नवी दिल्ली, 16 ऑगस्ट: सध्या अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan crisis) अराजक माजलं आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपले सैन्य माघारी बोलावल्यानंतर अल्पावधीतच अफगाणिस्तानवर तालिबानींनी (Talibani) ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानातील एकूण स्थितीमुळे जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक कलाकारांनी यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये शूटिंग केले आहे. सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या कलाकारांनी आपल्या शूटिंगच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. 1992 मध्ये रिलीज झालेल्या खुदा गवाह (Khuda Gawah) या चित्रपटाचे (Cinema) शूटिंग अफगाणिस्तानमध्ये झाले होते. यावेळी आलेले अनुभव 2013 मध्ये फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बिग बी अर्थात जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मांडले होते. तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) आणि निर्माता मनोज देसाई (Manoj Desai) यांनी देखील या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या घडामोडींना नुकताच उजाळा दिला आहे. आपली मुलं या चित्रपटाचं शूटिंग अफगाणिस्तानमध्ये करत आहेत हे ऐकल्यावर अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन तसेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आई निर्मात्यांवर जाम चिडल्या होत्या. हा नेमका काय प्रसंग होता, या कलाकरांनी सांगितलेल्या आठवणी कोणत्या जाणून घेऊया सविस्तर....
VIDEO: जीव वाचण्यासाठी विमानाच्या इंजिनवरुन प्रवास,टेक ऑफ करताच खाली पडले अफगाणी
याबाबतच सविस्तर वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. त्यानुसार, 1992 मध्ये रिलीज झालेल्या खुदा गवाह या चित्रपटाचे शूटिंग सुमारे एक महिना अफगाणिस्तानमधील काबूल (Kabul) येथील मजार -ए- शरीफमध्ये झाले होते. या चित्रपटाचे निर्माते मनोज देसाई यांनी शूटिंगदरम्यानचे अनुभव एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की या चित्रपटाचे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये व्हावे, अशी खुद्द अमिताभ बच्चन यांची इच्छा होती. यासाठी अमिताभ यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्यासोबत चर्चा केली होती. कारण राजीव गांधी यांचे अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह यांच्याशी चांगले संबंध होते. या चित्रपटातील बुजकशी या खेळाचा प्रसंग अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथे चित्रित केला गेला. या चित्रपटात वास्तविकता दिसावी, म्हणून युध्दग्रस्त अफगाणिस्तानमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करण्याचा अमिताभ बच्चन यांचा आग्रह होता.
मात्र युध्दग्रस्त अफगाणिस्तानमध्ये आपला मुलगा शूटिंगसाठी जात आहे, ही गोष्ट जेव्हा अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन यांना समजली तेव्हा त्या खूप चिडल्या. जर माझ्या मुलाला काही झाले तर तू परत येऊ नकोस, तिथेच आत्महत्या कर, असे त्या चिडून मला म्हणाल्याचे मनोज देसाई यांनी सांगितले.
20 वर्षांनी अफगाणिस्तानात तालिबाननं काढलं डोकं वर; का आणि कोणी केली स्थापना?
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आई देखील या शूटिंगच्या अनुषंगाने चिंतेत होती. त्यांनी देखील माझी झाडाझडती घेत, माझ्या मुलीला काही झालं तर तू भारतात परत येऊ नकोस, असं सुनावल्याचं देसाई यांनी सांगितले. त्यानंतर अमिताभ यांनी आपल्या आणि श्रीदेवीच्या आईची समजूत काढली आणि आम्ही अफगाणिस्तानला रवाना झाल्याचे देसाई म्हणाले.
मोठा बंदोबस्त असतानाही एक तालिबानी नेता शूटिंग दरम्यान कसा हेलिकॉप्टरमधून येत अमिताभ बच्चन यांना गुलाबाचे फूल देऊन गेला, हा प्रसंगही मनोज देसाई यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितला.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी खुदा गवाह या चित्रपटात जेलर रणवीर सिंह सेठी ही भूमिका केली होती. अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती आणि शूटिंग दरम्यान आलेला अनुभव त्यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितला.
शूटिंगसाठी आम्ही अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर जेव्हा उतरलो, तेव्हा 24 तासांपूर्वी डागलेल्या 90 पेक्षा जास्त मिसाईलचे (Missiles) अवशेष आम्हाला तिथे दिसले. शूटिंग दरम्यान प्रत्येक कलाकारासोबत 2-2 हत्यारबंद बॉडीगार्डस देण्यात आले होते. शूटिंग पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी लोक प्रसंगी लाठ्या खात पण गर्दी काही कमी होत नसे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अफगाणिस्तान सरकारने आमच्या सुरक्षेसाठी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. एक महिन्यासाठी (शूटिंगच्या संपूर्ण कालावधीत) तेथील सरकारने आम्हाला विमान सेवा देऊ केली होती.
'तालिबान आम्हाला जिवंत सोडणार नाही', अफगाणिस्तानहून भारतात आलेल्या महिलेचा टाहो
अफगाणिस्तानमधील नागरिक आणि आम्ही कलाकार तसेच क्रू मेंबर्स यांच्यासाठी एका सलोख्याच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. अफगाणिस्तानमध्ये तेव्हा परिस्थिती खूपच खराब होती. त्यामुळे आम्हाला हॉटेलबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु, हॉटेलमध्ये मनासारखं जेवण मिळत नसल्याने आम्ही ढाब्यावर जाऊन जेवत असू, अशा आठवणी विक्रम गोखले यांनी सांगितल्या.
मनोज देसाई यांनी या सिनेमाच्या शूटिंगच्या आठवणी जागवताना सांगितलं की, अमिताभ बच्चन यांना एका तालिबानी नेत्याने हेलिकॉप्टरमधून येऊन गुलाबाचं फूल दिलं होतं. अफगाणिस्तानमध्ये अनेक जण बिग बींचे चाहते होते, अजूनही आहेत, याचंच हे द्योतक.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Amitabh Bachchan, Taliban