नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : कोरोना विषाणूच्या (Corona Pandemic) संसर्गाचा कहर अजून आटोक्यात आलेला नाही, तरीही तो आता कुठे जरासा ओसरू लागला आहे. तोपर्यंत डेंग्यूने (Dengue) अनेक ठिकाणी थैमान घालायला सुरुवात केली आहे. भारतात अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या काही वर्षांत डेंग्यू हा आजार जगभरात अनेक ठिकाणी हातपाय पसरतो आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) डेंग्यूबद्दलची काही महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. ती माहिती जाणून घेऊ या.
डेंग्यू म्हणजे काय?
डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून पसरणारा विषाणूजन्य रोग (Viral Disease) असून, उष्णकटिबंधीय आणि अर्ध-उष्णकटिबंधीय वातावरण (Tropical & Sub-tropical Environment) असलेल्या जगभरातल्या सर्व ठिकाणी तो आढळतो. खासकरून शहरी आणि निमशहरी भागांत हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो. हा रोग पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूला डेंग्यू व्हायरस (DENV) असं म्हणतात. डेंग्यू व्हायरसच्या संसर्गामुळे बहुतांशी वेळा सौम्य आजारपण येतं. याची लक्षणं फ्लूसारखी असतात. काही वेळा मात्र यातून गुंतागुंत तयार होऊन मृत्यूही होऊ शकतो. त्याला सीव्हिअर डेंग्यू असं म्हणतात.
आशियातल्या आणि लॅटिन अमेरिकेतल्या काही देशांमध्ये सीव्हिअर डेंग्यू हे गंभीर आजाराचं आणि मृत्यूचं कारण ठरत आहे. त्यावर योग्य वैद्यकीय उपचार झाल्याशिवाय तो नियंत्रणात येत नाही.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे डेंग्यू किंवा सीव्हिअर डेंग्यूसाठीही नेमकी अशी ट्रीटमेंट (Treatment) अस्तित्वात नाही. डेंग्यूचा संसर्ग होऊन त्याची वाटचाल सीव्हिअर डेंग्यूकडे होत असल्याचं निदान लवकर झालं आणि योग्य वैद्यकीय मदत मिळाली, तर मृत्युदर एक टक्क्याच्या खाली राहू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
गेल्या काही दशकांमध्ये डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार वेगाने वाढला आहे. त्यामुळे जगाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला डेंग्यूच्या संसर्गाचा धोका आहे. दर वर्षी जगभरात सुमारे 10 कोटी ते 40 कोटी जणांना डेंग्यूचा संसर्ग होतो.
पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू तापापासून करा कुटुंबाचा बचाव; हे 5 उपाय आहेत फायदेशीर
डेंग्यू कसा पसरतो?
डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने इडिस एजिप्ती (Aedes aegypti) या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस (Aedes albopictus) या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकनगुनिया, येलो फीव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. डेंग्यू उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या सर्व ठिकाणी पसरतो. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.
डेंग्यूचा विषाणू फ्लॅव्हिव्हिरिडी (Flaviviridae) कुळातला असून, त्याचे चार सेरोटाइप्स (Serotypes) आहेत. DENV-1, DENV-2, DENV-3 आणि DENV-4 असे ते चार प्रकार आहेत. यापैकी कोणत्याही सेरोटाइपच्या विषाणूचा संसर्ग एखाद्या व्यक्तीला झाला आणि ती व्यक्ती त्यातून बरी झाली, तर त्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यभर त्या सेरोटाइपचा संसर्ग होत नाही. त्या व्यतिरिक्त अन्य सेरोटाइपचा संसर्ग मात्र होऊ शकतो.
संसर्ग झालेल्या व्यक्तींनी प्रवास केला, की त्यांच्यासोबत डेंग्यूचे विषाणूही नव्या प्रदेशात जातात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावून ते दुसऱ्या व्यक्तींना चावले, की विषाणूचा संसर्ग होतो. कारण विषाणूंचं डासाच्या शरीरात पुनरुत्पादन होतं. संसर्गग्रस्त व्यक्तीला लक्षणं दिसण्याच्या दोन दिवस आधीपासून लक्षणं दिसून दोन दिवस होण्यापर्यंतच्या कालावधीत डास चावले, तर त्या डासांच्या शरीरात विषाणूचा प्रवेश होतो. गर्भवती स्त्रीला डेंग्यू झालेला असेल, तर तिच्या होणाऱ्या बाळाला (Maternal Transmission) डेंग्यूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यूमुळे बाळाचा जन्म वेळेआधी होण्याचा धोकाही असतो.
डेंग्यू पसरवणारे एडिस इजिप्ती हे डास दिवसा (Day Bite) चावतात. एक तर एकदम सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी हे डास चावतात. हे डास मनुष्यनिर्मित पाणीसाठ्यांमध्ये, डबक्यांमध्ये, टाक्यांमध्ये पुनरुत्पादन करतात. एडिस इजिप्ती जातीच्या डासाची मादी अंडी घालण्याच्या कालावधीत बऱ्याचदा चावते. तिने घातलेली अंडी कित्येक महिने जिवंत राहू शकतात. त्या अंड्यांचा पाण्याशी संपर्क आला, की त्या अंड्यांतून नवी पिढी बाहेर येते.
Dengue मुळे वाढली चिंता? आहारात 'या' गोष्टींचा समावेश केल्याने झटपट वाढतील प्लेटिलेट्स
डेंग्यूचा जागतिक प्रसार
डेंग्यूचा संसर्ग झालेल्या काही व्यक्तींना स्वतःला संसर्ग झाल्याचंही कळत नाही, इतकी सौम्य लक्षणं असतात. काही व्यक्तींना मात्र फ्लू इतकी गंभीर लक्षणंही दिसतात. काही व्यक्तींमध्ये डेंग्यू अतिगंभीर रूप धारण करून सीव्हिअर डेंग्यूमध्ये रूपांतरित होऊ शकतो. त्यात रक्तस्राव, महत्त्वाची इंद्रियं निकामी होणं, प्लाझ्मा लीकेज (Palsma Leakage) आदी प्रकार घडू शकतात. सीव्हिअर डेंग्यूमुळे मृत्यूही होऊ शकतो. 1950च्या दशकात सीव्हिअर डेंग्यू फिलिपिन्स आणि थायलंडमध्ये आढळला होता. आजच्या घडीला मात्र सीव्हिअर डेंग्यू बहुतांश आशियाई आणि लॅटिन अमेरिकन देशांत आढळतो. या देशांतल्या अनेक प्रौढांचा आणि बालकांचा यामुळे मृत्यू होतो. डेंग्यू विषाणूच्या एका सेरोटाइपचा संसर्ग झालेला असताना दुसऱ्या सेरोटाइपचाही संसर्ग झाल्यास सीव्हिअर डेंग्यू होऊ शकतो.
गेल्या दोन दशकांत जगभरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास 8 पटींनी वाढली आहे. 2000 साली 5,05,430 जणांना डेंग्यूचा संसर्ग झाला होता. 2010मध्ये ही संख्या 24 लाखांवर पोहोचली, तर 2019मध्ये ती 52 लाख झाली. 2000 साली जगभरात डेंग्यूमुळे 960 जणांचा मृत्यू झाला होता. 2015 साली मृतांचा आकडा 4032 एवढा झाला.
1970पूर्वी केवळ 9 देशांत डेंग्यूच्या गंभीर साथी आल्या होत्या. आता तो 100हून अधिक देशांत आढळतो. जगातले डेंग्यूचे जवळपास 70 टक्के रुग्ण एकट्या आशियात आहेत.
कोविड-19च्या साथीमुळे आधीच जगभरातल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच डेंग्यूनेही डोकं वर काढलं आहे. 2020 साली भारतासह नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, येमेन, थायलंड, सुदान, मालदीव, इंडोनेशिया, बांगलादेश, ब्राझील, इक्वेडोर आदी देशांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. 2021मध्ये त्यातल्या काही देशांत डेंग्यूचा संसर्ग सुरूच आहे. या दोन्ही साथी एकत्र आल्या तर ते खूप धोकादायक ठरू शकतं.
चिंता वाढली! कोरोनाचं रुप पुन्हा बदललं, आता डेंग्यू तापाप्रमाणे रुग्णांमध्ये दिसली लक्षणं
डेंग्यूची लक्षणे
जेव्हा जास्त ताप (40°C/104°F) असतो आणि खालीलपैकी दोन लक्षणं दिसत असतात, तेव्हा डेंग्यूच्या संसर्गाची शक्यता असू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज, रॅशेस यांपैकी कोणतीही लक्षणं असतील, तर डेंग्यू झालेला असू शकतो.
गंभीर डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूच्या संसर्गाची लक्षणं दिसल्यानंतर तीन ते सात दिवसांनंतर डेंग्यू गंभीर रूप धारण करू शकतो. त्या वेळी ताप काहीसा कमी (38°C/100°F) होतो आणि लक्षणं बदलू शकतात. सातत्याने उलट्या, पोट आणि खालच्या भागात वेदना (Abdominal Pains), श्वासोच्छ्वासाचा वेग वाढणं, थकवा, हिरड्यांतून रक्त येणं, अस्वस्थता, उलट्यांमध्ये रक्त यांपैकी काही लक्षणं या स्थितीत दिसू शकतात. गंभीर डेंग्यूमुळे मृत्यू होऊ शकतो. प्लाझ्मा लीकिंग, फ्लुइड अॅक्युम्युलेशन (Fluid Accumulation), श्वसनाला त्रास, गंभीर रक्तस्राव, इंद्रिय निकामी होणं आदी प्रकार होऊ शकतात.
निदान आणि उपचार
आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR Test) किंवा एलिसा टेस्टद्वारे (ELISA Test) डेंग्यूचं निदान केलं जाऊ शकतं. डेंग्यूवर विशिष्ट असे उपचार नाहीत. ताप कमी होणाऱ्या आणि वेदनाशामक गोळ्या किंवा औषधं घेऊन लक्षणं कमी करता येऊ शकतात. डेंग्यू गंभीर रूप धारण करत असेल, तर वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच उपचार होणं गरजेचं आहे. अनुभवी डॉक्टर्स आणि नर्सेस योग्य काळजी घेऊन रुग्णाचा जीव वाचवू शकतात.
लस
डेंगव्हॅक्सिया (Dengvaxia® (CYD-TDV)) ही डेंग्यूवरची पहिली लस सनोफी पास्चर (Sanofi Pasteur) कंपनीने विकसित केली असून, 2015 साली तिला मंजुरी देण्यात आली. आता सुमारे 20 देशांत तिच्या वापराला परवानगी आहे. ही लाइव्ह अटेन्यूएटेड (Live Attenuated Vaccine) लस आहे. त्यामुळे ज्यांना आधी डेंग्यू होऊन गेला आहे (Seropositive), त्यांना ही लस दिल्यास त्याचा उपयोग होत असल्याचं आढळलं; मात्र लस देण्यापूर्वी ज्यांना डेंग्यू झालेला नव्हता (Seronegative) आणि लस दिल्यानंतर डेंग्यू झाला, तर अशा व्यक्तींमध्ये डेंग्यू गंभीर रूप धारण करत असल्याचं आढळलं. त्यामुळे लसीकरणाआधी प्रत्येक व्यक्तीची अँटीबॉडी टेस्ट करणं आवश्यक बनलं. म्हणूनच प्रत्येक देशाने ही गोष्ट लक्षात घेऊन आपापल्या देशानुसार याबद्दलचं धोरण ठरवावं, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
प्रतिबंधच सर्वांत महत्त्वाचा
डेंग्यू व्हायला नको असेल किंवा एकापासून दुसऱ्याला पसरायला नको असेल, तर उपचारांपेक्षा प्रतिबंध (Prevention) करणंच उत्तम आहे. त्यामुळे डासांचं नियंत्रण हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे.
एखाद्या व्यक्तीला डेंग्यू असल्याचं निदान झालं, तर त्या व्यक्तीला आजारी असताना डास चावणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण त्या व्यक्तीला डास चावून तोच डास दुसऱ्या व्यक्तीला चावला तर संसर्ग पसरू शकतो.
आपल्या घराच्या जवळ किंवा इमारतीत, चाळीत, वस्तीत पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. साचलेल्या पाण्यात डासांचं (Mosquito Breeding) पुनरुत्पादन होतं. कुठे डबकी तयार झाली असतील, तर ती बुजवावीत. तसंच, कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
घरातल्या टाक्या, कळशा किंवा पाणी साठवण्याची भांडी झाकलेली असतील, याची काळजी घ्या. तसंच, त्यातलं पाणी ठरावीक दिवसांनी बदलावं.
डास घरात येऊ नयेत म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी. मॉस्क्यूटो रिपेलंट्सचा (Repellents) वापर करावा. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. आवश्यकतेनुसार कीटकनाशकं, कॉइल्स आदींचा वापर करावा. शाळा, तसंच कामाच्या ठिकाणीही ही काळजी घ्यावी. घराभोवती आणि घरातही स्वच्छता राखावी.
पूर्ण कपडे घालावेत, जेणेकरून डास चावण्याची शक्यता कमीत कमी असेल.
डासांच्या नियंत्रणासाठी सामूहिक पातळीवरच्या प्रयत्नांचीही नितांत गरज आहे. आरोग्य यंत्रणेकडूनही सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशकांच्या फवारण्या वगैरे उपाय आवश्यक आहेत.
या संदर्भातलं संशोधन जगभरात अनेक संस्था-संघटना करत असून, त्याला जागतिक आरोग्य संघटनेकडूनही साह्य मिळतं. हे साह्य वेगवेगळ्या प्रकारचं आणि वेगवेगळ्या पातळीवरचं असतं. मार्गदर्शक सूचना आणि धोरणंही जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी प्रसिद्ध केली जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health