Home /News /explainer /

Explained: 5G नेटवर्कमुळे विमानातील यंत्रणेवर होणार परिणाम? एअरलाइन्सनी दिला धोक्याचा इशारा

Explained: 5G नेटवर्कमुळे विमानातील यंत्रणेवर होणार परिणाम? एअरलाइन्सनी दिला धोक्याचा इशारा

अमेरिकेतील (USA) प्रमुख प्रवासी आणि मालवाहू एअरलाइन्सच्या (Passenger and Cargo Airlines) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या आठवड्यात विमान वाहतुकीला धोक्याचा इशारा दिला आहे.

कॅलिफॉर्निया, 20 जानेवारी: अमेरिकेतील (USA) प्रमुख प्रवासी आणि मालवाहू एअरलाइन्सच्या (Passenger and Cargo Airlines) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या आठवड्यात विमान वाहतुकीला धोक्याचा इशारा दिला आहे. या मागचं कारण आहे ते म्हणजे बुधवारपासून AT&T आणि Verizon या मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी (Mobile Service Provider) 5G नेटवर्क सेवा सुरू केली आहे. या नवीन सी बँड फाइव्ह जी (C band 5G) सेवेमुळे विमानांमधील उपकरणांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे विमानाच्या यंत्रणेत गोंधळ निर्माण होऊ शकतो, परिणामी विमान सेवा अडचणीत येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचा फटका सध्या परदेशात असलेल्या आणि मायदेशात येऊ इच्छिणाऱ्या हजारो अमेरिकन नागरिकांना बसू शकतो, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे 5G सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमेरिकेनं 2021 च्या सुरुवातीला मोबाइल फोन कंपन्यांना सी बँड म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्पेक्ट्रमवर 3.7-3.98 GHz श्रेणीत मध्यम-श्रेणी 5G बँडविड्थ लिलावाद्वारे प्रदान केल्या आहेत. तब्बल 80 अब्ज डॉलर्सचा हा लिलाव होता. हे वाचा-टोंगा समुद्रातील सक्रिय ज्वालामुखीचा भारताला धोका? चेन्नईत जाणवले पडसाद यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या मते, नवीन 5G तंत्रज्ञान विमान जमिनीपासून किती अंतरावर आहे हे मोजणाऱ्या तसंच ऑटोमेटेड लँडिंग सुलभ करण्यासाठी आणि विंड शीअर नावाचे धोकादायक प्रवाह शोधण्यात मदत करणाऱ्या अल्टिमीटरसारख्या उपकरणांमध्ये अडथळा निर्माण करू शकते. कारण अल्टिमीटर्स (Altimeters) 4.2-4.4 GHz या फ्रिक्वेन्सीमध्ये कार्य करतात आणि मोबाइल नेटवर्क सेवेसाठी देण्यात आलेली फ्रिक्वेन्सी याच्या खूप जवळ आहे. या पार्श्वभूमीवर यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननं (FAA) अमेरिकेतील सुमारे 40 मोठ्या विमानतळांवर रेडिओ अल्टिमीटर न वापरण्याची सूचना केली आहे, अशी माहिती युनायटेड एअरलाइन्सचे सीईओ स्कॉट किर्बी यांनी दिली. या सूचनेमुळे दररोज 4 टक्के विमान उड्डाणं विस्कळीत होऊ शकतात, असा इशारा यूएस एअरलाइन्सनं (US Airlines) दिला आहे. यावर उपाय न केल्यास विमानतळांवर खराब हवामान, ढगांचे आच्छादन किंवा अगदी दाट धुक्याच्या प्रसंगी केवळ व्हिज्युअल अप्रोचेसचा (Visual Approaches) वापर करणे अपरिहार्य ठरेल, असं किर्बी यांनी म्हटलं आहे. हे वाचा-कोविडने मरण पावलेल्या पारशींच्या धार्मिक अंत्यसंस्कारावर सुप्रीम कोर्टाचा आक्षेप स्पेक्ट्रममध्ये (Spectrum) फ्रिक्वेन्सी जितकी जास्त असेल तितकी सेवा जलद मिळते. त्यामुळे मोबाइल कंपन्या 5G (5G) बँडविडथवरील हाय फ्रिक्वेन्सीचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितात. त्यामुळं 5G नेटवर्कचा वापर अधिक असेल,असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विमान कंपन्यांच्या या दाव्यावर व्हेरिझॉन आणि AT&T या मोबाइल कंपन्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, इतर 40 देशांमध्ये ही सी बँड 5G सेवा दाखल करण्यात आली आहे. त्यांनी विमान सेवेत अडथळे येण्याची शक्यता गृहीत धरून जोखीम कमी करण्यासाठी सहा महिन्यांसाठी फ्रान्स, अमेरिकेतील सुमारे 50 विमानतळांवर बफर झोन तयार करण्याचे मान्य केले आहे. युरोपियन महासंघानं (European Union) 2019 मध्ये 3.4-3.8 GHz श्रेणीतील 5G फ्रिक्वेन्सीसाठी काही मानकं निश्चित केली. अमेरिकेत सुरू होणाऱ्या 5Gची फ्रिक्वेन्सी यापेक्षा अधिक आहे. या बँडविड्थचा वापर 27 सदस्य देशांपैकी बर्‍याच देशांमध्ये केला जात आहे. 31 देशांमध्ये कार्यरत असलेल्या युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं (EASA), 5Gची ही समस्या यूएस एअरस्पेससाठी अधिक असल्याचं म्हटलं आहे. युरोपमध्ये 5G मोबाइल सेवेमुळे विमान सेवेत कोणताही धोका अद्याप जाणवलेला नाही, असं या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. हे वाचा-मोरारजी देसाई म्हणाले होते 'लिटिल गर्ल' मग त्यांनाच पराभूत करुन झाल्या पंतप्रधान यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनेच्या (USFAA) अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सद्वारे वापरण्यात आलेला स्पेक्ट्रम (3.6-3.8 GHz) अमेरिकेतील अल्टिमीटरसाठी वापरल्या जाणार्‍या स्पेक्ट्रम (4.2-4.4 GHz) पासून अधिक दूर आहे आणि 5Gसाठीची फ्रान्समधील ऊर्जा पातळी अमेरिकेत निश्चित करण्यात आलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे. तर मोबाइल सेवा कंपनी व्हेरिझॉनने म्हटलं आहे की, पुढील अनेक वर्षांसाठी हायर बँडच्या जवळ असलेले स्पेक्ट्रम वापरले जाणार नाहीत. दक्षिण कोरियामध्ये, 5Gसाठी 3.42-3.7 GHz फ्रिक्वेन्सी असून, एप्रिल 2019 पासून त्याचा वापर सुरू झाल्यापासून रेडिओ लहरीमध्ये अडथळे आल्याचं आढळलेलं नाही. सध्या, विमानतळांजवळ 5G मोबाइल कम्युनिकेशन वायरलेस स्टेशन कार्यरत आहेत, परंतु काही अडथळे आल्याची नोंद झालेली नाही. युरोप आणि आशियातील जवळपास 40 देशांमधील वायरलेस कॅरीयर्स आता 5Gसाठी सी बँड वापरतात, त्याचा 4.2-4.4 GHz बँडमध्ये कार्यरत असलेल्या रेडिओ अल्टिमीटरवर परिणाम झाल्याचं अदयाप आढळलेलं नाही, असं CTIA, या यूएस वायरलेस ट्रेड ग्रुपने फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनकडे सादर केलेल्या अहवालात नमूद केलं आहे. या पार्श्वभूमीवर, 5G नेटवर्कच्या वापरावर अमेरिकेत काय निर्णय घेतला जाईल, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
First published:

Tags: Airplane

पुढील बातम्या