नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वीच एका अहवालात जगातले सर्वांत जास्त क्रिप्टोकरन्सी वापरकर्ते भारतात असल्याचं समोर आलं होतं. हे डिजिटल चलन अगदी नवं होतं, तेव्हा बरेच जण यामध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नव्हते; मात्र आता क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ही सामान्य बाब झाली आहे. अर्थात, असं असलं तरी अजूनही देशातले केवळ 10 टक्के नागरिकच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. याला कारण म्हणजे क्रिप्टोमध्ये वारंवार होत असलेली फसवणूक. क्रिप्टो व्यवहार अधिकाधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह (Safe crypto transactions) व्हावेत यासाठी विविध कंपन्या कडक पावलं उचलत आहेत. गेल्या सहा महिन्यांतच फसवणूक करणारी 2 लाखांहून अधिक क्रिप्टो अकाउंट्स (More than 2 lakh crypto accounts blocked) मोठमोठ्या कंपन्यांनी बंद केली आहेत. या सर्व प्रकरणाबाबतचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.
2021च्या एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान वझीरएक्स (WazirX), कॉइनस्विच कुबेर (Coinswitch Kuber) आणि कॉइनडीसीएक्स (CoinDCX) अशा मोठमोठ्या क्रिप्टो एक्स्चेंज प्लॅटफॉर्म्सनी दोन लाखांहून अधिक अकाउंट्स बंद केली. फसवणूक, करचुकवेगिरी आणि अन्य गंभीर कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. कॉइनस्विच कुबेरचे सीबीओ शरण नायर यांनी ‘बिझनेस लाइन’शी बोलताना याबाबत माहिती दिली.
कंपनीने गेल्या सहा महिन्यांमध्ये 1 लाख 80 हजार उपद्रवी अकाउंट्स (Coinswitch blocked accounts) बंद केली असून, आणखी दोन लाख अकाउंट्स निरीक्षणाखाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यासोबतच, वझीरएक्सने या कालावधीमध्ये 14,469 अकाउंट्स बंद (WazirX accounts blocked) केली आहेत. वझीरएक्सचे फाउंडर निश्चल शेट्टी यांनी सांगितलं, “कंपनी ब्लॉकचेन आणि क्रिप्टो अॅसेट्स काउन्सिलमध्ये (BACC) सहभागी आहे. या संस्थेशी इतर एक्स्चेंज कंपन्याही जोडलेल्या आहेत. वझीरएक्सवर होणारा प्रत्येक व्यवहार ट्रेस (Crypto transactions traced) केला जातो. तसंच, कंपनीने केवायसी नियमही कडक केले आहेत. एका ओळख प्रणालीच्या मदतीने सरकारी रेग्युलेटरच्या मदतीशिवायही व्यवहाराचा पूर्ण हिशोब ठेवला जातो. एखादा संशयास्पद व्यवहार दिसून आला, तर तो ब्लॉकचेनच्या मदतीने सर्वांसमोर जाहीर करण्यात येते. यासाठी वझीरएक्सने टीआरएम लॅब (TRM lab) या कंपनीसोबत टायअप केलं आहे. ही कंपनी क्रिप्टोकरन्सी ट्रान्झॅक्शनवर नजर ठेवते.”
काही दिवसांपूर्वीच ईडीने (ED) वझीरएक्सला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यासोबतच, या नोटीसमधून ईडीने 2790 कोटी रुपयांच्या क्रिप्टो व्यवहाराची माहिती मागवली होती. वझीरएक्स पहिल्यापासूनच हा सर्व डेटा आपल्याकडे ठेवत असल्यामुळे त्यांना याबाबत पुढे कोणतीही अडचण आली नाही.
क्रिप्टो व्यवहार पूर्णपणे ऑनलाइन होतात. तसंच, यामधलं चलनही फिजिकली उपलब्ध नसते. म्हणूनच या व्यवहारामध्ये फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. यासोबतच, रेग्युलेटर्सच्या बिटकॉइन किंवा इतर कोणत्याही क्रिप्टो व्यवहाराबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होत नाही. कित्येक युझर्स एखाद्या प्लॅटफॉर्मवरून क्रिप्टोकरन्सी घेताना चुकीच्या किंवा अनोळखी पत्त्यावर ते पाठवतात. या पत्त्याची पूर्ण माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे, हे व्यवहार ट्रॅक करणं जवळपास अशक्य (Crypto transactions are hard to trace) असतं. हे व्यवहारच ट्रॅक केले जाऊ शकत नसल्याने त्यावर कर लावणंही अशक्य होते. त्यामुळेच कित्येक जण करचुकवेगिरीसाठी क्रिप्टोची (Crypto used for tax theft) मदत घेत आहेत.
क्रिप्टोकरन्सीवर सरकारी नियंत्रण नसल्यामुळे क्रिप्टो कॉइन्स कोण घेत आहे, त्या व्यक्तीच्या उत्पन्नाचं साधन काय आहे हे एक्स्चेंज कंपनीला कळत नाही. यासोबतच, या व्यवहारांना ट्रॅक करणंही त्यांना अवघड जात आहे. यामुळे वझीरएक्ससारख्या कंपन्या थर्ड पार्टीच्या मदतीने स्वतःच सर्व व्यवहारांना नियंत्रित करत आहेत. तसंच, संशयास्पद व्यवहार दिसणारी अकाउंट्स बंद करण्याचा निर्णय घेत आहेत.
वझीरएक्सने बंद केलेल्या अकाउंट्सबाबत भारतातल्या आणि विदेशातल्या कित्येक यंत्रणांकडून माहिती मिळाली होती. विदेशातल्या संस्थांनी वझीरएक्सला अशा संशयास्पद अकाउंट्सबाबत 38 ई-मेल्स पाठवले होते. यामध्ये अमेरिका, यूके, फ्रान्स, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी अशा देशांचा समावेश होता. अर्थात, विदेशातल्या तक्रारींमुळे केवळ 10 टक्के अकाउंट्स बंद करण्यात आली होती. बाकी 90 टक्के अकाउंट्स संशयास्पद व्यवहारांमुळे आपण स्वतःच पुढाकार घेऊन बंद केल्याचं वझीरएक्सने स्पष्ट केलं.
करचुकवेगिरी आणि फसवणूक टाळण्यासाठी कॉइनस्विच कुबेरने आपल्या युझर्सवर मोठे निर्बंध (Coinswitch Kuber rules) लादले आहेत. कंपनी आपल्या वापरकर्त्यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये फंड जमा करणं किंवा काढण्याची परवानगी देत नाही. तुम्हाला पैसे काढायचे असतील, तर तुमच्याकडची क्रिप्टो कॉइन्स एक्स्चेंज प्लॅटफॉर्मवर विकावी लागतील. ती रक्कम भारतीय चलनात रूपांतरित होऊन बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केली जाते. यानंतर ती काढता येते. म्हणजे, पैसे हवे असतील, तर आपल्या बँकेची माहिती या ठिकाणी द्यावीच लागेल. त्यामुळे कोणी करचुकवेगिरी करू शकणार नाही.
कंपन्या विविध उपायांनी आपली आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी क्रिप्टोवर कोणतंही नियंत्रण नसणं हीच मोठी समस्या आहे. क्रिप्टो व्यवहारांवर अद्याप सरकारचं कसलंही नियंत्रण नाही. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेनेही (RBI) क्रिप्टोला मान्यता देण्यास मनाई केली आहे. दुसरीकडे, सरकार क्रिप्टोवर रेग्युलेशन लागू करणार असल्याच्या वावड्या काही दिवसांपूर्वी उठल्या होत्या; मात्र, अद्याप याबाबत कोणतीही माहिती वा सूचना आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी क्रिप्टो व्यवहारांची सुरक्षितता एक्स्चेंज प्लॅटफॉर्म कंपन्यांच्याच हातात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cryptocurrency, Digital currency