मुंबई, 02 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा झटका बसला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याच्या आत्महत्येनंतर तब्बल 30 जणांची चौकशी करण्यात आली. मात्र अद्यापही सुशांतनं आत्महत्या का केली याचे कारण मुंबई पोलिसांना सापडले नाही आहे. आता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या मंडळींची देखील मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. डीसीपी प्रणय अशोक यांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीनुसार उद्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील तपासात ज्यांची नावं समोर येतील, त्यांना मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलावेल अशी प्रतिक्रिया प्रणय अशोक यांनी दिली आहे. दरम्यान यशराजच्या कास्टिंग डिरेक्टर शानु शर्मा यांचीही दुसऱ्यांदा चौकशी केली जाणार आहे. शानु शर्मा गेली अनेक वर्ष यश राजमध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करतात. बॉलिवूडमध्ये त्यांचा दबदबा आहे. सुशांतची काही व्यावसायिक दुश्मनी होती का हे देखील मुंबई पोलिसांकडून तपासले जात आहे. (हे वाचा- मोठ्या पडद्यावरील सुशांतच्या आठवणीत नेणारा VIDEO!नेहा कक्करचे म्यूझिकल ट्रिब्यूट ) याचबरोबर कंगना रणौत आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांचा जबाबही नोंदवण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी या दोघांची चौकशी नाही तर त्यांचे मत विचारले जाणार आहे. बॉलिवूड क्वीन कंगना रणौत, दिग्दर्शक शेखर कपूर, अनुभव सिन्हा, सुशांतच्या हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी याआधी सुशांत नेपोटिझमची शिकार झाल्याचे म्हटले होते. तशा पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. दरम्यान दिग्दर्शक शेखर कपूर सुशांतबरोबर ‘पानी’ हा सिनेमा करत होते. मात्र काही कारणामुळे या सिनेमाचे काम बंद झाले. हा चित्रपट यशराज प्रोडक्शनचा होता. शेखर कपूर यांनी त्यांच्या ट्वीटमधून खुलासा केला होता की सुशांत काही दिवसांपासून त्रस्त होता.
I knew the pain you were going through. I knew the story of the people that let you down so bad that you would weep on my shoulder. I wish Iwas around the last 6 months. I wish you had reached out to me. What happened to you was their Karma. Not yours. #SushantSinghRajput
— Shekhar Kapur (@shekharkapur) June 15, 2020
(हे वाचा- सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 30 जणांची चौकशी, तरी हे प्रश्न अनुत्तरितच!) बुधवारी सुशांतचा मित्र आणि क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर सिद्धार्थ पिथानी याची देखील चौकशी करण्यात आली. सिद्धार्थ सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या घरातच उपस्थित असल्याने त्याची पुन्हा चौकशी करण्यात आली. तर त्याआधी मंगळवारी सुशांत बरोबर शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’मध्ये ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, त्या संजना सांघीची चौकशी करण्यात आली. संपादन - जान्हवी भाटकर