मुंबई, 28 मे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 140 वी जयंती आहे. याच दिवसाचे निमित्त साधत आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यात अभिनेता रणदीप हुडा ‘वीर सावरकरां’ची भूमिका साकारत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हापासून चित्रपटाच्या टीझरची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता अखेर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटात रणदीप हुडा अभिनय आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका साकारत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे शूटिंग हे लंडन, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार येथे झाले आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज करत रणदीपने लिहिलं आहे कि, ‘भारतातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक, ज्यांना ब्रिटीश सत्ता घाबरत होती. त्यांचा इतिहास कोणी लपवून ठेवला ते जाणून घ्या.’ स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
टीझरमध्ये रणदीप हुडा वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात सावरकरांची जीवनगाथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सावरकरांना मिळालेली काळ्या पाण्याची शिक्षा, सेल्युलर जेलमध्ये त्यांचा झालेला छळ या सगळ्या गोष्टींची झलक पाहायला मिळत आहे. तसंच टीझरमध्ये महात्मा गांधी यांचा देखील उल्लेख आहे. चित्रपटाचा टिझर खूपच जबरदस्त असून आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. नवीन संसद भवनाचं उदघाटन होताच या सुपरस्टार्सचं ‘ते’ ट्विट चर्चेत; पीएम मोदींना संबोधत म्हणाले… भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदीराम यांसारख्या अनेक क्रांतिकारकांवर वीर सावरकरांच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचेही टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाने खूप मेहनत घेतली आहे. या टीझरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा चित्रपट कधी रिलीज होईल याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही.
रणदीप हुडाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही केले आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित यांनी केली आहे. या चित्रपटात रणदीप हुडासोबत अंकिता लोखंडे, अमित सियाल आणि अपिंदरदीप सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ च्या टीझरमधील रणदीप हुडाचा लूक आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे, आता चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.