मुंबई, 24 जानेवारी: बॉलीवूड अभिनेता विकी कौशल जी भूमिका करतो त्यात जीव ओततो. त्याने आजवर अतिशय मोजक्याच भूमिका निभावल्या असल्या तरी त्या कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. आता पुन्हा एकदा विकी कौशल अशाच दमदार भूमिकेत दिसणार आहे. आर्मी ऑफिसरच्या भूमिकेनंतर विकी कौशल आता ऐतिहासिक चित्रपटात दिसणार असून नुकतीच त्याची घोषणा झाली आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
'बॉलिवूड हंगामा' ने दिलेल्या वृत्तानुसार, विकी कौशलची याआधी 'तख्त' आणि 'द अमर अश्वत्थामा' या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये भूमिकांसाठी निवड झाली होती. परंतु हे चित्रपट रखडले होते. आता त्याला पुन्हा एक ऐतिहासिक भूमिका सोपवण्यात आली आहे. विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.परंतु, याबाबत विकी कौशलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा - Sudheer Varma Suicide: धक्कादायक! तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याची आत्महत्या; 'हे' आहे कारण
पीपिंग मून आउटलेटनुसार, या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सद्वारे केली जाईल. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, ज्यांनी याआधी 'लुका छुप्पी' आणि 'मिमी' सारख्या हलक्याफुलक्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर आता ते छत्रपती संभाजी राजेंचा जीवनपट पडद्यावर आणण्याचा विचार करत आहेत. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यांना संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा असून. हा चित्रपट शक्य तितका भव्य बनवण्यासाठी निर्माते कोणतीही कसर सोडणार नाहीत.
View this post on Instagram
गेल्या सहा महिन्यांपासून ते या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटात उच्च दर्जाचे व्हीएफएक्स देखील वापरण्यात येणार आहेत. चित्रपटाचं लेखन पूर्ण झालं असून चित्रपटाचं नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. लक्ष्मण आणि त्यांची टीम सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. दिनेश विजन या चित्रपटाला आपला पूर्ण पाठिंबा देत आहेत आणि हा चित्रपट खरोखरच भव्यदिव्य बनवण्यासाठी खूप मोठे बजेट मंजूर केले आहे, असं सांगण्यात येत आहे.
या प्रकल्पासह, विकी कौशलची ही सहावी भूमिका असेल जी सत्य जीवनावर आधारित असेल. त्याने याआधी राझी, संजू, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, सरदार उधम आणि आगामी प्रकल्प सामबहादूरमध्ये वास्तविक जीवनातील भूमिका किंवा खऱ्या घटनांनी प्रेरित भूमिका साकारल्या होत्या. विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहाद्दर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो लष्करी अधिकारी ‘सॅम बहाद्दर’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Vicky kaushal