Explained: लशीच्या डबल डोसनंतर कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात का? 5-7 दिवसात दोन वेळा करावी लागेल टेस्ट

Explained: लशीच्या डबल डोसनंतर कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात का? 5-7 दिवसात दोन वेळा करावी लागेल टेस्ट

लसीकरण झाल्यानंतरही खबरदारी घेण्याला (Covid Appropriate Behaviour) पर्याय नाही, असंही सगळे तज्ज्ञ सांगत आहेत. त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक लस (Anti Covid Vaccine) घेतल्यानंतर संसर्गामुळे गंभीर आजारपण येत नाही, तसंच मृत्यूची शक्यता कमी होते, हे स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता काहीसा कमी झाला असला, तरी संपलेला नाही. लसीकरण (Vaccination) हाच त्यावरचा एकमेव प्रभावी उपाय असल्याचं जगभरातले तज्ज्ञ सांगत आहेत; मात्र लसीकरण झाल्यानंतरही खबरदारी घेण्याला (Covid Appropriate Behaviour) पर्याय नाही, असंही सगळे तज्ज्ञ सांगत आहेत. त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक लस (Anti Covid Vaccine) घेतल्यानंतर संसर्गामुळे गंभीर आजारपण येत नाही, तसंच मृत्यूची शक्यता कमी होते, हे स्पष्ट झालं आहे.

मात्र लसीकरण झाल्यानंतरही संसर्ग होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात वारंवार धुणं, सॅनिटायझरचा वापर (Sanitizer) आदी काळजी घेणं बंधनकारक आहे. याबाबत 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) या संस्थेने केलेल्या अभ्यासात काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. तसंच अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन (CDC) या संस्थेने आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) या अनुषंगाने काही शिफारसी केल्या आहेत, सल्ले दिले आहेत. दैनिक भास्करने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

हे वाचा-Watch Video: लसीकरणासाठी अशी झुंबड कधी पाहिली आहे का?

कोरोना प्रतिबंधासाठी सध्या जगभरात ज्या लशी (Vaccines) उपलब्ध आहेत, त्यातल्या बहुतांश लशींचे दोन डोस घ्यावे लागतात. त्यामुळे, दोन्ही डोसेस घेतल्यानंतर दोन आठवडे म्हणजेच 14 दिवस झाल्यानंतरच संबंधित व्यक्तीचं लसीकरण पूर्ण झालं (Fully Vaccinated) असं मानलं जातं. अमेरिकेतल्या CDC च्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा निकष तयार करण्यात आला असून, भारतातही हाच निकष लागू आहे. लसीकरणानंतर शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्यासाठी तेवढा कालावधी लागतो. त्यामुळे हा कालावधी ठेवण्यात आला आहे.

लसीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोनामुळे गंभीरपणे आजारी पडण्याची शक्यता फारच कमी होते. तसंच संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची शक्यताही कमी होते; मात्र लसीकरणानंतरही कोरोना संसर्ग होत नाही असा दावा मात्र कुठेही, कोणीही केलेला नाही. लसीकरण झालेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हॅरिएंटमुळे (Delta Variant) कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. तसंच, लसीकरण झालेल्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला, तर त्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींपर्यंत संसर्ग पसरवलाही जाऊ शकतो; मात्र त्याचं प्रमाण कमी असतं, असं काही अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे. स्कॉटलंडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असं दिसून आलं, की लस न घेतलेल्यांच्या तुलनेत लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरातल्या अन्य सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका 30 टक्क्यांनी कमी झाला.

हे वाचा-विदेशी नागरिकही भारतात लस घेऊ शकतात का? केंद्रानं घेतला मोठा निर्णय

तसंच, इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलं, लसीकरणानंतर घरात संसर्ग पसरण्याचा धोका 40 ते 50 टक्क्यांनी घटतो. अर्थात जास्त वेगाने संसर्ग पसरवण्याची क्षमता असलेले व्हॅरिएंट्स हे खोटं ठरवू शकतात. डेल्टा व्हॅरिएंटच्या बाबतीत तसं घडतं आहे. तरीही लसीकरणामुळे आजारपण लवकर बरं होण्यास आणि व्हायरल लोड (Viral Load) कमी होण्यास मदत होत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे.

कोरोना विषाणूच्या जनुकीय संशोधनासाठी इंडियन सार्स सीओव्ही टू जिनॉमिक कन्सॉर्शियमची (Indian SARS-CoV-2 Genomic Consortium - INSACOG) स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंट्सवर लक्ष ठेवणाऱ्या या 'इन्साकोग'च्या अहवालात म्हटलं आहे, की भारतातल्या दर 10 कोरोना रुग्णांपैकी 9 रुग्णांना डेल्टा व्हॅरिएंटचा संसर्ग झाला आहे. ICMR च्या नव्या अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे, की डेल्टा व्हॅरिएंटच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी लशीही फारशा प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळेच लस घेतलेल्यांनीही निर्धास्त होऊन निर्बंधांचं उल्लंघन करणं योग्य ठरत नाही. डेल्टा व्हॅरिएंटमुळे होणाऱ्या संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांनाच मास्क (Mask) कायम वापरण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, ब्रिटनमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

हे वाचा-दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट; मुंबईतील रिकव्हरी रेटही वाढला

लस घेतलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्या, तर त्यांनी काय काळजी घ्यायची?

लस घेतलेली व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आली, तर त्या व्यक्तीने सेल्फ आयसोलेशन केलं पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर कमीत कमी 14 दिवस स्वतःच्या प्रकृतीवर बारकाईने नजर ठेवणं अत्यावश्यक आहे. प्रकृतीत थोडासा जरी फरक वाटला, बारीकसं लक्षण दिसलं, तरी त्याकडे दुर्लक्ष करून उपयोगी नाही.

CDC या संस्थेच्या म्हणण्यानुसार, लसीकरण झालेल्या व्यक्तींकडून कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तींना फैलावण्याची शक्यता कमी आहे. तरीही ती पूर्णपणे फेटाळता येत नाही. त्यामुळेच संसर्गाची शंका आल्यास स्वतः वेगळं राहणं उत्तम.

बाधिताच्या संपर्कात आल्यास अशा व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी (Corona Test) करून घ्यावी. तसंच, ती चाचणी निगेटिव्ह आल्यास पाच-सात दिवसांनी पुन्हा एकदा चाचणी करून घ्यावी, असा सल्ला मिनियापोलिसमधल्या वॉल्डन युनिव्हर्सिटीमधल्या संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. वासिलिऑस मार्गरायइटिस यांनी दिला आहे.

हे वाचा-राज्यात पुन्हा Delta plus चं थैमान; निर्बंध शिथील झाले म्हणून हलगर्जीपणा करू नको

ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं, चव आणि संवेदना नाहीशा होणं, थकवा येणं ही कोविड-19ची सर्वसाधारण लक्षणं आहेत. यापैकी एखादं लक्षण दिसलं, तरी तातडीने स्वतःला वेगळं करावं. टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर कमीत कमी 14 दिवस (किंवा लक्षणं दिसत असेपर्यंत) वेगळंच राहावं. अर्थातच, या सगळ्यासाठी डॉक्टर्सचा सल्ला आणि त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं अनिवार्य आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

लस घेतलेली असो किंवा नसो, कोविड अॅप्रोप्रिएट बिहेव्हियर पाळण्याला पर्याय नाही. घरातून बाहेर पडताना मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, गर्दी न करणं, तरीही गर्दीत जाणं अपरिहार्य असलंच, तर डबल मास्किंग (Double Masking) करणं, इनडोअर गेट-टुगेदर असलं, तर खोलीत-घरात हवा खेळती ठेवणं, नियमित व्यायाम करणं, हेल्दी आहार घेणं आदी गोष्टींचा त्यात समावेश होतो.

First published: August 10, 2021, 2:15 PM IST

ताज्या बातम्या