Home /News /explainer /

Explainer : कोरोनाची तिसरी लाट आली? आकडेवारी नेमकी काय संकेत देतेय?

Explainer : कोरोनाची तिसरी लाट आली? आकडेवारी नेमकी काय संकेत देतेय?

काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली, 19 जुलै : कोरोना विषाणू संसर्गाची (Corona Pandemic) दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत असल्याची चिन्हं दिसत आहेत. मात्र तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचा धोका शास्त्रज्ञांनी पूर्वीच वर्तवला आहे. आता मात्र कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये घट दिसू लागल्यामुळे कोविडबद्दलच्या नियमांमध्ये पालन करण्याबद्दल लोकांमध्ये शिथिलता आली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट अगदी लवकरच म्हणजे ऑगस्ट अखेरीपर्यंत येऊ शकते, असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातल्या अनेक देशांमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असे संकेत दिसत आहेत. भारतात (India) दुसरी लाट ओसरत आली असली, तरी देशातल्या रोजच्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या सुमारे 40 हजारांच्या आसपास कायम आहे. तसंच दररोज सुमारे पाचशे जणांचा मृत्यूही देशात होत आहे. तर जगभरात सध्या दररोज साडेपाच लाख नवे कोरोनाबाधित आढळत असून, साडेआठ हजार जण दररोज मरण पावत आहेत. जगातल्या अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी 27 लाख आहे. इंडोनेशिया, ब्रिटन, फिलिपिन्स यांसारख्या अनेक देशांत कोरोना संसर्गाची नवी लाट आली असून, इटली, ऑस्ट्रेलिया आदी देशांत कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण वेगाने वाढत आहे. जगभरात काय आहे परिस्थिती? फिलिपिन्समध्ये (Phillipines) रोज सहा हजारांहून अधिक, तर मलेशियात रोज 12-13 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. जपानमध्ये टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या देशात दररोज तीन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. दक्षिण कोरियात जूनमध्ये रोज 500 रुग्ण आढळत होते. त्या प्रमाणात आता तिप्पट वाढ झाली आहे. टुरिस्ट डेस्टिनेशन असलेल्या थायलंडमध्ये जूनमध्ये दररोज चार हजार रुग्ण सापडत होते, ते प्रमाण आज 10 हजारांवर गेलं आहे. पाकिस्तानातही (Pakistan) नवी रुग्णसंख्या वाढत असून, रोज तीन हजार रुग्ण सापडत आहेत. नेपाळमध्येही जूनमध्ये कमी झालेलं रुग्णसंख्येचं प्रमाण आता वाढलं आहे. म्यानमारमध्ये जून महिन्यात रोज 500 रुग्ण आढळत होते. आता रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 6000वर गेली आहे. श्रीलंकेतही रुग्णसंख्या वाढत आहे. बांग्लादेशमध्ये जून महिन्यात रोज 3000 रुग्ण आढळत होते. ते प्रमाण आज 12 हजारांवर गेलं आहे. हे वाचा - सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा 60 लाख लोकांना बसणार फटका - टोपे युरोपीय देशांतही (European Countries) तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. ब्रिटनमध्ये युरो आणि विम्बल्डन स्पर्धांदरम्यान गर्दी दिसली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून तिथे रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. जूनमध्ये रोजची रुग्णसंख्या पाच हजार होती. आता ती 50 हजारांहून अधिक झाली आहे. फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात रोज 42 हजार रुग्ण आढळत होते. ते प्रमाण जूनमध्ये दोन हजारांवर आलं होतं. आता ते पुन्हा 11 हजारांवर गेलं आहे. इटलीतही जूनमध्ये रोज 700 रुग्ण आढळत होते, ते प्रमाण आता चौपटीने वाढलं आहे. ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला. रशियात जूनच्या पहिल्या आठवड्यात रोज 8-9 हजार रुग्ण आढळत होते, ते प्रमाण आज 25 हजारांवर पोहोचलं आहे. अमेरिकेत जुलैच्या सुरुवातीला रोज 12-13 हजार नवे रुग्ण आढळत होते. ते प्रमाण आज 40 हजारांवर पोहोचलं आहे. ब्राझीलमध्ये दररोज 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. थायलंड, दक्षिण कोरिया, जपान, व्हिएतनाम आदी देशांमध्ये लशींचा तुटवडा असल्यामुळे पुरेशा प्रमाणात लसीकरण झालेलं नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने इंडोनेशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. आतापर्यंत तिथे केवळ 14 टक्के लोकसंख्येचंच लसीकरण झालं आहे. दररोज तिथे 50 हजार नवे रुग्ण सापडत असून, हजारहून अधिक जण मरण पावत आहेत. ऑक्सिजनचं संकटही आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी? 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'च्या (ICMR) संसर्गजन्य आजार विभागाचे संचालक डॉ. समीरन पांडा (Dr Sameeran Panda) यांनी सांगितलं, 'ऑगस्ट अखेरीपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्या वेळी रोजची नवी रुग्णसंख्या एक लाखांवर जाऊ शकते. विषाणूचं म्युटेशन झालं नाही, तर या तिसऱ्या लाटेतली परिस्थिती पहिल्या लाटेप्रमाणेच असेल; पण विषाणूचं म्युटेशन झालं, तर मात्र परिस्थिती खूपच वाईट होईल.' 'तिसरी लाट देशात दुसऱ्या लाटेइतका हाहाकार माजवणार नाही; मात्र देशात कमी असलेला लसीकरणाचा दर आणि निर्बंधांमध्ये येत असलेली शिथिलता यांमुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतली रुग्णसंख्या अधिक असू शकते,' असा अंदाज प्रा. डॉ. समीरन पांडा यांनी व्यक्त केला. ICMR आणि लंडनचं इम्पेरियल कॉलेज यांनी एकत्रितरीत्या एक गणितीय मॉडेल (Mathematical Model) तयार करून त्याद्वारे केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. हे वाचा - घरपोच लसीकरणाला सुरुवात, अंथरुणाला खिळलेल्यांसाठी विशेष सुविधा, अशी करा नोंदणी देशात आतापर्यंत चाळीस कोटी जणांचं लसीकरण (Vaccination) झालं आहे. त्यात दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या तुलनेने कमी आहे. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ही संख्या कमी आहे. तसंच, लहान मुलांचं लसीकरण अद्याप सुरूच झालेलं नाही. 'सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणं, मास्कचा (Mask) वापर करणं, लसीकरणासाठी धोरणात्मक नियोजन करणं आणि प्रवासाचं प्रमाण शक्य तितकं कमी करणं, आदी उपायांची अंमलबजावणी केली, तर संसर्ग नियंत्रणात राखण्यास मदत होईल,' असं डॉ. पांडा यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होण्याचा वेग कमी झाला असल्याचं निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतंच नोंदवलं आहे. ही धोकादायक बाब आहे. या पार्श्वभूमीवर, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr V. K. Paul) यांनीही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी 100 ते 125 दिवस कोरोनाविरुद्धच्या लढाईतले अत्यंत महत्त्वाचे दिवस असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं आहे. 'देश अद्याप हर्ड इम्युनिटीच्या पातळीवर पोहोचलेला नाही; तसंच जास्तीत जास्त लोकांना संसर्ग होऊन हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) विकसित होण्याची वाट पाहणं परवडणारं नाही,' असंही डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. हे वाचा - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीचा तिसरा डोस आवश्यक? शुक्रवारी (16 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादात देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे थोडीशी बेपर्वाईही महागात पडू शकते. केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यांत कोरोना संसर्ग अद्याप आटोक्यात आलेला नाही. तमिळनाडू, बंगालमध्ये रुग्णसंख्या नव्याने वाढत असून, ईशान्येकडच्या राज्यांमध्येही नव्याने प्रसार होत असल्याचं आढळत आहे.
First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases

पुढील बातम्या