मुंबई, 15 नोव्हेंबर : मराठी सिनेसृष्टीत आता अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकही या चित्रपटांना भरघोस पाठींबा देत आहेत. आता असाच एक भन्नाट विषय असणारा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ झिम्मा ’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर ‘झिम्मा’ची टीम प्रेक्षकांसाठी आता एक नवीन भेट घेऊन आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘ सनी ’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने एक रेकॉर्ड तोडलंय. मराठी चित्रपटसृष्टीत आता पर्यंत जे घडलं नाही ते ‘सनी’ चित्रपटाने करून दाखवलं आहे. मराठी सिनेसृष्टीत असं पहिल्यांदाच घडत आहे की, एखाद्या चित्रपटाचा शो त्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच थिएटरला लावला आहे आणि तो शो हाऊसफुल झाला आहे. नुकताच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू शो पुण्यातील एका चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला होता. या शोची तिकीटविक्री एका ॲपद्वारे प्रेक्षकांसाठी करण्यात आली होती आणि अवघ्या काही वेळातच हा शो ‘हाऊसफुल’ झाला. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता ‘सनी’च्या दुसऱ्या शोचेही यावेळी आयोजन करण्यात आले. ठाण्यातही पेड प्रिव्ह्यू शोचे आयोजन करण्यात आले असून तिथेही ‘हाऊसफुल’चा बोर्ड लागला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘सनीला मिळालेले हे प्रेक्षकांचे प्रेम पाहून, ‘सनी’ बॉक्स ऑफिसावर धमाका करणारा हे नक्की! हेही वाचा - BB4: रुचिराने तोडलं नातं? बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला रोहित… पाहा VIDEO प्रेक्षकांकडून मिळालेल्या या प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘‘पेड प्रिव्ह्यू शोचा आम्ही एक प्रयोग करून पाहिला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. खरंतर आम्ही एकाच शोचे आयोजन केले होते, परंतु प्रेक्षकांची इतकी गर्दी पाहून आम्ही आणखी एक शो ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून भारावून गेलोय. जसा सकारात्मक प्रतिसाद ‘झिम्मा’ला दिला, मला आशा आहे, ‘सनी’लाही प्रेक्षक तेवढ्याच आपुलकीनं स्वीकारतील.
‘सनी’ची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर म्हणतो, ’’ माझ्यासाठी हा अनुभव सुखद आहे. ‘सनी’ प्रेक्षकांना आवडतोय. जसं प्रेम प्रदर्शनापूर्वी दिलं आहे, तसंच प्रेम प्रदर्शनांनंतरही द्याल, याची खात्री आहे. घरापासून दूर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट सांगणारा ‘सनी’ आहे, त्यामुळे प्रेक्षकांना तो कुठेतरी आपल्या जवळचा वाटतोय.
‘सनी’ या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता हेमंत ढोमे आणि टीमचा हा सलग दुसरा सुपरहिट सिनेमा ठरणार आहे. विविध वयोगटातील अभिनेत्रींनी नटलेला आणि सिद्धार्थ चांदेकरच्या दमदार अभिनयाने सजलेला झिम्मा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. करोना काळातील लॉकडाऊन दरम्यान प्रदर्शित होऊनदेखील या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे ‘सनी’ देखील प्रेक्षकांना चित्रपट ग्रहाकडे खेचण्यात यशस्वी ठरणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ‘सनी’ हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात घरापासून दूर राहिलेल्या व्यक्तींची कहाणी दाखवण्यात आली आहे. ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे.