मुंबई, 30 मार्च: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (The Kashmir Files BO Collection) नवनवे रेकॉर्ड सेट केले. सामान्यांपर्यंत हा सिनेमा थिएटर्सच्या माध्यमातून पोहोचत आहे. सिनेमावर काही सिनेरसिक टीका जरी करत असले तरी कौतुक करणारेही आहेत. दरम्यान या सिनेमाचे चाहते अधिकाधिक लोकांना हा सिनेमा पाहावा याकता इतरांना आवाहन करत आहे. काही जण त्यांनी बनवलेल्या आर्टवर्कच्या माध्यमातून सिनेमातील कलाकारांना, मेकर्सना शुभेच्छा देत आहे. गुजरातमध्ये चक्क ‘द कश्मीर फाइल्स’ साडी बनवण्यात आली आहे. सूरतमध्ये एका कापड व्यापाऱ्याने या फिल्म संदर्भात साड्या बनवल्या आहेत. त्यामुळे हे व्यापारी महोदय सध्या विशेष चर्चेत आले आहेत. द कश्मीर फाइल्स सिनेमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. याच लोकप्रियतेनंतर आता गुजरातमधील व्यापाऱ्याने वेगळा प्रयोग केला आहे. सूरतमधील विनोद कुमार सुराणा यांचे अभिनंदन टेक्स्टाइल मार्केटमध्ये शॉप आहे. त्यांनी याठिकाणी ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाची प्रिंट वापरुन बनवलेल्या साड्या दुकानात लावल्या आहेत. याआधी त्यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असणारी साडी देखील लाँच केली होती. मीडिया अहवालांनुसार त्यांनी या प्रिंटच्या केवळ तीन साड्या बनवल्या असून त्या लाँच करण्याचा त्यांचा विचार आहे. आज तक ने याविषयी वृत्त दिले आहे. हे वाचा- मराठमोळ्या संदीप पाठकचा विदेशात डंका, ‘राख’साठी पटकावला International Award ‘द कश्मीर फाइल्स साडी’च्या 6 मीटरमध्ये 300 रंगांचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल प्रिंटचा वापर करत या तीन साड्या बनवण्यात आल्या आहेत. या साडीची विक्री ते नो प्रॉफिटमध्ये करत आहेत. दरम्यान सूरतच्या या बाजारात तुम्हाला साड्यांचे शेकडो प्रकार पाहायला मिळतील. पण या ‘द कश्मीर फाइल्स’ साडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विनोद सुराणा सांगतात की हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना काश्मिरी पंडितांच्या दु:खाची जाणीव झाली आणि त्यांनी या सिनेमावर साडी बनवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाबाबत बोलायचं झालं तर हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर आधारीत आहे. 90 च्या दशकात काश्मिरी पंडिंतांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या झालेल्या हत्या यावर आधारीत हा सिनेमा आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 250 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचू शकतो, तरण आदर्श यांनी याविषयी माहिती दिली आहे.