रमाणही मोठे आहे.

मोठमोठे धार्मिक कार्यक्रम (Religious Programs), कुंभमेळ्यातील मोठे मंडप, रथ, घोडे, पालख्या यासाठी आखाडे पैसा खर्च करतात. मालमत्तेची देखभाल, कर्मचाऱ्यांचा खर्च तसंच आखाड्यांमधील संत -महंतांचे देश -विदेशातील प्रवास यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.

एका मुलीचा फोटो ठरला नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं कारण? वाचा सुसाइड नोटमध्ये आनंद गिरी यांच्यावर काय आहे आरोप

देशातील काही आखाडे अतिशय श्रीमंत आहेत. त्यात महंत नरेंद्र गिरी प्रमुख असलेल्या निरंजनी आखाड्याचाही समावेश होतो. निरंजनी आखाड्याचे प्रमुख आणि बाघंबरी मठाचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी अध्यक्ष असलेल्या या आखाड्याची तर देश-परदेशातही अमाप संपत्ती असल्याची चर्चा आहे. या आखाड्याचे प्रयागराज आणि आसपासच्या परिसरात मठ, मंदिरे आणि जमिनी असून, त्याचं मूल्य 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर हरिद्वार आणि इतर राज्यांमधील मालमत्तेची किंमतही यात धरली तर या आखाड्याकडील मालमत्तेचे मूल्य एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. निरंजनी आखाड्याचे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन, मिर्झापूर, माउंट आबू, जयपूर, वाराणसी, नोएडा आणि बडोदा इथं मठ आणि आश्रम आहेत.

निर्वाणी आखाड्याचे साधूही खूप श्रीमंत आहेत. फैजाबाद, गोंडा, बस्ती, प्रतापगढ इथं त्यांची बरीच जमीन असून, फैजाबादमधील काही गावंही त्यांच्या मालकीची आहेत.

निर्मोही आखाड्याकडे बस्ती, माणकपूर, खुर्दाबाद इत्यादी ठिकाणी भरपूर जमीन आहे. शुजा-उद-दौलाच्या काळात नवाबाकडून चार बिघा जमीन मिळाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या खाकी या आखाड्याची बस्ती इथं जमीन आहे. फक्त निरावलंबी आखाड्याकडे यांच्या तुलनेत फार कमी संपत्ती आहे.

कोण आहेत आनंद गिरी? यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद

कायदा असा लागू होतो

या धार्मिक आखाड्यांना सोसायटी कायद्यांतर्गत (Society Law) नोंदणी करावी लागते. त्यांना देणगी देणाऱ्या लोकांना प्राप्तिकर कायद्याच्या नियम 12 ए अंतर्गत करांतून सूट देण्यात आली आहे. आखाड्यांना आणि सर्व धार्मिक संस्थांना त्यांच्या देणग्या आणि खर्चाचा हिशेब दरवर्षी प्राप्तिकर विभागाला सादर करावा लागतो. काही अनियमितता आढळल्यास प्राप्तिकर विभागातर्फे या आखाड्यांना आणि सर्व धार्मिक संस्थांना नोटिसा पाठवल्या जातात.

प्रयागमधील कुंभमेळ्यानंतर (Prayag Kumbh) प्राप्तिकर विभागाने 13 आखाड्यांना नोटिसा (Notice) पाठवल्या होत्या. यामध्ये महंत नरेंद्र गिरी यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. ज्या संस्थाना आर्थिक उत्पन्न मिळत आहे, त्यांना प्राप्तिकर कायद्यांतर्गत कोणत्याही परिस्थितीत एका वर्षात त्यांच्या उत्पन्नाचा 85 टक्के भाग धर्मादाय कामासाठी खर्च करावा लागतो, तर उर्वरित 15 टक्के उत्पन्न पुढील वर्षात खर्च करता येतो, असं प्राप्तिकर विभागानं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Allahabad, India, Kumbh mela