नवी दिल्ली, 12 जुलै: सध्या आपल्या देशात पावसाळ्याचा हंगाम सुरू असून सर्वत्र मोसमी वारे अर्थात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रात कोकणासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. बिहारमध्ये पूरपरिस्थिती आहे. पावसाळ्यात जसा अतिवृष्टीचा धोका असतो, तसाच आणखी एका गोष्टीचा धोका असतो, तो म्हणजे विजांचा (Lightening) कडकडाट. अवकाशात लखलखणारी विद्युल्लता क्षितिजापर्यंतचं सगळं विश्व अगदी रात्रीच्या मिट्ट काळोखातही क्षणभरासाठी का होईना, पण उजळवून टाकते, तेव्हा तिच्या विलक्षण ताकदीची कल्पना येते. वीज पडून अनेक व्यक्तींचा किंवा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येतात, तेव्हा मन विषण्ण होतं. म्हणूनच वीज पडण्याच्या घटना आपल्या बाबतीत घडल्या नाहीत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. आपण आपली काळजी कशी घेऊ शकतो, याबद्दल आपण दक्ष असलं पाहिजे आणि ज्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांनाही माहिती करून दिली पाहिजे.
वीज पडण्यातला धोका नेमका काय आहे, याची तीव्रता कळण्यासाठी त्यामागचं विज्ञान समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 'नासा'ने याबद्दलची माहिती दिली आहे. (NASA)
आकाशात लखलखणाऱ्या विजा हा विद्युत ऊर्जेचा अर्थात Electricityचाच एक प्रकार आहे, हेच पूर्वीच्या काळी मान्य नव्हतं. बेंजामिन फ्रँकलीन (Benjamin Franklin) या अमेरिकी शास्त्रज्ञाने 1752मध्ये हे सिद्ध करण्यासाठी एक प्रयोग केला. वीज कडकडत असताना पतंगाला चावी बांधून त्याने आकाशात उडवला होता. एक किल्ली त्याच्या हातात होती. वीज कडाडल्यावर त्या किल्लीवर ठिणग्या पडत होत्या. त्यावरून ती धन-ऋण प्रभार असलेली वीज आहे, हे सिद्ध झालं.
आकाशात थंड आणि उष्ण हवा एकत्र येतात, तेव्हा उष्ण हवा वर जाते. त्यातून ढगांची निर्मिती (Clouds) होते. थंड हवेत (Cold Air) बर्फाचे खडे असतात, तर उष्ण हवेत (Hot Air) पाण्याचे थेंब असतात. वादळाच्या (Thuderstorms) वेळी हे खडे आणि पाण्याचे थेंब एकमेकांवर आदळून लांब जातात. या घर्षणामुळे ढगांमध्ये स्थितिज विद्युत निर्मिती होते.
Explainer: कोरोना काळात घरातील सोन्यावर कर्ज घेताय? वाचा काय आहे तज्ज्ञांचा सल्ला
आपण बॅटरीवरची (Battery) अनेक उपकरणं वापरतो. त्या बॅटरीजमध्ये धन (+) आणि ऋण (-) प्रभाराची टोकं असतात. धन टोक वर, तर ऋण टोक खाली असतं. तसंच ढगांमध्येही प्रभार असतात. धनप्रभारित ढग वरच्या बाजूला, तर ऋणप्रभारित ढग खालच्या बाजूला असतात. जेव्हा खालच्या बाजूचा प्रभार खूप जास्त होतो, तेव्हा असंतुलन निर्माण होऊन ऊर्जा बाहेर फेकली जाते. विद्युत प्रवाहाच्या मूलभूत नियमानुसार वीज नेहमी विरुद्ध प्रभाराकडे आकृष्ट होते. त्यामुळे ही बाहेर फेकली गेलेली ऊर्जा (Energy) पृथ्वीच्या दिशेने येऊ शकते किंवा दुसऱ्या ढगावर जाऊ शकते. या विजेचा मुख्य प्रवाह जेव्हा ढगात दिसतो, तेव्हा वीज चमकलेली आपल्याला दिसते. त्यामुळे हवाही तापते. ही तापलेली हवा पसरते आणि त्यातून कडकडण्याचा आवाज ऐकू येतो. आवाजाचा हवेतून प्रवास करण्याचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत खूपच कमी असतो. त्यामुळे वीज चमकल्याचा प्रकाश आपल्याला आधी दिसतो आणि आवाज थोड्या वेळाने ऐकू येतो.
विजांच्या कडकडाटाच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दलची माहिती 'नॅशनल जिओग्राफिक'वरच्या लेखात देण्यात आली आहे.
आकाशातल्या विजेचे अनेक प्रकार आहेत. ढगातून जमिनीकडे येणारी वीज (Cloud to Earth) हा त्यातला मुख्य प्रकार आहे. प्रत्येक सेकंदाला 100 विजा पृथ्वीवर धडकत असतात. त्यातल्या प्रत्येक विजेत तब्बल एक अब्ज व्होल्ट एवढी विद्युत ऊर्जा असू शकते.
वादळाच्या ढगांच्या खालच्या बाजूला ऋण प्रभारांची पायऱ्यांसारखी मालिका तयार होते, तेव्हा ती वीज तीन लाख किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने जमिनीकडे येत असते. प्रत्येक पायरी साधारण 150 फूट लांबीची असते. जेव्हा सर्वांत खालची पायरी धन प्रभाराने भारित असलेल्या वस्तूपासून 150 मीटर अंतरावर येते, तेव्हा ती तिकडे आकृष्ट होते. ही वस्तू एखादी इमारत, झाड किंवा एखादी व्यक्तीही असू शकते. ढगांचा ऋण प्रभार आणि त्या वस्तूचा धन प्रभार यातून वीजप्रवाह वाहतो. तेव्हा आपल्याला वीज पडताना दिसते. तिचा वेग तब्बल 300 लाख किलोमीटर प्रति तास एवढा असू शकतो.
Explainer: पेरूमध्ये उगम झालेला कोरोना विषाणूचा सातवा व्हेरिएंट लॅम्ब्डा किती घातक?
विजांचे काही प्रकार
असे असतात, की त्यात विजा कधीच ढगांमधून पृथ्वीकडे येत नाहीत; पण वेगवेगळे प्रभार असलेल्या ढगांमध्येच त्यांचा प्रवास होत राहतो. विजांचे काही प्रकार ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किंवा प्रचंड मोठ्या वणव्यांमुळे किंवा हिमवादळांमुळेही तयार होऊ शकतात. बॉल लायटनिंग (Ball Lightening) नावाचा एक प्रकार शास्त्रज्ञांना अजूनही बुचकळ्यात टाकतो. त्यात एक छोटा प्रभारित (Charged) गोळा तरंगतो, प्रकाशमान होतो आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला अपवाद ठरून उडवला जात राहतो.
एकाच वेळेला एक ते 20 ढगांपासून विजा निर्माण झाल्यास, त्याला पॉझिटिव्ह लायटनिंग (Positive Lightening) म्हणतात. या विजा वादळातल्या ढगांच्या धनप्रभारित असलेल्या वरच्या भागापासून तयार झालेल्या असतात. यात नियमित प्रकारच्या विजांचा प्रवाह उलट दिशेने वाहतो. या विजा प्रचंड शक्तिशाली असतात. त्यांच्या निर्मितीच्या ठिकाणापासून 10 मैलांपर्यंतचा प्रवास त्या करू शकतात.
आकाशात चमकणाऱ्या विजांचा कडकडाट हृदयात धडकी भरवतो; पण तो पाहायला चांगला वाटतो; पण त्यापासून असलेला धोका खूपच मोठा आहे. दर वर्षी विजा पडल्यामुळे जगभरात किमान 2000 जणांचा मृत्यू होतो. वीज अंगावर पडली तर मनुष्य, प्राणी किंवा झाडंही जळून जाऊ शकतात. धक्क्याची तीव्रता कमी असेल, तर भाजण्याची तीव्रता कमी असू शकते; पण हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नंतरच्या काळात स्मृतिभ्रंश होऊ शकतो. कायमचा थकवा वाटू शकतो. ही लक्षणं आयुष्यभरही राहू शकतात.
Explainer : Avascular Necrosis म्हणजे नेमका काय आजार आहे? वाचा कोरोनाशी असलेला संबंध
बचाव कसा करायचा?
विजा चमकत असतानाच्या काळात काय काळजी घेणं आवश्यक आहे, याची माहिती अमेरिकेच्या 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन' या संस्थेच्या (CDC) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
कोणीही घराबाहेर असताना वादळासारखी स्थिती निर्माण झाली किंवा विजा चमकायला लागल्या, तर तातडीने कुठल्याही घरात किंवा बंदिस्त इमारतीत आसरा घ्यायला हवा; मात्र झाडाखाली अजिबात जाऊ नये. बंदिस्त वाहन किंवा कारमध्ये असाल, तर बाहेर येऊन नये. कारण कारचे टायर्स रबराचे असल्याने वीज घातक ठरत नाही. मात्र वाहनाच्या काचा बंद ठेवण्याची काळजी घ्यावी.
कुठेही आसरा घेणं शक्य नसेल, तर उंच डोंगरासारख्या ठिकाणी जावं. कोणत्याही परिस्थितीत जमिनीवर आडवं झोपू नये. कानावर हात घेऊन डोकं दोन पायांमध्ये घेऊन चेंडूसारखं बसावं. जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल, अशा पद्धतीने बसावं. उंच भिंतींना टेकून राहू नये.
अशा वेळी पाण्यात पोहत असाल, तर तातडीने बाहेर यावं. वीजप्रवाह ज्यातून वाहू शकतो, अशा गोष्टींना स्पर्श करू नये. उदा. तारेचं कुंपण किंवा धातूच्या कोणत्याही वस्तू
विजा कडकडताना गटाने राहू नये. एकमेकांमध्ये अंतर ठेवावं. कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं (Electronic Gadgets) वापरू नये. लँडलाइन फोन्स वापरू नयेत. काँक्रीटच्या जमिनीवर राहू नये किंवा काँक्रीटच्या भिंतींना स्पर्श करू नये. त्यातल्या धातूंमधून वीजप्रवाह वाहू शकतो.
घरातल्या इलेक्ट्रिक वायरिंगच्या वेळी अर्थिंग (Earthing) नीट असेल, याची काळजी घ्यावी. तसंच, वीज पडलीच, तर ती इमारतीच्या स्ट्रक्चरमधून प्रवाहित होण्याऐवजी वायरमधून प्रवाहित होण्यासाठी घरावर लायटनिंग रॉडही लावता येतो. अर्थात हे उपाय ऐन वेळी करण्याचे नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Rain updates, Storm